वाल्हेकरवाडी रोडवर अवैध मद्य विक्री जोमात

वाकड – विना परवाना मद्य साठा करणे, मद्य विक्री करणे तसेच परवाना नसलेल्या हॉटेलने मद्यपान करु देण्यास परवानगी देणे कायद्याने गंभीर गुन्हा मानला गेला आहे. या कायद्याची चिंचवड-वाल्हेकरवाडी परिसरात राजरोसपणे पायमल्ली होताना दिसत आहे. वाल्हेकरवाडी रोड परिसर या अवैध मद्यपान व विक्रीमुळे कुख्यात होत चालला आहे. संबंधित विभागांकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने याबाबत नागरिकांनी संताप व्यक्‍त केला आहे.

चिंचवड, जुना जकात नाका, चिंचवडे नगर, वाल्हेकर वाडी, या परिसरात अनेक लहान मोठी व्हेज-नॉनव्हेज हॉटेल्स आहेत. एखादे हॉटेल अपवाद सोडले तर जवळपास सगळ्याच हॉटेल, चायनीज, अंडाभुर्जी गाड्यांवर सर्वत्र बेदिक्कतपणे तळीराम दारु ढोसताना दिसतात. बेकायदेशीर मद्यविक्री आणि मद्यपान करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणारा राज्य उत्पादन शुल्क विभाग नक्की अस्तित्वात आहे का ? अशी परिस्थिती तयार झाली आहे. अवैध धंद्यावर कारवाईचा अधिकार स्थानिक पोलिसांना सुद्धा आहे. परंतु दुर्लक्ष करुन एकप्रकारे अवैध धंद्यांना देण्यात आलेले अभय पोलिसांवरही प्रश्‍नचिन्ह उभे करत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोलिसांकडून दाखवण्यात येत असलेल्या अकार्यक्षमतेबाबत स्थानिक नागरीक संताप व्यक्‍त करत आहेत. बेकायदेशीर धंद्यांना पोषक असे वातावरण निर्माण झाले असल्याने या परिसरात व्यसनाधीनता खूपच अधिक फोफावत आहे. सामाजिक संघटना आता हे बेकायदेशीर धंदे बंद पाडण्यासाठी तीव्र आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.

आमच्याकडून अशा अवैध हॉटेल्सवर सतत कारवाई केली जाते. विनापरवाना मद्य साठा, मद्य विक्री तसेच मद्यपान करू देण्यास परवानगी देणे गंभीर गुन्हा आहे. अशा हॉटेल्स वर दंडात्मक तसेच प्रतिबंधक कारवाई केली जाते. पुढील काळात अशा हॉटेल्सला चपराक बसण्यासाठी कडक तसेच कठोर पाऊले उचलली जातील. यातील काही हॉटेल्स अनधिकृत आहेत तर काहींनी अतिक्रमण केले आहे. या संदर्भात संबंधित विभागांसोबत पत्रव्यवहार केला असून कडक कारवाई करण्यात येणार आहे.
– विठ्ठल कुबडे – वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चिंचवड

वाल्हेकरवाडी रोडवरील विनापरवाना दारु विक्री करणारी हॉटेल्स ही कायमस्वरूपी बंद करायला हवती. परंतु तसे होताना दिसत नाही, कधीतरी कारवाईचा दिखावा केला जातो आणि पुन्हा ते हॉटेल्स जोमात सुरु होतात. व्यावसायिकांवर पोलिसांचा वचक राहिला नाही. फक्‍त अवैध हॉटेल्स नाहीतर या परिसरातील इतर अवैध धंदे देखील बंद व्हायला हवेत. यामुळे वाल्हेकरवाडी रोड आणि परिसराचे नाव विनाकारण बदनाम होत असून याचा सर्वसामान्य नागरिकांना त्रास होतो.
-सुमेद खंडारे, अध्यक्ष, तथागत प्रतिष्ठान, वाल्हेकरवाडी .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)