पुणे : डेक्कन परिसरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी नदीपात्रातील बाबा भिडे पूलावर वाहतूक पोलीस आणि महापालिकेकडून बोलार्ड लावण्यात आले होते. मात्र, शिस्तीला ठेंगा दाखवित काही अज्ञातांनी हे बोलार्ड रातोरात तोडून टाकले आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीवर आपल्या “शिस्तप्रिय’ भाषेत सल्ले देणाऱ्या पुणेकरांना वाहतूक शिस्तीत रस नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.
दरम्यान, हे “बोलार्ड’ काढणाऱ्या “अज्ञात’ पुणेकरांवर वाहतूक शाखेकडून गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
संभाजी पुलाहून पेठांमध्ये येण्याचे अंतर वाचविण्यासाठी अनेक चारचाकी वाहनचालक भिडे पुलाचा वापर करतात. मात्र, या “शॉर्टकट’मुळे पेठांमध्ये येणाऱ्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी होते. पर्यायाने याचा फटका दुचाकी चालकांना बसत आहे. भिडे पुलावर चारचाकी वाहनांसह अवजड वाहनांना सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत बंदी घालण्यात आली होती. या नियमाचा फलक देखील लावण्यात आला होता.
मात्र पुणेकरांनी या नियमाकडे “कानाडोळा’ करत चारचाकी वाहने भिडे पुलाहून येत असल्याने पेठांमधील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत होती. त्यामुळे वाहतूक शाखेने या रस्त्यांवर गुरूवारी बोलार्ड बसविले होते. मात्र, शुक्रवारी रात्री हे काही बोलार्ड उखडून टाकण्यात आले असून काही फेकून देण्यात आले आहेत. दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दखल वाहतूक पोलिसांकडून घेण्यात आले असून या प्रकरणी अज्ञातां विरोधात गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांनी दिली. मात्र, हे बोलार्ड पुन्हा लावण्यात येणार की नाही याबाबत वाहतूक पोलिसांकडून अद्याप कोणतीही ठोस माहिती देण्यात आलेली नाही.