जगाच्या पाठीवर अनेक अद्भुत ठिकाणे पाहायला मिळतात. काही ज्ञात आहेत तर काही अज्ञात. अशा अज्ञात ठिकाणांची माहिती मिळाली की सर्व जग थक्क होवून ते पाहत असते. इंग्लंडमधील “मदर्स केव्ह’ धबधबाही असाच अनोखा आहे. या धबधब्याचे वैशिष्ट म्हणजे या पाण्यामुळे अनेक वस्तू चक्क दगडासारख्या बनतात. अर्थात ही सर्व किमया धबधब्याच्या पाण्यातील विशिष्ट रसायनांची आहे! तेथील प्रशासन लोकांनाही या पाण्यापासून दूरच राहण्याचा सल्ला देतात.
मात्र कुतुहलापोटी अनेक लोक पाण्यात काही वस्तू आणून ठेवतात आणि कालांतराने त्याचे बदललेले रूप पाहण्यासाठी येतात. या पाण्यात चुनखडीचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे वस्तुंवर “पेट्रीफिकेशन’ नावाची प्रक्रिया सुरू होते.
तेथील एका कलाकाराने या पाण्याचे वैशिष्ट्य लक्षात घेऊन तिथे काही वस्तू टांगून ठेवल्या. आता त्यांचे स्वरूपही दगडासारखेच झाले आहे आणि त्या एखादी शिल्पकृती असल्यासारख्या दिसत आहेत. या वस्तूंमध्ये टेडी बिअरपासून सायकलीपर्यंत अनेक वस्तुंचा समावेश आहे. धबधब्याचे हे वैशिष्ट्य रासायनिक कारणांमुळे असले तरी इंग्लंडसारख्या “विकसित’ देशातही याबाबत अंधश्रध्दा आहेतच.
हा सर्व प्रकार मदर शिप्टन नावाच्या एका चेटकीणीच्या शापामुळे झाला असल्याचे स्थानिक लोकांचे म्हणणे आहे. सन 1600च्या दरम्यान ही चेटकीण धबधब्याच्या गुहेत राहत होती, असे सांगितले जाते. पाण्याच्या संपर्कात येणाऱ्या वस्तु दगड बनतात हे रासायनिक कारणामुळे असले तरी पाण्यात हे रासायनिक कारण तयार होण्याचे मूळ कारण तिचा शापच असल्याचे तेथील लोकांचे म्हणणे आहे!
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा