विकास कृष्णन,अमित पांघाल उपान्त्य फेरीत ; मुष्टियुद्धातही भारताची दोन पदके निश्‍चित

जकार्ता: भारताचा गुणवान मुष्टियोद्धा विकास कृष्णनने डोळ्याच्या दुखापतीची पर्वा न करता आपल्या प्रतिस्पर्ध्यावर झुंजार मात करीत 75 किलो गटाची उपान्त्य फेरी गाठताना सलग तिसऱ्या आशियाई क्रीडास्पर्धेत पदकाची निश्‍चिती केली. तसेच भारताच्या अमित पांघालने आपल्या प्रतिस्पर्ध्यावर संपूर्ण वर्चस्व गाजविताना 49 किलो गटांत उपान्त्य फेरीत धडक मारताना भारताला मुष्टियुद्धात आणखी एका पदकाची कमाई करून दिली.

याआधी 2010 आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक आणि 2014 आशियाई स्पर्धेत कांस्यपदक जिंकणाऱ्या विकास कृष्णनने 75 किलो गटातील उपान्त्यपूर्व फेरीत चीनच्या तुओहेता एरबिएके तांग्लातिहानचे आव्हान एका गुणाने मोडून काढले. पहिल्या फेरीत बचावात्मक धोरण अवलंबणाऱ्या विकासने रक्‍तबंबाळ झालेल्या डाव्या डोळ्याकडे दुर्लक्ष करून पुढच्या फेऱ्यांमध्ये आक्रमण करीत तांग्लातिहानला निष्प्रभ केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दुखापतीमुळे स्वतला वाचवीत योग्य वेळीच आक्रमण करणाऱ्या विकासच्या बाजूने पंचांनी 3-2 अशा फरकाने कौल दिला. अंतिम फेरीत स्थान मिळविण्यासाठी विकाससमोर आता कझाखस्तानच्या अबिलखान अमानकुलचे आव्हान आहे. तांग्लातिहान हा चांगला प्रतिस्पर्धी असला, तरी याआधी मी त्याला 5-0 असे पराभूत केले होते, असे सांगून विकास म्हणाला की, या वेळी पहिल्याच फेरीत डाव्या डोळ्याला दुखापत झाल्यामुळे माझ्या खेळावर स्वाभाविकपणेच मर्यादा पडल्या. यापुढील फेरीत मला अधिक काळजी घ्यावी लागेल.

त्यानंतर अमित पांघालने 49 किलो गटातील उपान्त्यपूर्व फेरीत दक्षिण कोरियाच्या किम जॅंग रयोंगचा 5-0 असा धुव्वा उडवीत उपान्त्य फेरी गाठताना पहिल्यावहिल्या आशियाई पदकाची निश्‍चिती केली. केवळ 22 वर्षीय अमितने आपल्या वीस वर्षीय प्रतिस्पर्ध्याला सातत्यपूर्ण आक्रमणाने जेरीस आणले. अमितसमोर आता उपान्त्य फेरीत फिलिपाईन्सच्या कार्लो पालमचे आव्हान आहे.

याआधी गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक जिंकणाऱ्या अमितसाठी हे वर्ष भलतेच यशदायी ठरले आहे. त्याने राष्ट्रकुल पदकासह इंडिया ओपन स्पर्धा जिंकताना बल्गेरियातील प्रतिष्ठेच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही सुवर्णपदक पटकावले आहे. आता आशियाई स्पर्धेतही यश मिळवून सुवर्णपदकाची हॅटट्रिक करण्याची अमितला संधी आहे. अमित हा आमच्या सर्वोत्तम बॉक्‍सरपैकी एक असून त्याच्याकडून निश्‍चितपणे सुवर्णपदकाची अपेक्षा असल्याचे भारताचे मुष्टियुद्ध सहप्रशिक्षक सी. ए. कुटप्पा यांनी सांगितले.

सरजूबालाच्या पराभवाने महिलांची पाटी कोरी

महिला गटांत जागतिक रौप्यविजेत्या सरजूबाला देवीचे आव्हान उपान्त्यपूर्व फेरीतच संपुष्टात आले. महिलांच्या 51 किलो वजनगटाच्या उपान्त्यपूर्व फेरीत चीनच्या चॅंग युआनने सरजूबाला देवीचे आव्हान 5-0 असे एकतर्फी मोडून काढत उपान्त्य फेरी गाठली. चॅंग ही यूथ ऑलिम्पिकमधील सुवर्णविजेती असून तिने जागतिक यूथ स्पर्धेतही सुवर्णपदक पटकावले आहे. सरजूबाला देवीच्या पराभवामुळे भारतीय महिला बॉक्‍सिंग पथकाला पहिल्यांदाच पदकाविना हात हलवीत परतावे लागणार आहे. गेल्या 2014 इंचेओन आशियाई स्पर्धेत भारताच्या माजी जगज्जेत्या मेरी कोमने सुवर्णपदक पटकावले होते. तर सरिता देवी व पूजा ारणी यांनी कांस्यपदके जिंकताना महिलांच्या पदकांची संख्या तीनवर नेली होती. मेरी कोमने यंदाच्या स्पर्धेतून माघार घेतली असून त्याचा परिणाम भारतीय महिलांच्या कामगिरीवर झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)