वाघोलीतील कचरा समस्याविरोधात नागरिकांचा मोर्चा

मास्क लावून केला निषेध ; नागरिकांनी ग्रामपंचायत, ठेकेदाराला विचारला जाब

वाघोली- वाघोलीत दिवसेंदिवस बिकट होत चाललेल्या घनकचरा व्यवस्थापन प्रश्‍नांचा तोडगा काढण्यासाठी व प्रशासनास जाब विचारण्यासाठी वाघोलीतील नागरिकांच्या वतीने तोंडाला मास्क बांधून प्रतिकात्मक मूक मोर्चा शनिवारी (दि. 30) सायंकाळी काढण्यात आला. नागरिकांनी कचरा प्रक्रिया प्रकल्पावर मोर्चा नेऊन प्रकल्पाची स्थिती विचारत कचरा प्रश्नावर ग्रामपंचायत व ठेकेदाराला जाब विचारला.

मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी वाघेश्वर मंदिर येथे सायंकाळी नागरिक जमा झाल्यानंतर निषेधाची पत्रके हातात घेऊन मूक मोर्चा वाघेश्‍वरनगर येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पावर धडकला. याठिकाणी उपस्थित ग्रामविकास अधिकारी व ठेकेदारांनी प्रकल्पाची माहिती दिली. याचदरम्यान ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य उपस्थित झाले. नागरिकांनी ग्रामपंचायत पदाधिकारी व ठेकेदाराला कचरा समस्येवर तोडगा काढण्यासाठी होत असलेल्या विलंबाबाबत जाब विचारला. यावेळी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी देखील नागरिकांच्या प्रश्‍नांचे निरसन केले. याप्रकरणी लवकर प्रश्‍नावर तोडगा काढण्याविषयी ग्रामपंचायतीची भूमिका समजल्यानंतर नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालयावर न जाता प्रकल्पावरच मोर्चा स्थगित केला.

मोर्चा स्थगित करण्यात आल्यानंतर ठेकेदाराने दिलेल्या शब्दांनुसार दि. 10 एप्रिलपर्यंत कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू होण्याची प्रतीक्षा करणे, त्यानंतर प्रकल्प सुरू झाला नाही तर ग्रामसभा घेऊन ठेकेदारावर कारवाई करून पुढील दिशा ठरविण्याचा निर्णय घेण्यात आला. ओला व सुका कचरा वेगवेगळा करण्याविषयी नागरिकांमध्ये जनजागृती,
कचऱ्याविषयी जॉइंट कमिटी करून जनजागृती व कचऱ्यावर लक्ष ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. कचरा गोळा करण्यासाठी ग्रामपंचायतीला मिळालेल्या गाड्या 1 एप्रिल पासून कार्यान्वित होणार आहे. त्यामुळे कचऱ्याचा असलेला ढीग इतर ठिकाणी हलविण्यात येईल तशा सूचना नागरिकांना दिल्या जाणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.