वाचनालयाच्या लढाईत लेवेंची कदमांवर मात

-सातारा नगर पालिका सर्वसाधारण सभा
-10 विरूध्द 19 मतांनी चौकशी समितीचा
-अहवाल मंजूर
-भुयारी गटार योजनेवरून जोरदार खडाजंगी

सातारा  – येथील मंगळवार तळे परिसरातील वाचनालयाच्या लढाईत सातारा विकास आघाडीचे नगरसेवक वसंत लेवे यांनी नगरविकास आघाडीचे नगरसेवक अविनाश कदम यांच्यावर मात केली. वाचनालयासाठी चौकशीसाठी नेमलेल्या समितीचा अहवाल स्विकारण्यासाठी मांडलेला ठराव 10 विरूध्द 19 मतांनी मंजूर करण्यात आला. तर भाजपने तटस्थ भूमिका घेतली. दरम्यान, शहरात सुरू असलेल्या भुयारी गटार योजनेच्या कामावरून विरोधकांनी सडकून टिका करत प्रसंगी काम थांबविण्याचा इशारा दिला. त्यावर डी.जी.बनकर यांनी मध्यस्थी करत लवकरच या विषयावर बैठक लावण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर विरोधक शांत झाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नगर पालिकेने वाचनालयाला पुस्तके व फर्निचर देताना चुकीचा ठराव करण्यात आला होता तसेच ते वाचनालय अनेक वर्षापासून बंद अवस्थेत आहे, असा आरोप वसंत लेवे यांनी सप्टेंबर महिन्यातील सर्वसाधारण सभेत केला होता. त्यावर आरोपांची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली होती. बुधवारी झालेल्या सर्व साधारणसभेत विषय पत्रिकेवरील समितीचा अहवाल स्विकारण्याचा विषय मंजूरीसाठी मांडण्यात आला. त्यावेळी अविनाश कदम यांनी आक्षेप घेत नेमण्यात आलेली समिती नियमबाह्य आहे त्यामुळे अहवाल स्विकारल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्याचा अप्रत्यक्ष इशारा सत्ताधाऱ्यांना दिला. त्यावर लेवे यांनी नगरपालिका अधिनियम सांगितल्यानंतर अधिकाऱ्यांनी नगराध्यक्षांच्या अधिकारात आणि नियमानुसारच समिती स्थापन करण्यात आली असल्याचे सांगितले. परंतु कदम आपल्या आक्षेपावर ठाम होते. अखेर लेवे यांनी ठरावासाठी मतदान घेण्याची मागणी केली. त्यावर नगराध्यक्षांच्या सूचनेनुसार मतदान घेण्यात आले. ठरावाच्या विरोधात नगरविकास आघाडीच्या 10 नगरसेवकांनी तर ठरावाच्या बाजूने सातारा विकास आघाडीच्या 19 नगरसेवकांनी हात उंचावून मतदान केले. तर भाजपच्या पाच नगरसेवकांनी तटस्थ भूमिका घेतली व अखेर वाचनालयाच्या लढाईत लेवेंनी बहुमतांनी कदमांवर मात केल्याची कुजबुज सभागृहात रंगली.

दरम्यान, शहरात सध्या असलेल्या भुयारी गटार योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे तर होतच आहे. त्याचबरोबर या कामामुळे पाण्याच्या पाईप वारंवार फुटत असल्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याचा मुद्दा लिना गोरे, सिध्दी पवार, अविनाश कदम यांच्यासह नगरसेवकांनी मांडला. तर पवार यांनी येत्या पावसाळ्यात अशाच प्रकारे काम सुरू राहिले तर ड्रेनेज, चिख्खल आणि पिण्याच्या पाण्याचा एकत्रित मुद्दा उपस्थित होणार असल्याने प्रसंगी काम थांबविण्याची मागणी केली. त्यावर नगराध्यक्षा माधवी कदम संतप्त झाल्या. त्या म्हणाल्या, योजनेचा विषय सभागृहात मंजूर करताना नगरसेवकांनी हा विचार करायला हवा होता. असे सांगताच नगरसेवक संतप्त झाले. या विषयावरून वाद वाढणार असल्याचे वेळीच ओळखून डी.जी.बनकर यांनी मध्यस्थी केली व या विषयावर नगराध्यक्ष, विरोधीपक्षनेते आणि भाजप नगरसेवकांची बैठक आयोजित करून मार्ग काढण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर नगरसेवक शांत झाले.

