विंटर कोटस्‌ आणि जॅकेटस्‌

संक्रांत झाली असली तरीही अजून हुडहुडी भरणारी थंडी पडत आहेच. गेल्या काही वर्षात थंडीच्या या सीझनलाच सेलिब्रेट करण्याचं प्रमाण जरा वाढलं आहे. त्यामुळे जानेवारी संपला तरी विंटरवेअर्सची कलेक्‍शन्स एकामागोमाग एक बाजारात येत आहेतच. थंडीसाठी जॅकेटस्‌, हूड असे एकूणच या ऋतूला साजेसे कपडे घेणं गरजेचं झालं आहे. वेस्टसाइड, पॅंटालून्स, शॉपर्स स्टॉप अशा ठिकाणी दिवाळीच्या पारंपरिक कपड्यांसोबतच एका बाजूला विंटर कलेक्‍शनही डोकवायला लागले आहेत. या वर्षीही नवे ट्रेण्ड बाजारात आले आहे. मात्र, सर्वाधिक बाजारपेठ व्यापून गेली आहे ती जॅकेटस्‌, हूड, डेनिमच्या ट्रेंडनं. फॅशन आणि उपयुक्तता असा दुहेरी उपयोग होत असल्याने हिवाळ्यात या ट्रेंडला भरपूर मागणी आहे.

जॅकेटस्‌
थंडीच्या महिन्यांत सकाळी बाहेर पडायचं गरजेचं असेल तर बाहेरची बोचरी थंडी अंगाला टोचायला लागल्यावर कुडकुडण्याशिवाय काहीच पर्याय नसतो. म्हणून साध्या टी-शर्टवर डार्क ब्लू रंगाचं जॅकेट घातल्याने ऊब तर मिळतेच शिवाय कपड्यांना नवा लूकही येतो. या जॅकेटस्‌चा जुना कोटसारखा दिसणारा व्हिंटेज लूक बदलून त्यामध्ये आता अनेक प्रकार आले आहेत. केवळ लूकमध्येच नाहीतर कपड्याच्या प्रकारातही विविधता आढळेल.

ज्युटचं जॅकेट : हा थंडीत जॅकेट वापरण्याचा नवा आणि ट्रेंडी पर्याय आहे. याच ट्रेंडी लूकमध्ये आणखी भर म्हणून ज्युट या कपडयाचे जॅकेटस्‌ बाजारात आले आहेत. या कपडयाच्या टेक्‍श्चरमुळे त्याला अधिकाधिक पसंती मिळत आहे. लाल, गडद निळा, कॉफी, चॉकलेटी, सफेद, काळा या रंगांमध्ये ही ज्युटची जॅकेटस्‌ उपलब्ध आहेत.

लोकरीचं जॅकेट : थंडी म्हटल्यावर लोकरीच्या कपड्यांना विसरून कसं चालेल? लोकरीचे स्वेटर्स, हातमोजे, शाल हे प्रकार थोडे आउटडेटेड झाले आहेत. पण सध्या फॅशनमध्ये इन असलेले जॅकेट आता लोकरीतही उपलब्ध आहेत. लोकरीमुळे थंडीत चांगलीच ऊब मिळते आणि त्यात जॅकेटच्या ट्रेंडी लूकमुळे लोकरीच्या जॅकेटस्‌लाही मागणी वाढत आहे.

लॉंग जॅकेटस्‌ : गेल्या दोन वर्षांत अधिक चलती आहे ती लॉंग जॅकेटच्या ट्रेंडची. या जॅकेटमध्ये वापरण्यात येणारं कापड जाड असतं. शिवाय लांबीला हे गुडघ्यापर्यंत येतं. त्यामुळे थंडीसाठी या जॅकेटस्‌चा उत्तम पर्याय आहे.

वेस्ट कोट : विंटर कलेक्‍शनच्या ट्रेंडी फॅशनमध्ये अधिक भर पडली आहे ती वेस्ट कोटची. जाड, सुती कापडाचा वापर करून बनवलेले हे वेस्ट कोट तरुणांचं आकर्षण ठरले आहेत. कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलींपासून ते कॉर्पोरेट ठिकाणी काम करणाऱ्या तरुणी सगळ्यांचीच याला पसंती मिळाली आहे. जाड, सुती टी-शर्टवर किंवा फिकट रंगाच्या शर्टवरही हे वेस्ट कोट शोभून दिसतात.

