वाघोलीत अतिक्रमणांचा प्रश्‍न चिघळला

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना मारहाण : जेसीबीही फोडला ; तरुण बेशुद्ध पडला, वादावादी

वाघोली – भैरवनाथ तळ्याच्या पाठीमागे गायरान जमिनीवर पावसाळ्यापूर्वीची कामे करण्यासाठी गेलेल्या वाघोली ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी जेसीबीच्या साहाय्याने काम करीत असताना वाढीव अतिक्रमण काढताना तरुण जेसीबीसमोर बेशुद्ध पडल्याची घटना सोमवारी (दि. 17) दुपारी घडली.

ग्रामपंचायत कर्मचारी व अतिक्रमणधारक नागरिकांमध्ये वाद झाल्यानंतर संतप्त जमावाने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना मारहाण करून जेसीबीवर दगडफेक केली. ग्रामपंचायतीच्या अनधिकृत कारवाईचा निषेध करून संतप्त जमावाने ग्रामसेवकाला अटक करण्याची मागणी करीत ग्रामपंचायत व केसनंद फाटा पोलीस चौकीवर मोर्चा काढला. अखेर प्रशासकीय कारवाईचे आश्‍वासन मिळाल्यानंतर जमाव शांत झाला. दरम्यान, तणावाचे वातावरण निर्माण झाल्यानंतर लोणीकंद पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. वाघोली ग्रामपंचायतीचा जेसीबी व कर्मचारी भैरवनाथ तळ्याच्या पाठीमागील बाजूस गायरान क्षेत्रामध्ये कामे करण्यासाठी गेले होते. कर्मचाऱ्यांनी वाढीव अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली. तेथील तरुण विरोध करताना जेसीबीसमोर बेशुद्ध झाला. यावेळी कर्मचारी व अतिक्रमणधारकांमध्ये वाद व बाचाबाची झाली. जेसीबीच्या धक्‍क्‍याने तरूण बेशुद्ध झाल्याचा आरोप करीत संतप्त नागरिकांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना मारहाण करीत जेसीबीवर दगडफेक करून काचा फोडल्या.

ग्रामपंचायतीने अनधिकृतपणे कारवाई केल्याचा निषेध नागरिकांनी केला. तणावाचे वातावरण निर्माण झाल्यानंतर लोणीकंद पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. ग्रामपंचायतविरोधात घोषणाबाजी करीत ग्रामसेवकांना अटक करा, अशी मागणी केली. हा मोर्चा संतुलन संस्थेचे बस्तू रेगे व पल्लवी रेगे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत व केसनंद फाटा येथील पोलीस चौकीवर जाऊन धडकला. दरम्यान, जमावाने पुणे-नगर महामार्गावर केसनंद फाटा येथे रस्ता रोको करण्याचा प्रयत्न केला.

बेशुद्ध पडलेल्या तरुणाची प्रकृती स्थिर
कारवाईवेळी जेसीबीसमोर बेशुद्ध पडलेल्या रामेश्‍वर बाबासाहेब कारके याला वाघोलीतील लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. प्राथमिक उपचार व काही चाचण्या केल्यानंतर तरुणाला मुक्‍का मार लागल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. त्याची प्रकृती स्थिर असून पुढील उपचारासाठी त्याला रुबी हॉल येथे हलविण्यात आले आहे.

पोलिसांकडून समन्वयातून तोडगा
पोलिसांच्या समन्वयाने जमाव पोलीस चौकीमध्ये दाखल झाला. ग्रामसेवकांना अटक करण्याची मागणी करून जमावाने पोलीस चौकीमध्येच ठिय्या आंदोलन सुरु केले. सरपंच वसुंधरा उबाळे, संतुलनचे बस्तु रेगे, पल्लवी रेगे, अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, पोलीस निरीक्षक डी. एस. हाके यांनी चर्चा करून मार्ग काढला. ग्रामपंचायत पदाधिकारी व जेष्ठ लोकप्रतिनिधींनी या प्रकरणाची चौकशी करून कर्मचारी, ग्रामसेवक दोषी आढळल्यास प्रशासकीय कारवाई करण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर जमावाने नरमाईची भूमिका घेतली. बेशुद्ध पडलेल्या तरुणाचा वैद्यकीय खर्च ग्रामपंचायत करेल, असे आश्‍वासन दिले. जुन्या अतिक्रमणाला ग्रामपंचायत हात लावणार नाही. परंतु वाढीव अतिक्रमण केल्यास ग्रामपंचायतीला कारवाई करावी लागेल, असे सांगण्यात आले. उपस्थित अतिक्रमणधारकांनी वाढीव अतिक्रमण करणार नसल्याचे स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)