#वर्तमान: भ्रष्टाचारातून संपत्ती आणि सुटका? 

 श्रीकांत नारायण 
एखाद्या देशात प्रचंड मोठा आर्थिक घोटाळा केलेला माणूस पैशाच्या बळावर अँटिग्वाचे नागरिकत्व घेऊन आरामात राहू शकतो आणि मनात आले तर कोणत्याही देशात फिरायला जाऊ शकतो. पैशाच्या जोरावर नाचविल्या जाणाऱ्या या दुनियेत भ्रष्टाचारातून संपत्ती आणि संपत्तीतून सुटका? असे नवे समीकरण रूढ होत आहे एवढे मात्र खरे.
देशात अलीकडेच गाजलेल्या पंजाब नॅशनल बॅंकेच्या महा घोटाळ्यातील एक प्रमुख आरोपी मेहुल चोक्‍सी अमेरिकेतून अँटिग्वा या कॅरेबियन देशात पळून गेला असून स्थानिक पासपोर्टच्या आधारे तो सध्या तेथेच राहात असल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे अँटिग्वाच्या अधिकाऱ्यांनीच भारताच्या सक्‍ती संचालनालयाला ही माहिती दिली आहे. पंजाब नॅशनल बॅंकेच्या महा घोटाळ्याचा मास्टर माईंड असलेला हिरे-व्यापारी नीरव मोदी याचा मेहुल चोक्‍सी मामा असून सुमारे दोन अब्ज डॉलर्सचा हा महाघोटाळा उघडकीस येण्याच्या आतच नीरव मोदी याच्या पाठोपाठ मेहुल चोक्‍सी यानेदेखील भारताबाहेर पलायन केले होते.
काही दिवस अमेरिकेत राहिल्यानंतर मेहुल चोक्‍सी याने आता अँटिग्वा या कॅरेबियन देशात आश्रय घेतला असून तेथे त्याला राहण्यासंबंधीचा ‘पासपोर्ट’ही मिळाला आहे. पंजाब नॅशनल बॅंकेच्या महाघोटाळ्यातील पळून गेलेल्या प्रमुख आरोपींविरुद्ध भारताच्या सक्‍तवसुली संचालनालयाने ‘इंटरपोल’च्या मदतीने नोटीस जारी केली होती त्याला अनुलक्षून भारताच्या सक्‍तवसुली संचालनालयाला ही माहिती पुरविली आहे.
पंजाब नॅशनल बॅंकेच्या महा घोटाळ्याप्रकरणी मुंबईच्या खास न्यायालयाने मेहुल चोक्‍सीविरुद्ध यापूर्वीच अजामीनपात्र वॉरंट काढले आहे मात्र हा घोटाळा उघडकीस येण्याच्या आधीच गेल्या जानेवारी महिन्यात मेहुल चोक्‍सी भारताच्या बाहेर पसार झाला होता. त्यानंतर सीबीआयने चौकशीअंती ‘इंटरपोल’च्या मदतीने त्याच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे. दरम्यान, मेहुल चोक्‍सी भारतात का येऊ शकत नाही तर सध्या भारतात झुंडशाहीने थैमान घातले आहे. त्यामुळे आपल्या अशिलाच्या जीवाला धोका आहे म्हणून चोक्‍सी भारतात येऊ इच्छित नाहीत असा युक्‍तिवाद मेहुल चोक्‍सीच्या वकिलांनी त्यांच्या अटक वॉरंट अर्जाच्या सुनावणीच्या वेळी केला आहे. जमावाच्या हल्ल्याची चोक्‍सीने एवढी भीती का घ्यावी? हा प्रश्नच आहे त्यामुळे हा युक्‍तिवाद ऐकून हसावे की रडावे हेच कळत नाही.
चोक्‍सी यास ताब्यात घेण्यासाठी ‘इंटरपोल’ आणि त्याच्या मदतीने बजावलेली रेड कॉर्नर नोटीस कितपत उपयुक्‍त ठरेल यात शंकाच आहे कारण मेहुल चोक्‍सीने ज्या पद्धतीने अँटिग्वामध्ये जाऊन आश्रय ‘विकत’ घेतला आहे तेथे त्याला कोणी हात लावू शकेल की नाही याबद्दलच संदिग्धता आहे. मेहुल चोकसीने अँटिग्वामध्ये जाऊन आश्रय ‘विकत’ घेतला आहे याचा अर्थ अक्षरशः काही पैसे देऊन वा पैशाची गुंतवणूक करून त्याने अँटिग्वाचा पासपोर्ट मिळविला आहे.
अँटिग्वासारख्या कॅरेबियन देशांमध्ये मोठी गुंतवणूक केल्यास तेथे त्या व्यक्‍तीला राहण्याचा परवाना तसेच प्रसंगी त्या देशाचे नागरिकत्वही दिले जाते. अँटिग्वा देशाच्या विकासासाठी अशी गुंतवणूक करण्यासाठी तेथील सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे त्या देशाचे नागरिकत्व मिळण्यासाठी त्या देशात जन्म घेणे किंवा त्या देशात काही काळ वास्तव्य करणे आदी अटी तेथे लागू होत नाही केवळ मोठी गुंतवणूक केली की कोणालाही त्या देशाचे नागरिकत्व मिळू शकते. विशेष म्हणजे ही सर्व प्रक्रिया अवघ्या काही महिन्यात पूर्ण होऊ शकते.
याच नियमांचा (गैर) फायदा घेऊन मेहुल चोक्‍सीने अँटिग्वामध्ये राहण्याचा परवाना मिळविला असावा असे दिसते. अँटिग्वा आणि बर्बुडा या देशाचा परवाना मिळविण्यासाठी मेहुल चोक्‍सीला फार तर अँटिग्वा राष्ट्रीय विकास निधीसाठी सुमारे 2 लाख डॉलर्स (1.3 कोटी रु.) द्यावे लागले असतील वा अँटिग्वातील रिअल इस्टेट प्रोजेक्‍टमध्ये सुमारे चार लाख डॉलर्स (2.3 कोटी रु.) एवढी गुंतवणूक करावी लागली असेल. किंवा एखाद्या उद्योगधंद्यांच्या प्रकल्पासाठी सुमारे दीड कोटी डॉलर्सची (10.3 कोटी रुपये) गुंतवणूक करावी लागली असेल. अशी गुंतवणूक करून मिळविलेल्या पासपोर्टच्या आधारे संबधित व्यक्तीला इंग्लंडसह सुमारे 132 देशांत व्हिसा-मुक्त प्रवास करण्याची परवानगी आहे.
तसेच संबधित व्यक्‍तीला अँटिग्वामध्येच कायम राहण्याचे मुळीच बंधन नाही मात्र त्या व्यक्‍तीने आपले नागरिकत्व टिकविण्यासाठी पाच वर्षातून फक्त पाच दिवस अँटिग्वामध्ये राहणे बंधनकारक आहे. अर्थात अपहार वा एखादा गुन्हा केलेल्या बाहेरच्या व्यक्‍तीला पासपोर्ट वा नागरिकत्व देण्यासंबंधीही विशिष्ट अटी आहेत मात्र त्याच्यावरील आरोप सिद्ध होणे हेही त्यादृष्टीने महत्त्वाचे आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)