वल्लभनगर आगारात शुकशुकाट

पिंपरी – मराठा समाजाला आरक्षण मिळावे या करिता राज्यभरात मराठा समाजाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज्यात ठिकठिकाणी एस. टी. बस जाळण्याच्या घटना घडत असल्याने बंदची हाक दिलेल्या ठिकाणच्या गाड्‌यांच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच वल्लभनगर आगारात मराठवाड्यातील बस परत आल्या नाहीत. त्यामुळे वल्लभनगर आगारात शुकशुकाट पसरला होता.

वल्लभनगर आगारातून मुंबईला जाणाऱ्या सर्व गाड्या तसेच पुणे-गोंदवले, पुणे-केळशी या गाड्या बुधवारी (दि. 25) रद्द करण्यात आल्या. वल्लभनगर आगारात रोज साधारण 40 गाड्यांच्या फेऱ्या होतात व सुमारे 21 हजार किलोमीटर गाड्या धावतात. मात्र बुधवारी दुपारी 3 वाजेपर्यंत फक्त 21 गाड्याच डेपोच्या बाहेर पडल्या होत्या. “बंद’ची हाक दिलेल्या मुंबई, नाशिक, औरंगाबाद व नगर येथे गेलेल्या बस आगारात परतल्या नाहीत. यामुळे त्याठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला. तर काही गाड्यांच्या फेऱ्या प्रवासीच नसल्या कारणाने रद्द कराव्या लागल्या, अशी माहिती वल्लभनगर आगार प्रमुख संजय भोसले यांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गाड्यांची तोडफोड होईल म्हणून रस्त्यावर काढत नव्हते. तर अन्य आगारातील काही गाड्या गेल्या दोन दिवसांपासून वल्लभनगर आगारात अडकून पडल्या असल्याने चालक व वाहकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वल्लभनगर आगारातून पंढरपूर यात्रेसाठी 15 जादा गाड्या सोडल्या आहेत. मात्र यावर्षी म्हणावा तसा प्रवाशांचा प्रतिसाद नाही, असे मत एस. टी. कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले. वल्लभनगर आगारात अडकून पडलेले गाड्यांचे चालक व वाहक मोर्चा कधी संपणार याच्या प्रतिक्षेत आहेत.

मंगळवारी रात्री दहा वाजता आम्ही धुळे येथून गाडी घेऊन वल्लभनगर आगारात पोहचलो. मात्र आंदोलनामुळे गाडीची तोडफोड होईल म्हणून येथेच अडकलो आहोत. गाडीची तोडफोडीची जबाबदारी डेपो घेत नसल्याने गाडी रस्त्यावर काढणे कठीण झाले आहे.
– बाजीराव भगनूर, वाहक, धुळे आगार

मला महत्त्वाच्या कामासाठी बीडला जायचे आहे. मात्र सकाळपासून वल्लभनगर आगारात बीडसाठी गाडीच आली नसून तिकडे जाणाऱ्या सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, असे आगाराकडून सांगण्यात येत आहे.
– अमोल कापसे, प्रवासी युवक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)