वल्लभनगर आगाराची सुरक्षितता ऐरणीवर

पिंपरी – एस. टी. महामंडळाच्या वल्लभनगर येथील आगारात शनिवारी (दि. 25) एका मद्यपी प्रवाशाने वाहतूक नियंत्रकास शिविगाळ करुन धक्काबुक्की केली. यानंतर त्याने आगारात गोंधळ घातला. पोलिसांना हा प्रकार कळवूनही एकही पोलीस कर्मचारी याठिकाणी नाही. त्यामुळे आगाराच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.

याबाबतची हकीकत अशी की, शनिवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास मद्यपी प्रवासी आगारात आला. त्याने गाडीची विचारपूस केली. मात्र, गाडी नसल्याचे वाहतूक नियंत्रक प्रदीप वाडीया यांनी त्याला सांगितले. एक गाडी “ब्रेक डाऊन’मुळे आगारातच उभी होती. ती दुरुस्त झाल्यानंतर ती गाडी सोडण्याची व्यवस्था करण्यात आली. ही गाडी त्वरीत सुटणार असल्याची सूचना वाडीया यांनी प्रवाशांना दिली. मात्र, या मद्यपी प्रवाशाने “”मला गाडी नाही असे सांगितले. मग ही गाडी कशी उपलब्ध झाली”, अशी विचारणा करत वाद घालायला सुरूवात केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तेवढ्यावर न थांबता त्याने वाडीया यांना शिवीगाळ केली. तसेच त्यांच्या केबिनमध्ये शिरुन त्यांना धक्काबुक्की केली. त्याचे अन्य साथीदारही याठिकाणी आले. तणाव वाढत असल्याचे पाहून आगाराच्या सुरक्षा रक्षकाने 100 नंबर डायल करुन पोलिसांना हा प्रकार सांगितला. त्यांनी संत तुकारामनगर पोलीस चौकीला संपर्क करण्यास सांगितले. त्यानुसार संपर्क साधला असता संत तुकारामनगर येथून लवकरच मार्शल पाठवण्यात येतील असे सांगण्यात आले. तोपर्यंत मद्यपी व त्याच्या साथीदारांनी गोंधळ घातला असताना एकही पोलीस कर्मचारी याठिकाणी फिरकला नाही. मद्यपी व त्याचे साथीदार तेथून निघून गेले. या प्रकारामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले असून वल्लभनगर आगारातील कर्मचाऱ्यांबरोबरच प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.

पोलीस कक्ष दीड वर्षांपासून बंद
आगारातील सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून वल्लभनगर आगारात पोलिसांसाठी कक्ष निर्माण करण्यात आला आहे. मात्र, मागील दीड वर्षात एकदाही पोलीस कर्मचारी याठिकाणी न फिरकल्याने सध्या हा कक्ष नावालाच आहे. आगारात महिलांची छेडछाड, चोरीचे प्रकार वारंवार घडतात. मात्र, पोलीस नसल्यामुळे वेळेवर त्यांना मदत मिळू शकत नाही. टवाळखोर मद्यपी यांचा आगारात अड्डा तयार झाला आहे. मुंबई-पुणे महामार्गाच्या दिशेने असलेल्या आगाराच्या दुसऱ्या प्रवेशव्दाराजवळ रात्रीच्या वेळी अंधार आणि बसच्या अडोशाचा गैरफायदा घेतला जातो. याठिकाणी चालणारा बेकायदा वेश्‍या व्यवसाय कायम चिंतेचा विषय राहिला आहे.

आगाराच्या महिला सुरक्षा कक्षात दीड वर्षापासून पोलीस कर्मचारी येत नाहीत. शनिवारी झालेल्या घटनेची माहिती 100 क्रमांकावर दिली. त्यांच्या सुचनेनुसार संत तुकारामनगर पोलीस चौकीला याबाबत माहिती देवूनही कोणीच आले नाही. दोन दिवसात एकही पोलीस कर्मचारी साधी चौकशी देखील करण्यासाठी आला नाही. आगारात कोणीही येवून कर्मचाऱ्यांना मारहाण करत आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्‍न देखील गंभीर झाला आहे.
– मच्छिंद्र जगताप, सहाय्यक वाहतूक निरिक्षक, वल्लभनगर आगार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)