`वन वोट फॉर बीजेपी’चा सोशल मिडियावर धुमाकूळ

कोईमतूर – कोईमतूर जिल्ह्यात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पेरियानायकेनपलयम युनियन पंचायतीतील वॉर्ड क्रमांक 9 मधील उमेदवाराला फक्त 1 मत मिळाल्याच्या घटनेची सोशल मिडियावर देशभर चर्चा झाली. त्याचे मुख्य कारण म्हणजे डी. कार्तिक नावाचा हा उमेदवार भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी असून त्याच्या कुटुंबातील सदस्यांची पाच मते असतानाही त्याला फक्त एकच मत मिळाल्याने नेटिझन्स सोशल मिडियावर याचा भरपूर आनंद लुटला. ट्विटरवर सिंगलवोटबीजेपी हा हॅशटॅग चालवण्यात आला. सुमारे 12 हजार जणांनी या विषयावर ट्विट केले.

ग्रामीण भागातील पंचायतीच्या निवडणुका खरे तर पक्षाच्या चिन्हांवर होत नाहीत, मात्र राजकीय पक्षांचा विविध उमेदवरांना पाठिंबा असतो. त्यानुसार डी. कार्तिक हे भारतीय जनता युवा मोर्चाचे कोईमतूर जिल्हा उप चिटणीस या पदावर असल्याने त्यांना मिळालेल्या एका मताची सोशल मिडियावर देशभर चर्चा झाली. 

कवयित्री आणि कार्यकर्ता असणाऱ्या डॉ. मीना कंदसामी यांनी निवडणूक निकालाचा स्क्रीनशॉट घेऊन खाली ओळी लिहिल्या की, गाव पातळीवरील निवडणुकीत भाजप उमेदवाराला एक मत मिळाले, त्याच्या कुटुंबातील अन्य चार सदस्यांचा अभिमान वाटतो की, त्यांनी अन्य उमेदवाराला मत देण्याचा निर्णय घेतला.

शिव प्रसाथ टीआर त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात, मतदार इतके दुष्ट आहेत की, डी. कार्तिक यांनी लावलेल्या पोस्टरवर दहा नेत्यांचे फोटो आहेत. त्यामुळे त्यांना किमान दहा मते तरी मिळायला हवी होती. मिळालेल्या एक मताबद्दल डी. कार्तिक यांनी खुलासा केलेला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार ते वॉर्ड क्रमांक नऊ मधून निवडणूक लढवत होते आणि त्यांच्या कुटुंबियांची नावे चार क्रमांकच्या वॉर्डमध्ये असल्याने कुटुंबियांची मते त्यांना मिळू शकलेली नाहीत.

नव्याने पुनर्रचना करण्यात आलेल्या नऊ जिल्ह्यातील 140 पैकी 88 जिल्हा पंचायतीच्या जागांवर मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या द्रविड मुन्नेत्र कळघम या पक्षाने विजय मिळवला आहे. द्रमुकचा सहकारी असलेल्या काँग्रेस पक्षाला चार ठिकाणी तर विधानसभेत विरोधी पक्ष असलेल्या अण्णाद्रमुकला चार ठिकाणी विजय मिळालेला आहे. त्याखेरीज नऊ जिल्ह्यातील 1381 पंचायत युनियन वॉर्डांपैकी 300 पेक्षा जास्त वॉर्डात द्रमुकला यश मिळालेले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.