वाघोलीत आढळले 783 बोगस मतदार

वाघोली- वाघोलीतील जवळपास तीन हजारांपेक्षा अधिक नावे 2017 मध्ये राबविण्यात आलेल्या विशेष मतदार नोंदणी मोहिमे अंतर्गत मतदार यादीमध्ये लावण्यात आली होती. मात्र या मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणात बोगस मतदार असल्याची तक्रार निवडणूक विभागाकडे करण्यात आली होती. यानुसार मतदार यादीतून 2657 नावांची यादी अंतिम करीत 783 बोगस नावे वगळण्याच्या सूचना मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी दिल्याने तहसीलदारांनी वाढीव नावे वगळली आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, नवीन मतदारांची नोंदणी करण्यासाठी दि. 1 जुलै ते 31 जुलै 2017 मध्ये विशेष मतदार नोंदणी मोहीम राबविण्यात आली होती. यामध्ये वाघोलीत जवळपास 3400 नावांचा समावेश मतदार यादीत करण्यात आला होता. यादीत समाविष्ट केलेल्या नावांची तपासणी केली असता अनेक नावे बोगस आढळल्याच्या तक्रारी येऊ लागल्या. यानुसार मतदार यादीत समाविष्ट 3400 पैकी मोठ्या प्रमाणात नावे बनावट असल्याची तक्रार आमदार बाबुराव पाचर्णे व माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास दाभाडे यांनी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती.

यानुसार उच्चस्तरातून झालेल्या घडामोडीनंतर हवेली तहसीलदार कार्यालयाच्या वतीने वाघोलीतील मतदार यादीमध्ये समाविष्ट मतदारांचे अर्ज शिरूर तहसीलदार कार्यालयाकडून मागविण्यात आले. शिरूर तहसीलदार कार्यालयाकडून 3192 अर्ज हवेली तहसीलदार कार्यालयाकडे पाठविण्यात आले होते. 3192 मतदारांच्या अर्जासह इतर तक्रार केलेल्या मतदारांची नोव्हेंबर महिन्यामध्ये बीएलओ मार्फत घरोघरी जाऊन चौकशी करण्यात आली. यानुसार मतदार यादी भाग क्रमांक 216 ते 239 मध्ये 2657 मतदारांचा रहिवास आढळून आला तर 783 मतदार रहिवासी नसल्याचे आढळून आले.

783 मतदारांची यादी वाघोली ग्रामपंचायत निवडणुकीच्या दिवशी ठेवण्यात आली होती. मात्र, यातील कोणताही मतदार मतदान करण्यासाठी आला नाही, त्यामुळे 783 मतदारांची नावे मतदान यादीतून वगळण्याचे आदेश मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी दिले होते. प्राप्त आदेशानुसार हवेली तहसीलदार कार्यालयाकडून 783 नावे वगळण्यात आली आहेत.

मतदार यादी भाग क्रमांक व कंसात वगळलेली नावे
216(127), 217(117), 218(65), 219(6), 220(13), 221(9), 222(41), 223(42), 224(1), 225(8), 226(13), 227(5), 228(34), 229(9), 230(1), 231(1), 232(40), 233(25), 234(64), 235(58), 236(65), 237(18), 238(20), 239(1)

प्राप्त आदेशानुसार वाघोलीतील 783 नावे 28 मार्च रोजी वगळण्यात आलेली आहेत. वगळण्यात आलेली नावे सध्या निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर दिसत असली तरी आयोगाने यादी अपडेट केल्यानंतर सदरची नावे दिसणार नाहीत.
– सुनील शेळके, नायब तहसीलदार


मतदारांची नावे लावताना बोगस कागदपत्रांचा आधार घेऊन नावे यादीत लावली गेली आहेत, अशी जवळपास 700 नावे वगळण्यात आली असली तरी यापूर्वी सुद्धा बनावट नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. या नावांची सुद्धा चौकशी करण्यात यावी. त्याचप्रमाणे बोगस कागदपत्रे तयार करणाऱ्यांची चौकशी पोलीस यंत्रणेमार्फत करण्यात यावी.
– रामदास दाभाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)