वाकी खुर्दच्या सरपंचांवर अविश्‍वास ठराव

वाकी- पुणे-नाशिक महामार्गावरील वाकी खुर्द (ता. खेड) येथील ग्रामपंचायतीचे सरपंच कैलास मारुती गायकवाड यांच्यावर आठ ग्रामपंचायत सदस्यांनी खेडच्या तहसीलदारांकडे अविश्‍वास ठराव दाखल केला आहे. त्यामुळे बुधवारी (दि. 1 ऑगस्ट) वाकी खुर्द ग्रामपंचायत येथे विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
अनुसूचित जातींसाठी आरक्षित असलेल्या मात्र, सुरुवातीचे तब्बल दोन वर्ष रिक्‍त राहिलेल्या सरपंचपदावर या प्रवर्गातील एकमेव सदस्य असलेल्या कैलास गायकवाड यांची आठ महिन्यापूर्वी अत्यंत नाट्यमय घडामोडीनंतर बिनविरोध निवड करण्यात आली होती मात्र, आता ही निवड कचाट्यात सापडली आहे. सरपंच मनमानी कारभार करतात, सदस्यांनी ठरविलेल्या ठरावाप्रमाणे कामकाज करीत नाहीत, ग्रामपंचायतीमध्ये नवीन कामगार भरती करून जुन्या कामगारांना काम करू देत नाहीत, असे गंभीर आरोप वाकी खुर्दच्या ग्रामपंचायत सदस्यांनी खेडच्या तहसीलदार कार्यालयात दाखल करण्यात आलेल्या अविश्वास ठरावात केले आहेत. तर आठ सदस्यांनी दाखल केलेल्या अविश्‍वास ठरावामुळे बुधवारी वाकी खुर्द ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे, असे तहसीलदार कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, एक वर्षे पूर्ण होण्या अगोदरच 9 पैकी 8 सदस्यांनी सरपंचावर अविश्‍वास ठराव दाखल केला आहे. अविश्‍वास ठरावावर उपसरपंच रामदास जाधव, भगवान काळे, छाया जाधव, चैताली कड, नंदा रोकडे, कल्पना वहिले, शारदा जाधव, मंगल सुंबरे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

  • सरपंचपदाची निवड होऊच नये, अशी काहींची इच्छा होती. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशामुळे निवड प्रक्रिया राबविण्यात आली. सरपंच निवड होऊ नये, यासाठी विशेष सभेला एकही सदस्य उपस्थित राहिला नाही. तरीही निवड झाली. त्यानंतर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना फूस लावून तीन महिने गैरहजर राहण्यास सांगण्यात आले.
    – कैलास गायकवाड, सरपंच, वाकी खुर्द
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)