हूड : लांब हाताचं स्वेटर, थंडीत कानात हवा जाऊन आजारी पडू नये म्हणून कानटोपी असं काहीसं चित्र पूर्वी दिसायचं. पण आता कोण कानटोपी घालून कॉलेजमध्ये जाईल का? मात्र कानटोपीला पर्याय आहे तो हूडचा.. हूड हे दिसण्यास कानटोपीप्रमाणेच असतात. पण त्याला मॉडर्न लूक दिलेला असतो. जाड कपड्याचा वापर करून बनवलेल्या टी-शर्टला हे हूड पाठीमागच्या गळ्याजवळ जोडलेलं असतं. त्यामुळे गार हवा कानात जात नाही. हूड हा असा प्रकार आहे की केवळ तरुणच नाही तर तरुणीही त्याचा सहज वापर करू शकतात. हूडचा आणखी एक फायदा असतो तो म्हणजे हे हूड बलून स्टाइलमध्ये बनवलेले असल्यामुळे बारीक असो वा जाड, कोणत्याही व्यक्तीवर हे शोभून दिसतं. या हूडमध्येसुद्धा कित्येक नवे प्रकार बाजारात आहेत. सगळ्यात सामान्य हूडचा प्रकार म्हणजे साध्या टी-शर्टप्रमाणे दिसणारा आणि पाठीमागे गोल टोपी जोडलेला हूड. झीपर हूडमध्ये हूडला घालण्यासाठी पुढे एक चेन असते. त्यामुळे टी-शर्टवर घातल्यास याचा वापर होऊ शकतो. आता हूडला एक नवा लूक देण्यात आला आहे तो म्हणजे फरचा. लांब आणि स्ट्रेट फिटिंग असणाऱ्या हूडच्या टोपीला पुढील भागात फर लावलेला असतो. हे हूड केवळ तरुणींसाठी उपलब्ध आहेत. स्लीव्जलेस हूडनासुद्धा सध्या खूप पसंती मिळत आहे. लांब हाताचं टी-शर्ट घालून त्यावर हे स्लीव्जलेस हूड घातल्यास हूडचा यो’ लूक येतो.

डेनिम
डेनिम म्हटलं की प्रथम नजरेसमोर येते ती जीन्स. शक्‍यतो जीन्ससाठीच डेनिमच्या कपडयाचा वापर केला जायचा. मात्र आता डेनिमचं स्वरूप बदललं आहे. याच डेनिमच्या कपड्याचा वापर करून बनवलेले लॉंग टॉप, टी-शर्ट, वेस्ट कोट, शर्ट, जॅकेट्‌स बाजारात मोठ्या प्रमाणात दिसून येतात. जाड कापड असल्याने डेनिमचे विंटरवेअर थंडीतही वापरता येऊ शकतात. काही ठिकाणी विंटर स्पेशल डेनिम कलेक्‍शन लावून संपूर्ण शोरूम डेनिममय झाल्याचं दिसून येत आहे.

डेनिम जॅकेटस्‌ : ज्युट आणि लोकरीच्या जॅकेटसोबत चलतीचे आहेत ते डेनिमचे जॅकेटस्‌. ज्युटप्रमाणेच डेनिमही थंडीमध्ये ऊब मिळवून देण्याचं काम करते. याखेरीज डेनिम असल्यामुळे केवळ थंडीतच नाही तर इतर ऋतूमध्येही याचा वापर होऊ शकतो. कोणत्याही टी-शर्टवर डेनिमचं जॅकेट शोभून दिसतं. डेनिमच्या जॅकेटप्रमाणेच डेनिमचे वेस्ट कोटही बाजारात उपलब्ध आहेत.

डेनिमचे टी-शर्ट : डेनिमच्या कपड्याचे टी-शर्टस सध्या प्रत्येकच कपड्यांच्या दुकानात मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. काही टी-शर्ट हे डेनिमचा वापर करून तर काही डेनिम आणि जोडीला सुती कपडयाचा वापर करून तयार केली आहेत. डेनिम आणि कॉटनच्या वापरामुळे त्याला एक छान लूक मिळतो. जास्तीत जास्त टी-शर्ट हे डेनिमच्या निळ्या आणि पांढऱ्या रंगाचा वापर करून बनवलेले आहेत. डेनिम टी-शर्टचा पर्याय थंडीत घालण्यासाठी खूप आवडेल असा आहे. हे टी-शर्ट डेनिमच्या इतर कपड्यांपेक्षा स्वस्त आहेत. याची किंमत 200 रुपयांपासून आहे.

डेनिमचे शर्ट : जॅकेटस्‌ऐवजी एकच जाड डेनिमचं शर्ट घातल्यास ते जॅकेटचं काम करतं. टी-शर्टपेक्षा शर्टची फॅशन जास्त इन’ आहे. शर्टची किंमतही खिशाला परवडणारी अशीच आहे. शर्टप्रमाणेच दिसणारे मात्र लांबीला शर्टपेक्षा थोडे मोठे टॉपही मुलींसाठी बाजारात उपलब्ध आहेत.

वन पिस
थंडीत पार्टीला जायचं असेल आणि तेही वन पिस घालून तर त्यासाठी डेनिमचा पर्याय योग्य ठरेल. जास्तीत जास्त पार्टीवेअर वन पिस सॅटिन आणि कॉटनमध्ये उपलब्ध असतात. मात्र हे कपडे थंडीत घालणं योग्य नाही. त्या कपड्यांवर जॅकेट घालावं लागतं. मात्र तोच वन पिस जर डेनिमचा असेल तर डेनिम थंडीच्या वातावरणाला योग्य असल्यामुळे त्याचा वापर थंडीत करणं सोयीचं होईल.

– श्रुती कुलकर्णी

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)