विक्रमबाबांनी भडकवली कृषी अधिकाऱ्याच्या श्रीमुखात

कृषी विभागाचा कार्यक्रम उधळला : अधिकाऱ्यांच्या एजंटगिरीचा जाहीर निषेध

पाटण, (प्रतिनिधी) – पाटण तालुक्‍यात ओला दुष्काळाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. अति पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे आतोनात नुकसान झाले असताना पाटण तालुक्‍याचे कृषी अधिकारी खाजगी कंपनीची एजंटगिरी करत असून आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो, असे म्हणत विक्रमबाबा पाटणकर यांनी दस्तुरखुद्द तालुका कृषी अधिकारी यांच्या श्रीमुखात भडकवली. या अचानकपणे घडलेल्या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली. यामुळे कृषी विभागाचा मल्हारपेठ येथील कार्यक्रम अक्षरश: उधळून लावण्यात आला.
मल्हारपेठ, ता. पाटण या ठिकाणी मंगल कार्यालयात रिच फिल्ड फल्टीलायजर प्रायव्हेट लि. नाशिक या कंपनीचे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा सातारा व पाटण तालुका कृषी अधिकारी यांच्या विद्यमाने हुमणी कीड व्यवस्थापन व एकात्मिक अन्न द्रव्य व्यवस्थापन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी कृषी विभागाने तालुक्‍यातील शेतकऱ्यांना निमंत्रिक केले होते. संबंधित कंपनीने कार्यक्रमाची व्यवस्था करुन शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले होते. यासाठी तालुक्‍यातील शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तालुक्‍यात ओला दुष्काळाची परिस्थिती असताना त्यासाठी आंदोलने होवूनही तालुका कृषी कार्यालय त्याकडे दुर्लक्ष करत आहे. शेतकऱ्यांच्या शेतीत झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी तालुका कृषी कार्यालयाकडे वेळ नाही. तर खाजगी कंपनीचे मार्केटींग करुन त्यांची एजंटगिरी करण्यास कृषी विभागाला वेळ आहे. असे म्हणत तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करुन कार्यक्रम उधळून लावला. यावेळी विक्रमबाबा पाटणकर यांनी तालुक्‍यात अति पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून पिके कुजून गेली असताना कसले किड व्यवस्थापन करत आहात? तुम्ही अगोदर तालुक्‍यात फिरुन शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे अगोदर करा, शेतकऱ्यांना लुटणाऱ्या खाजगी कंपनीची एजंटगिरी बंद करा, कमिशनसाठी शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा धंदा बंद करा, असा आरोप केला. यावेळी झालेल्या बाचाबाचीत विक्रमबाबा यांनी तालुका कृषी अधिकारी प्रविण आवटे यांच्या श्रीमुखात भडकवली. यामुळे तणावाचे निर्माण झाले. मात्र मल्हारपेठ पोलिसांना तात्काळ घटनास्थळी धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला.
दरम्यान, सायंकाळी उशिरा विक्रमबाबा पाटणकर आणि संशयित 8 ते 10 जणांविरोधात शासकीय कामात अडथळा व शासकीय नोकरास मारहाण प्रकरणी मल्हारपेठ पोलिसांत 353, 332 अंतर्गत गुन्हा नोंद झाला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दिगंबर आतिग्रे करत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)