विंडीजसमोर आजपासून अध्यक्षीय संघाचे आव्हान

दोन कसोटींच्या मालिकेपूर्वी एकमेव सराव सामना

बडोदा: भारताच्या दौऱ्यावर आलेल्या वेस्ट इंडीज संघाचा पहिला सराव सामना आजपासून (शनिवार) रंगणार असून या दोन दिवसीय लढतीत पाहुण्या संघासमोर अध्यक्षीय संघाचे आव्हान आहे. भारताचा त्रिशतकवीर फलंदाज करुण नायरकडे अध्यक्षीय संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले असून मुंबईचा युवा फलंदाज पृथ्वी शॉ आणि महाराष्ट्राच्या अंकित बावणेचा या संघात समावेश करण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

 

वेळापत्रकाच्या घोटाळ्यामुळे भारत दौऱ्याच्या पूर्वतयारीकरिता पुरेसा वेळ मिळाला नसल्याची तक्रार वेस्ट इंडीज संघाने केली होती. वेस्ट इंडीज संघ मूळ वेळापत्रकानुसार 10 सप्टेंबर रोजी भारतात दाखल होणार होता. परंतु देशांतर्गत मोसमातील सामन्यांमुळे या संघासाठी योग्य व्यवस्था करणे शक्‍य नसल्याची भूमिका भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने घेतली. त्यामुळे वेस्ट इंडीज संघाला दुबईतील आयसीसी ग्लोबल ऍकॅडमीत सराव करणे भाग पडले. दरम्यान भारतीय संघही संयुक्‍त अरब अमिरातीत आशिया चषक स्पर्धेत व्यस्त आहे.

उद्या सुरू होत असलेल्या सराव सामन्यात वेस्ट इंडीज संघाचे नेतृत्व जेसन होल्डर करणार आहे. मात्र वेगवान गोलंदाज केमार रोशची गैरहजेरी विंडीजला जाणवेल. आजीच्या निधनामुळे रोशला बार्बाडोस येथेच थांबावे लागले. येत्या 4 ऑक्‍टोबर रोजी राजकोट येथे सुरू होत असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी रोश विंडीज संघात सामील होणार आहे. वेस्ट इंडीजचे सर्व प्रमुख खेळाडू या दौऱ्यात सहभागी झाले आहेत.

भारतविरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यातील दुसरा कसोटी क्रिकेट सामना 12 ऑक्‍टोबर रोजी हैदराबाद येथे सुरू होणार आहे. त्यानंतर पाच सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळविली जाणार आहे. गुवाहाटी येथील 21 ऑक्‍टोबर रोजी होणाऱ्या सामन्याने या मालिकेला सुरुवात होणार असून इंदूर, पुणे, मुंबई येथील सामन्यांनंतर 1 नोव्हेंबर रोजी तिरुवनंतपुरम येथील सामन्याने ही मालिका संपेल. उभय संघांमधील तीन टी-20 सामने 4 ते 11 नोव्हेंबर दरम्यान कोलकाता, लखनौ आणि चेन्नई येथे खेळविले जातील.

प्रतिस्पर्धी संघ-
वेस्ट इंडीज-जेसन होल्डर (कर्णधार), सुनील ऍम्ब्रिस, देवेन्द्र बिशू, क्रेग ब्रेथवेट, रोस्टन चेज, शेन डॉवरिच, शेनॉन गॅब्रिएल, जाहमार हॅमिल्टन, शिमरॉन हेटमायर, शाई होप, अल्झारी जोसेफ, कीमो पॉल, कायरॉन पॉवेल, केमार रोश व जोमेल वॉरिकॅन.
अध्यक्षीय संघ- करुण नायर (कर्णधार), मयंक आगरवाल, पृथ्वी शॉ, हनुमा विहारी, श्रेयस अय्यर, अंकित बावणे, ईशान किशन, जलज सक्‍सेना, सौरभ कुमार, बेसिल थंपी, आवेश खान, के. विघ्नेश व ईशान पोरेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)