वाहतूक पोलीस ठोठावणार दरवाजा!

सर्वाधिक दंड थकवणाऱ्या वाहनचालकांच्या घरी जावून करणार वसूल
– वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर सीसीटीव्ही, ई-मशीनद्वारे कारवाई
दोन ते तीन दिवसांत कार्यवाही होणार सुरू

पुणे – वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर सीसीटीव्ही तसेच ई-मशीनव्दारे दंड लावला जातो. दंडाची रक्कम जवळ नसल्यास नंतर भरण्याची मुभाही चालकाला देण्यात येते. मात्र, वर्षानुवर्षे काही वाहनचालकांकडून दंड भरलाच जात नसल्याने दंडाची रक्कम वाढत आहे. वाहतूक पोलिसांनी याची गंभीर दखल घेत सर्वाधिक दंड थकवणाऱ्यांच्या थेट घरी जाऊन वसूल करण्यात येणार आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत ही कार्यवाही सुरू होणार असून लवकरात लवकर दंड भरण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वाहतूक पोलिसांकडून बेशिस्त वाहन चालकांवर दोन प्रकारे कारवाई केली जाते. सीसीटीव्हीच्या माध्यमातून ऑनलाईन तर, पोलिसांच्या माध्यमातून प्रत्यक्ष ई-मशीनव्दारे दंड आकारला जातो. वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी शहरातील अनेक चौकात सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. तर, मुख्य चौकांमध्ये पोलीस स्वतः उभे असतात. ई-मशीनव्दारे कारवाई करताना वाहनचालकाला पकडून दंड भरण्यास सांगितले जाते. अनेकदा पैसे नसल्यास त्याच्या गाडी नंबरवर दंड टाकून नंतर रक्‍कम भरण्यास सांगितले जाते. मात्र, काही वाहनचालकांनी वर्षानुवर्षे याकडे दुर्लक्ष केले आहे. यामुळे अशा वाहनचालकांवरील केसेसचे प्रमाण जास्त असून थकीत दंडाची रक्कम वाढली आहे. काही जणांवर नियमभंगप्रकरणी 20-25 केसेस असल्याचेही समोर आले आहे. या पार्श्‍वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

200 जण हिटलीस्टवर
वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनचालकांकडे 29 कोटींची थकबाकी झाली आहे. याच पार्श्‍वभूमीवर महिन्याभरापुर्वी वाहतूक पोलिसांनी सर्वाधिक दंड थकविलेल्या 200 जणांची यादी सोशल मिडीयावर प्रसिध्द केली होती. तसेच, दंड भरण्याचे आवाहनही केले होते. मात्र, यानंतरही वाहनचालकांनी याकडे दुर्लक्ष केल्याने सर्वप्रथम याच दोनशे जणांना टार्गेट केले जाणार आहे. 200 जणांपैकी 180 जण हे पुणे शहर हद्दीतील असून प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या मदतीने त्यांचे पत्ते शोधून काढण्यात आले आहेत.

एका वाहनावर 32 नियमभंगाच्या केसेस
सर्वाधिक नियम मोडणाऱ्या 200 जणांपैकी एका वाहनावर तब्बल 32 नियमभंगाच्या केसेस असल्याचे समोर आले आहे. असे अनेक वाहनचालक असून त्यांनी थकविलेला दंडही तेवढाच आहे.

सुरवातीला ज्यांनी सर्वाधिक दंड थकवलेला आहे. अशा वाहनचालकांच्या घरी जाऊन दंड वसूल केला जाईल. काही जणांचे पत्ते बदलेले आहेत, तसेच काहींचे हद्दीबाहेरील आहेत. मात्र, सर्वाधिक दंड थकविणाऱ्या 200 जणांची यादी महिन्याभरापुर्वी प्रसिद्ध केली होती. यातील 180 जणांची घरे ही शहर हद्दीतील असल्याने त्यांच्यापासून कारवाईला सुरवात होणार आहे. दरम्यान, इतर वाहनांच्या बाबतीत वेळोवेळी चौकातील वाहतूक पोलीस, नाकाबंदीव्दारे दंड वसूल करण्यात येत आहे.
– तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा

वाहतूक विभागाचा एकूण थकीत दंड – 28 कोटी 77 लाख 74 हजार 121 रुपये
एकूण थकीत दंडाची प्रकरणे – 10 लाख 67 हजार 034 (सीसीटीव्ही तसेच ई-मशीन)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)