वाढत्या गुन्हेगारीने ताथवडे हादरले

रोहिदास धुमाळ

वाकड – शांत परिसर अशी ओळख असणाऱ्या ताथवडेतील वातावरण गेल्या सहा महिन्यांत खूपच भितीदायक झाले आहे. शहर व ग्रामीण पोलिसांच्या हद्दीच्या वाद गुन्हेगारांच्या पथ्यावर पडत आहे. सातत्याने वाढत्या गुन्हेगारीमुळे या परिसरातील नागरिकांमध्ये असुरक्षेची भावना वाढली असून गुन्हेगारांवरील पोलिसांचा धाक कमी होत असल्याचीही तक्रार स्थानिक करीत आहेत.

खून, खुनी हल्ले, चोऱ्या, जीवे मारण्याच्या धमक्‍या, गाड्यांची तोडफोड, दहशत माजवणे अशा प्रकारच्या काही घटनांनी वातावरण गढूळ झाले आहे. “सद्‍रक्षणाय – खल निग्रहणाय’ असे ब्रीद असणाऱ्या पोलिसांना आता गुन्हेगार भीत नाहीत. सज्जन मात्र भितीच्या सावटाखाली जगत आहे. ताथवडे व आसपासच्या परिसरात एकामागून एक गुन्हेगारी घटना पाहता पोलिसांचे गुन्हेगारांवरील नियंत्रण सुटले आहे.

या आठवड्याच्या सुरुवातीलाच सोमवार दि. 23 ला मध्यरात्री दहा ते बारा जणांच्या टोळक्‍याने दहशत माजवणाच्या उद्देशाने 13 वाहनांची तोडफोड केली. हातात तलवार, गज घेऊन दहा ते बारा जणांच्या टोळक्‍याने आरडा-ओरडा करीत परिसरात हैदास घातला. अशा घटनांना चाप बसवण्यात पोलिसांना येणारे अपयश नागरिकांची भिती अधिकच वाढवत आहे.

दि. 14 नोव्हेंबरला दोन गटांतील वाद सोडवण्यासाठी गेलेल्या सौरभ उर्फ आदिनाथ पवार यांच्यावर भर दुपारी ताथवडे येथील नवले पेट्रोल पंपाजवळ सात ते आठ जणांच्या टोळक्‍याने कोयता, तलवारीने जीवघेणा हल्ला केला. या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद होऊन 24 तास उलटले नाहीत, तोच येथील सोनवणे वस्तीमध्ये सतीश गुलाब सोनवणे याच्या तोंडावर वार करून निर्घृण खून केला व महिना उलटत नाही तोच चहाच्या टपरीवर धक्‍का लागल्याच्या कारणावरून एकावर जीवघेणा हल्ला झाला. एवढेच नव्हे तर गेल्याच आठवड्यात वाहनाची कागदपत्रे मागणाऱ्या पोलिसांना सुद्धा हात-पाय तोडण्याची धमकी देण्याचा प्रकार घडला. पोलिसांसोबतच असे वर्तन होत असेल, तर सामान्य नागरिकांना किती त्रास सहन करावा लागत असेल?

पाठबळ कुणाचे?
अशा घटना घडल्यानंतर वारंवार काही नावे चर्चेत येतात. या नावांची मोठी दहशत या परिसरात आहे. या गुंडांना नेमके कुणाचे पाठबळ आहे, यावर ही परिसरात उलट-सुलट चर्चा आहे. अशा गुंडांना पाठीशी घालणाऱ्या राजकीय वर्चस्वाला झुगारुन पोलिसांनी त्यांच्या मुसक्‍या आवळण्याची गरज असल्याचे नागरिकांचे मत आहे. वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एवढ्या मोठ्या प्रमाणात गुंडगिरी वाढत चालली आहे की, काही महिन्यांपूर्वी लोकप्रतिनिधीं थेट पुणे शहर पोलीस आयुक्‍तांकडे गेले होते.

मोठा विस्तार आणि ग्रामीणची हद्द
वाकड पोलीस ठाण्याअंतर्गत परिसर खूप मोठा आहे. त्या मानाने पोलीसबळ कमी आहे. दुसरी समस्या म्हणजे महामार्ग ओलांडला की ग्रामीण पोलिसांची हद्द सुरू होते. गुंडांचे इकडून-तिकडे आणि तिकडून-इकडे येणे वारंवार सुरू असते. हद्दीचा चांगलाच फायदा गुंड घेतात. पिंपरी चिंचवड शहराचे स्वतंत्र पोलीस आयुक्‍तालय सुरु झाल्यानंतर पोलीस स्टाफ वाढेल आणि हद्दीचा प्रश्‍नही मिटेल.

अवैध धंद्यांमुळे गुन्हेगारी वाढली
मुंबई-बंगळुरु महामार्गा व परिसरात मध्यरात्री उशिरापर्यंत सुरू असणारी हॉटेल्स, खाद्य पदार्थांच्या गाड्या, अवैध मद्य विक्रीची हॉटेल्स, चायनीज स्टॉल्स यामुळे स्थानिकच नव्हे, तर बाहेरील गुंडांचे रात्रीच्या वेळी येथे येणे-जाणे अधिकच वाढले आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीच या सर्व प्रकारांत गांभिर्याने लक्ष घालून ताथवडे गाव आणि परिसरातील अवैध धंदे आणि गुन्हेगारी घटनांना आळा घालावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

ताथवडे आणि परिसरात मागील काही महिन्यांत ज्या गुन्हेगारी घटना घडल्या, त्यातील सर्वच आरोपींना जेरबंद केले आहे. बहुतेक घटना आपसांतील वैमनस्यातून झाल्या. तरुण व्यसनाकडे वळण्याचे प्रमाण वाढले आहे. बहुतेक गुन्हे हे तरुण नशेच्या आहारी जाऊन करतात. पोलीस यंत्रणा सक्षम असून कोणालीही पाठीशी न घालता कडक कारवाई करत आहे व भविष्यातही करीत राहील.
– सुनील पिंजण, पोलीस निरीक्षक (गुन्हे), वाकड पोलीस ठाणे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)