वर्गणीची सक्ती केल्यास खंडणीचे गुन्हे दाखल होणार

डॉ. सचिन बारी ः पूरग्रस्तांना मदतीने गणेशोत्सव साजरा करावा

शिक्रापूर-येत्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला गणेशोत्सव नागरिकांनी आनंदाने तसेच सामाजिक उपक्रमाने साजरा करत पूरग्रस्तांना जास्तीत जास्त मदत करावी. डीजे, डॉल्बी न वाजविता पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करावा. सर्व मंडळांनी धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी करणे गरजेचे असून वर्गणीची सक्ती केल्यास व तक्रार आल्यास खंडणीचे गुन्हे दाखल होऊ शकतात असा इशारा दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सचिन बारी यांनी दिला.
शिक्रापूर हद्दीतील गणेश मंडळांसाठी पोलीस स्टेशन व सर्व पत्रकारांच्या वतीने मागील वर्षी गणराया फेस्टिवलचे आयोजन करण्यात आलेले होते. या फेस्टिवलचे बक्षीस वितरण उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सचिन बारी, पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. बारी बोलत होते. याप्रसंगी पोलीस स्टेशन हद्दीतील गणेशोत्सव मंडळे, पोलीस पाटील, दक्षता कमिटीच्या महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मिरवणूक काळामध्ये वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी, असे पोलीस निरीक्षक शेलार यांनी सांगितले. उपक्रम यशस्वी होण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक मयूर वैरागकर, पोलीस नाईक ब्रम्हा पोवार, अशोक केदार, पत्रकार सुनील भांडवलकर, शेरखान शेख यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन सुनील भांडवलकर यांनी केले तर प्रास्ताविक सहायक पोलीस निरीक्षक मयूर वैरागकर यांनी केले तर शिरूर तालुका कलाशिक्षक संघाचे अध्यक्ष प्रविणकुमार जगताप यांनी आभार मानले.

  • मंडळांचा गौरव
    अष्टविनायक मित्र मंडळ केंदूर पऱ्हाडवाडी यांना प्रथम क्रमांक, अमरज्योत मित्र मंडळ तळेगाव ढमढेरे यांना द्वितीय क्रमांक, आनंदनगर मित्र मंडळ कोरेगाव भीमा यांना तृतीय क्रमांक तसेच जय भवानी मित्र मंडळ शिक्रापूर, भैरवनाथ नाट्य गणेश मंडळ पाबळ व मेनचौक प्रतिष्ठान विठ्ठलवाडी या गणेश मंडळांना उत्तेजनार्थ बक्षीस व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.