#वर्तमान: लक्षवेध “स्त्री’ रक्षणाच्या संवेदनशील सूत्राकडे ! 

जयेश राणे 
स्त्रियांचे रक्षण हे सूत्र कायमच ऐरणीवर असते. स्त्रियांना असंख्य वाईट नजरांचा प्रतिदिन नव्हे, तर प्रतिक्षण सामना करावा लागतो. याविषयीचे वातावरण अधिकाधिक खालावत चालले असल्याने घट्टपणे पाय रोवून राहण्यासाठी स्त्रीलाच पुढाकार घ्यावा लागणार आहे. स्त्रीमध्ये असलेल्या अतुलनीय क्षमतेमुळे, ते तिला शक्‍य होणार आहे. 
मुंबईतील मालाड येथून रिक्षातून घरी जाणाऱ्या एका पत्रकार महिलेसमोर रिक्षाचालकाने अर्ध्या रस्त्यात रिक्षा थांबवून या महिलेसमोर गैरकृत्य केले. ही धक्‍कादायक घटना महिला पत्रकाराने सोशल मीडियावर पोस्ट केली होती. त्याची नोंद घेत पोलिसांनी आरोपीला अटक केली. खासगी प्रवासी सेवा (ओला, उबर) देणाऱ्या काही चालकांकडूनही महिला प्रवाशांना अशा प्रकारे त्रास देण्याच्या घटना घडल्या आहेत.
वातानुकूलित वातावरणात आरामदायी प्रवास होण्यासाठी अशा सेवांकडे प्रवासी आकर्षिले जातात; मात्र आरामदायी वाटणारा हा प्रवास सुरक्षित आहे का ?, याचा विचार विशेषतः महिला प्रवाशांनी केला पाहिजे; कारण त्या घटनांनंतर संबंधित आस्थापन दोषी चालकास सेवेतून बडतर्फ करते आणि महिला प्रवाशाची क्षमा मागते. एवढ्यापर्यंतच ते प्रकरण मर्यादित राहाते; पण महिला प्रवाशास झालेल्या मनस्तापाचे काय, याचे उत्तर त्या आस्थापानाकडे नसते. महिला प्रवाशासमोर गैरकृत्य करण्याच्या प्रकारांत प्रतिदिन वाढ होत आहे. अशा विकृत चालकांमुळे सभ्य-सुसंस्कृत चालकांकडेही संशय, अविश्‍वासाने पाहिले जाऊ शकते. ‘निर्लज्ज सदासुखी’, असे म्हटले जाते; पण त्यांना धडा शिकवणे चालू केल्यास ते सुताप्रमाणे सरळ होतील यात शंका नाही.
महिला प्रवाशांना त्रासदायक, भीती वाटेल अशी कृत्ये सार्वजनिक ठिकाणी जाणीवपूर्वक केली जात असल्याचे लक्षात आले आहे. या वेळी महिला प्रवासी प्रचंड तणावाखाली येऊन तेथून तत्काळ निघून जातात. हे सर्व घडत असताना केवळ बघ्याची भूमिका घेणारे नागरिक तेथे बहुसंख्येने असतात; मात्र त्यांपैकी एकालाही महिलेच्या रक्षणासाठी धावून जावेसे वाटत नाही. महिलेला त्रास देणाऱ्या विकृताला धडा शिकवण्यासाठी एकही व्यक्‍ती आतापर्यंतच्या घटनांत धावून गेलेला नाही. उलटपक्षी समोर होत असलेल्या घटनेचे भ्रमणभाषमध्ये (मोबाइलमध्ये) ध्वनीचित्रीकरण करून तत्काळ सामाजिक माध्यमांवर टाकण्यासाठी खटाटोप केला जातो. पुरुष असूनही स्त्रीच्या अब्रूचे रक्षण करण्यास पुढे जाण्यास धजावले जाणे सोडाच; पण ध्वनीचित्रीकरण केलेली क्‍लिप सर्वत्र प्रसारित करून तिची अपकीर्ती कशी होईल, हेच आग्रहपूर्वक पाहिले जाते. ही समाजघातकी विकृतीच आहे. या दोन्हीही विकृतींचे उच्चाटन करणे अनिवार्य आहे.
महिलांविषयी संवेदनशील घटना घडल्यावर त्याविषयी चर्चा होते; मात्र त्यानंतर स्थिती सामान्य झाल्यावर पुन्हा कुठेतरी विकृत घटना घडेपर्यंत शांत राहिले जाते. घटना घडल्यावर पुन्हा चर्चा चालू होते, असे चक्र चालू असते. आपल्यासंदर्भात घडत असलेल्या संवेदनशील घटनांविषयी महिलांनी अंतर्मुखपणे विचार करणे आवश्‍यक आहे. महिलांकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्या विकृतांची वाईट सवय मोडली जाईल, अशी वर्तमान स्थिती नाही; पण आपल्याकडे वाईट नजरेने पाहणाऱ्यांना तिथेच चोप देणे मात्र सहज शक्‍य आहे. शहर असो अथवा खेडेगाव सर्वत्रचे वातावरण महिलांसाठी असुरक्षित आहे. येथील मनुष्य रूपातील गिधाडे स्त्रीच्या अब्रूचे लचके तोडण्यासाठी टपलेलीच आहेत. त्यांच्या आक्रमणांपासून संरक्षण करण्यासाठी कुणी पुढे येईल, याची आशा बाळगण्यात काहीच अर्थ नाही. महिलांनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्यावे यासाठी काही सामाजिक संघटना कार्यरत आहेत. त्यांच्या या उपक्रमाचा महिलांनी लाभ करून घेतला पाहिजे.
