वाळवणं…

मराठी महिन्यांचे कॅलेंडर पाहिले की पूर्वीच्या स्त्रियांनी वर्षभरात कोणत्या कोणत्या महिन्यात काय करायचे ही कामे ठरवलेली असायची. चैत्र-वैशाख महिना आला की आंब्याचा हंगाम, परीक्षेचा हंगाम, सुट्टीचा हंगाम तसाच आणखी एक हंगाम म्हणजे स्त्रियांनी वर्षभरासाठी वाळवणं करायचा हंगाम!

वर्षभरातले सण, केळवण, डोहाळे जेवण, मुंज, लग्न यासाठी वर्षभर पुरेल इतकं सगळं करून ठेवायचं त्यातही उपवासाचं वेगळं आणि बिन उपवासाचं वेगळं, असे दोन्ही प्रकार. नैवेद्याला सगळं लागतं असं म्हणून आपल्याच जिभेचे चोचले पुरवायचे, खवय्येगिरीची हौस भागवून घ्यायची त्यामुळे प्रकार तरी किती! पोह्याचे पापड, उडदाचे पाप, नाचणीचे पापड, कुरडई, सांडगे, शेवया, बटाट्याचे पापड, साबुदाण्याचे पापड, बटाट्याचा किस, साबुदाण्याच्या कुरड्या ही यादी आणखीही वाढत जाईल. उन्हाळ्यात मुलांच्या शाळांना सुट्या असल्या की त्यावर राखण करायची जबाबदारी मुलांची!

पूर्वी यासाठी मोलानं माणसं लावायची पद्धत होती. त्यामुळे वाळवणं करायचं काम घरातल्या स्त्रियांचं आणि त्यांना मदतीला शेजार-पाजारच्या स्त्रियांनी यायचं. असंच प्रत्येकीनी एकमेकींना मदत करून हे काम पार पाडायचं अशी पद्धत होती. या वाळवणात गोडा मसाला जो घरी केला जायचा त्यातल्या पदार्थांचाही समावेश असायचा. धुवून वाळवलेले मसाल्याचे पदार्थ भाजायला सोपे जायचे. याशिवाय मसाला भरलेल्या मिरच्या, मोरावळ्याचे आवळे साखर भरून वाळवायला ठेवत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वर्षभरासाठी केलेले पापड, कुरडया, सांडगे हे एखाद्या दिवशी भाजी नसली तरी उपयोगी पडायचे, सांडग्याची भाजी, पापडाची भाजी किंवा आमटी, कुरडईची भाजी यासाठी उपयोग व्हायचा. या गोष्टी पूर्वी तयार विकत मिळत नव्हत्या. त्यामुळे घरात कार्य असेल तर अंदाजे किती तळण लागेल या हिशोबाने भरपूर पापड, कुरडई करत असत. ती भरून ठेवण्याची सुद्धा एक कला होती. पापड पूर्णतः वाळून वाकडे तिकडे झाल्यावर न भरता सतत उलथे पालथे करत राहून त्याचा आकार न बदलता भरल्याने त्यासाठी लहान आकाराचे डबे पुरत असत काही दिवस तसाच डबा उन्हात ठेवला जाई. पूर्वी मोठे वाडे असायचे तेव्ही ही सोय होती. घरं लहान झाली आणि हे पदार्थ विकत मिळू लागले. शहरात सोयीही खूप निघाल्या.

शहरातल्या स्त्रियांनी याबाबतीत एक चांगला विचारही केला आहे तो असा की ज्या स्त्रिया पापड, लोणची करून आपलं पोट भरतायत त्यांना आपण उचलून मदत करू शकत नाही तर त्यांनी केलेल्या पदार्थांची खरेदी करून त्यांना अप्रत्यक्षपणे मदत करावी आणि आजकाल बाजारात गेलं की तयार पापड मिळत असल्याने साठवण करायची गरज नाही.

कोकणात मात्र हे सगळं आजही आहे बरं का! आवर्जून केलं जातं. अहो! आपल्यासाठी, देशावरच्या माणसांसाठी. अलवार पोह्याचे पापड त्यांनीच करावेत. भरलेल्या सांडगी मिरच्याही त्यांनीच कराव्यात आणि आपण ते सगळे पदार्थ मिटक्‍या मारत खावेत.

आपल्याला काही तरी नवीन वेगळं हवं म्हणून आपण त्या पापडावर काही पदार्थ घालून मसाला पापड केले. पालेभाज्या मिसळून त्याचे पापड करत आहोत. दळणवळण वाढल्याने वेगवेगळ्या प्रांतातले वाळवणाचे पदार्थही आपल्याला मिळू लागले आहेत.

– डॉ. नीलम ताटके

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)