नगरसेवक शेखर मोरे यांनी कोल्हाटी व वैदू समाजातील 75 नागरिकांनी राष्ट्रीय एकात्मता घरकुल योजनेसाठी 30 हजार रूपये भरून देखील त्यांना अद्याप घरकुले मिळाली नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर मुख्याधिकाऱ्यांनी लवकरच तो प्रश्‍न सोडविण्याची ग्वाही दिली. तर दिपलक्ष्मी नाईक यांनी पंताचा गोट येथील बोअर बंद असल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर पाणीपुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर यांनी निधी मंजूर झाला असून बोअर सुरू करण्याचे आश्‍वासन दिले. दरम्यान, यावेळी सभेच्या विषय पत्रिकेवरील 20 विषयांना सभागृहात मंजुरी देण्यात आली.

यावेळी सदरबझार येथील रस्ते डांबरीकरण कामासाठी 10 लाख, केसरकर पेठतील जाधव घर रस्ता डांबरीकरणासाठी 11 लाख, 42 हजार आणि बसपा पेठ, भोसले नगर ते तोडकर कॉलनी रस्ता डांबरीकरणासाठी 9 लाख 92 हजार 990 तर सोनगाव कचरा डेपो येथे ट्रान्सफॉर्मर, विद्युत पोल व लाईट टाकण्यासाठी 13 लाख 60 हजार रुपये खर्चाच्या अंदाजपत्रकाच्या या विषयांना सभेत मंजुरी देण्यात आली.

खंदारे करणार “साविआ’चा जाहीर सत्कार

नगरविकास आघाडीचे नगरसेवक बाळासाहेब खंदारे जेव्हा बोलण्यासाठी डायसकडे जाण्यासाठी निघाले तेव्हा नगराध्यक्षांनी खंदारेंना दोन मिनिटांमध्ये मुद्दा मांडण्याची सूचना केली. त्यावर खंदारे म्हणाले, आज मी चांगले बोलणार आहे असे सांगताच नगराध्यक्षांनी त्यांचे अभिनंदन केले. खंदारेंनी पुढे विषय मांडताना म्हणाले, येत्या काही दिवसांमध्ये स्थायी समितीची सभा होणार आहे. ही सभा ऐतेहासिक ठरणार आहे. कारण, या सभेच्या विषयपत्रिकेवर मंजूरीसाठी तब्बल 382 विषय घेण्यात आले आहेत. हे विषय मंजूर झाले तरी त्यासाठी निधीची तरतूद करा. तरतूद केल्यास शहराचा कायापालट होणार आहे. त्यामुळे अशा प्रकारे कार्यवाही केल्यास सातारा विकास आघाडीचा आपण जाहीर सत्कार करू. मात्र, जनतेला नुसतीच गाजरे दाखविणार असाल तर आपण त्या गाजरांचा हलवा करू, असा उपरोधिक टोला खंदारे यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला.

कदम साहेब….
तुम्ही सांगायला चुकला
भुयारी गटार योजनेच्या कामावरून विरोधी नगरसेवक सत्ताधाऱ्यांवर तुटुन पडले असताना अविनाश कदम यांनी नव्या वादाला तोंड फोडले. भुयारी गटार योजनेसाठी खोदकाम होत आहे मात्र, रस्ते दुरूस्तीचे काय असा सवाल उपस्थित करताना आघाडी सरकारच्या काळात शहरातील रस्त्यांसाठी आ.शिवेंद्रसिंहराजे यांच्या प्रयत्नातून तत्कालिन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 110 कोटी रूपये दिल्याचा उच्चार केला. त्यावर ऍड.डी.जी.बनकर यांनी कुठे आणि कसा दिला निधी, असा प्रश्‍न कदम यांना विचारला. त्यावर कदमांनी त्यावेळी नगरपालिकेने अजित पवार यांच्या अभिनंदन ठराव केला असल्याची आठवण सांगितली. त्यामुळे सातारा विकास आघाडीचे नगरसेवक संतप्त झाले व कधी झाला ठराव…सभा सांगू नका असे कदमांना सुनावले. दरम्यान, खंदारे यांनी बोलताना या विषयाचा धागा पकडला व म्हणाले..कदम साहेब तुम्ही सांगायला चुकला. ते काम दोन्ही महाराजांमुळे झाले, असे सांगताच सभागृहात एकच हशा पिकला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)