वासुंदे तलाव कोरडा ठाक

वासुंदे- पुणे जिल्ह्यातील पूर्व भागात चालू वर्षी पावसाने पुर्णपणे पाठ फिरवल्याने बळीराजा संकटाच्या दृष्टचक्रात सापडला आहे. जिरायत भागात दुष्काळाची छाया गडद होत चालली आहे. संपूर्ण पावसाळ्यात एकही मोठा पाऊस नाही. वासुंदे (ता. दौंड) येथील तलाव ऐन पावसाळ्यातही पूर्णपणे कोरडा पडलेला आहे.
दौंड तालुक्‍यातील वासुंदे, हिगणीगाडा, जिरेगाव, कौठडी, कुसेगाव, पडवी, खोर तसेच परिसरातील शेतकरीही चारा व पाणी टंचाईने पुरता हैराण झाला आहे. जिरायती पट्ट्यात असलेल्या व जानाई शिरसाई उपसा सिंचन, तसेच पुरंदर उपसा सिंचन योजनेतून पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या भागात तीव्र पाणी टंचाई भासू लागली आहे. वन्य प्राणी, पशु-पक्षी, भूचर प्राणी अन्न पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे धाव घेऊ लागलेत.
पशुधन जगवण्यासाठी उस हे पीक चारा म्हणून वापरले जात असून, सध्या उसाला प्रतिटन 2500 ते 2700 रुपये मोजावे लागत आहेत. अत्यल्प झालेल्या पावसावर शेतकऱ्यांनी कोणत्याही पिकांची पेरणी केली नाही. जानाई उपसा सिंचन योजनेतून आवर्तन मिळण्यासाठी मागील काळात आमदार राहुल कुल यांनी सिंचन भवन येथे बैठक घेऊन कार्यालयाकडून पाणी वाटपासाठी हालचाली सुरु झाल्या. पाणीही सुरु झाले; पण तोपर्यंत स्थानिक नागरिक आणि शेतकरी पुरता हैराण झाला आहे.

  • जिरायत क्षेत्रातील शेतकरी सक्षम व्हावा
    अल्प प्रमाणात पेरणी झालेली पिके पाण्यावाचून जळून जात आहेत. नैसर्गिक संकटाशी दोन हात करायला शेतकरी तेवढा सक्षम नाही. शेती वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचा होणारी तळमळ आणि आर्थिक गणित नफ्याऐवजी तोट्यात जाऊ लागले आहे. शेतकरी सावकारी, बॅंक कर्ज यातच कर्जबाजारी होतो आहे, त्यामुळे येणाऱ्या दुष्काळाच्या संकटाशी दोन हात करत तडजोड कशी करायची, या विवंचनेत तो आहे, त्याचमुळे आता सरकारी यंत्रणांनी जिरायत शेतकरी सक्षम शेतकरी होण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याची गरज आहे. दुष्काळामुळे जिरायतीदार शेतकरी पुरता मेटाकुटीस आला आहे. जिरायत भागातील पिण्याच्या पाण्याची, शेतीच्या पाण्याची सोय कायमस्वरूपी होण्यासाठी उर्वरित कामे होणे गरजेचे आहे.संपूर्ण जिरायत भाग फक्त टॅंकरमुक्त करुन दुष्काळीही ओळख पुसण्यासाठी प्रयत्न करावे.
  • जानाई-शिरसाई योजना लोकप्रतिनिधी विसरतात
    नोव्हेंबर व फेब्रुवारी महिन्यात पाणी सुटले तर पिण्याच्या पाण्याची सोय कायमस्वरूपी होऊ शकते, असे जाणकारांचे मते आहेत. प्रत्येक निवडणुकीवेळी लोकप्रतिनिधींना स्थानिक नागरिक उर्वरित जानाई-शिरसाई योजनेच्या कामाची आठवण करून देतात; परंतु लोकनेत्यांना विसर पडतोच कसा, अशा संभ्रमावस्थेत जनता आहे. आजपर्यंत शासकीय पाणीपुरवठा करण्यासाठी शासकीय टॅंकरवर शासनाचे करोडो रुपये पाण्यात खर्च केलेत, तेवढा खर्च प्रशासनाने जानाई-शिरसाई योजना चालवण्यासाठी केल्यास जिरायतीची तहान नक्की भागेल. लोकप्रतीनिधींनी लक्षपूर्वक जानाई-शिरसाई योजनेच्या अपूर्ण कामाबाबतीत जिरायत भागाला न्याय द्यावा. यासाठी फक्त प्रयत्नांची व पाठपुराव्याची गरज आहे.

 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)