स्वसंरक्षण प्रशिक्षण म्हणजे पुष्कळ काहीतरी कठीण शिकण्याचा, खडतर प्रशिक्षणाचा, प्रचंड शारीरिक कसरतीचा भाग असावा. असा समज असू शकतो. स्त्री वर्गाने सर्वच क्षेत्रात पुरुषांसह लक्षणीय, लक्षवेधी असे भरघोस यश संपादन केले आहे, करत आहेत आणि यापुढेही करत राहाणार आहेत. हा झाला स्त्री वर्गाचा बौद्धिक भाग म्हणजेच त्यांच्या बुद्धीची कुशलता. दुसरा मुद्दा असा की, निसर्गाने स्त्रीला प्रजनन क्षमता दिलेली आहे. बाळंतपणाच्या काळात स्वतःचा जीव सांभाळण्यासह उदरात वाढत असलेल्या अपत्याचीही काळजी घ्यावी लागते. अपत्याला जन्म दिल्यावरही तोच भाग कायम असतो. जी व्यक्ती स्वतःसह दुसरा असे दोन जीव काळजीपूर्वक सांभाळत असते ती नक्‍कीच सामान्य नसून असामान्य आहे.
पुरुष नोकरी-व्यवसायात कितीही कर्तृत्ववान असला तरी अपत्य सांभाळण्याच्या सेवेवेळी त्याचा घामटा निघून दमछाक होते. हे वास्तव हमखास पाहायला मिळेल. म्हणूनच तर आई स्वतः जाईल तिथे बाळाला घेऊन जात असते. या सर्व मुद्द्यांची आठवण करून देण्याचे तात्पर्य हेच की, स्त्री या सर्व भूमिकांतून जात असते. मात्र यातून तिने आपली ताकद ओळखून स्वसंरक्षण प्रशिक्षण शिकण्यासाठी सज्ज झाले पाहिजे. सोशल मीडिया, मोबाइल यांसाठी पुष्कळ वेळ देण्यामध्ये स्त्री, पुरुष दोघांचाही सहभाग असतो. काळाची गरज ओळखून त्या गोष्टींसाठी खर्ची घालत असलेला वेळ स्त्रियांनी स्वसंरक्षण शिकण्यासाठी दिल्यास नक्‍कीच आत्मरक्षणाच्या दृष्टीने हितावह असणार आहे. ज्या गोष्टीसाठी वेळ देतो तो वेळ आपला किती फायदा करून देणार आहे, हे लक्षात घेतल्यास उत्तमच !
आजची स्त्री ही सजग असल्याने आत्मरक्षणासाठी वेळ देण्यास सिद्ध होईल आणि तिला त्रास देणाऱ्यांचे कंबरडे मोडून टाकत त्यांना अद्दल घडवत असल्याचे वाचनात, ऐकण्यात आल्यास समाजकंटाकांचे धाबे दणाणतील, असे अगत्यपूर्वक वाटते.
इच्छित स्थळी पोहोचण्यास उशीर झाल्यामुळे घाई गडबडीत अनोळखी व्यक्तीकडे ‘लिप्ट’ मागून प्रवास करणे अनेक स्त्रियांसाठी धोक्‍याचे ठरले आहे, हे बोलके प्रसंगच सांगतात. त्यामुळे अनोळख्या व्यक्तीकडे ‘लिप्ट’ न मागता प्रसंगावधान राखत अत्यंत धीराने योग्य निर्णय घेणे आवश्‍यक असते. कारण तो योग्य निर्णयच आपले रक्षण होण्यासाठी उपयुक्‍त असणार आहे. ‘अति घाई संकटात नेई’ अशा स्वरूपाची काही वाक्‍ये घाट, महामार्ग येथून प्रवास करताना वाचनात येतात. वाहन चालकांसाठी असलेल्या त्या वाक्‍यांप्रमाणे जे चालक वेगमर्यादा सांभाळून वाहन चालवतात ते नियोजितस्थळी उशिरा जरी पोहोचले तरी सुखरूप पोहोचतात. उतावीळपणा न करता धीरोदत्तपणाला जीवनात असलेले महत्त्व लक्षात घेऊन कृती केल्यास ओढवून घेतली जाणारी संकटे टाळता येतात, हे येथे लक्षात येते.
रक्षाबंधन दिवशी एका राखी स्वरूपातील फोटोची पोस्ट सामाजिक माध्यमांवर प्रसारित होत होती. त्यात ‘आओ रक्षा करे इस बंद धन की’ असे वाक्‍य बाळंत स्त्रीच्या स्वरूपात दाखवले होते. बंद धनाचे रक्षण म्हणजे ‘स्त्री भ्रूणाचे रक्षण’ असा बोधजनक संदेश यातून देण्यात आला होता. अत्यंत कल्पकपणे दिलेला तो संदेश मुलगी नको म्हणून स्त्री भ्रूणाची हत्या करणाऱ्या महापापी लोकांसाठी सणसणीत चपराक आहे. मुलगी, मुलगा यांपैकी कुणीही जन्माला येवो दोघांनाही समान प्रेम देणाऱ्या मंडळींमुळे समाज व्यवस्था टिकून आहे आणि ती पुढे वाटचाल करत आहे. त्यानेच संतुलित समाज निर्माण होईल.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)