विकास कामांच्या जोरावर भरघोस यश मिळणार

कसबा विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार मुक्‍ता शैलेश टिळक यांच्या निवडणूक कार्यालयाचे उद्‌घाटन दसऱ्याच्या मुहूर्तावर खासदार बापट यांच्या हस्ते करण्यात आले,

खासदार बापट : मुक्‍ता टिळक यांच्या निवडणूक कचेरीचे उद्‌घाटन

पुणे :  पंतप्रधान नरेंद मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासपर्वावर आधारित अनेक विकासाभिमुख उपक्रम भारतीय जनता पार्टीने जनतेसाठी राबवले आहेत. त्यामुळेच यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही जनता भाजप-शिवसेना-आरपीआय महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील, असा विश्‍वास खासदार गिरीश बापट यांनी बुधवारी व्यक्‍त केला. कसबा विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार मुक्‍ता शैलेश टिळक यांच्या निवडणूक कार्यालयाचे उद्‌घाटन दसऱ्याच्या मुहूर्तावर खासदार बापट यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. उमेदवार मुक्‍ता टिळक, शैलेश टिळक, मतदार संघाचे अध्यक्ष राजेश येनपुरे, प्रमोद कोंढरे, छगन बुलाखे, वैशाली नाईक, शिवसेना व भारतीय जनता पक्षाचे सर्व          नगरसेवक व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना टिळक यांनी मतदार आपल्या भरघोस मतांनी विजयी करतील, असा विश्‍वास व्यक्‍त केला. गेल्या अडीच वर्षांत महापौर म्हणून जनतेची सेवा करण्याचे भाग्य मला मिळाले आहे. जनतेच्या उपयोगी असणारे अनेक निर्णय मला घेता आले. कसबा विधानसभा मतदारसंघातील सुजाण नागरिक त्याची नक्‍कीच दखल घेतील, असे सांगत यावेळी कसब्यात पुन्हा भाजपचा आमदार विजयी होईल, असा दावाही टिळक यांनी केला.

मध्यवस्तीचा भाग कोंडीमुक्‍त करणार – टिळक
शहराच्या मध्यवस्ती भागातील रस्ते अरूंद असल्याने या भागात सातत्याने वाहतूक कोंडी होते. प्रामुख्याने रस्ता पेठ आणि रविवार पेठेत मोठ्या प्रमाणात व्यासायिक दुकाने असल्याने या भागातील व्यावसायिकांना तसेच रहिवाशांनाही वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. त्यामुळे भविष्यात या भागात जास्तीत जास्त वाहनतळे विकसित करून या भागातील कोंडीवर मात करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याने टिळक यांनी स्पष्ट केले. बुधवारी टिळक यांनी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 17 मध्ये पदयात्रा काढली. यावेळी टिळक यांनी मतदारांशी संवाद साधला. यावेळी मतदारांकडून या भागातील वाहतूक कोंडी गंभीर बनली असून त्यावर तोडगा काढण्याची विनंती महापौरांना करण्यात आली. तसेच, या भागातील व्यावसायिकांकडूनही महापालिकेशी संबंधित समस्या त्यांच्याकडे मांडण्यात आल्या. या भागाची प्रतिनिधी म्हणून या समस्या तातडीने सोडविण्यासाठी भर देणार असल्याचे आश्‍वास टिळक यांनी यावेळी दिले. नगरसेविका सुलोचना कोंढरे, विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष राजेश येणपूरे, सरचिटणीस प्रमोद कोंढरे, संजय देशमुख, अरविंद कोठारी, उमेश चव्हाण, बापू नाईक, रोहीनी नाईक, सुनंदा गडाळे, प्रभाग अध्यक्ष गणेश पाचरेकर, युवा मोर्चचे अध्यक्ष राजू परदेशी, पुष्कर तुळजापूर यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here