वन्य प्राणी-पक्ष्यांची अन्नाअभावी तडफड

राजेंद्र मोहिते
कराड, दि. 29 -वाढती लोकसंख्या आणि मानवाच्या वाढत्या हव्यासापोटी काँक्रीटचे जंगल वाढत आहे. परिणामी वृक्षतोड, वनवे, नदी किनारी, खाणींमध्ये उत्खनन, अशा अनेक कारणांमुळे प्राणी व पक्ष्यांचा नैसर्गिक अधिवास धोक्यात आला आहे. त्यामुळे प्राणी-पक्ष्यांचा अन्नाच्या शोधात मानवी वस्तीत वावर वाढला आहे. भूक भागविण्यासाठी कचर्‍यातही त्यांना अन्न शोधावे लागत आहे. अधिवासांवर गदा आल्याने त्यांची अन्नसाखळी धोक्यात आली आहे.
वन्यप्राण्यांना आपल्या उदरनिर्वाहासाठी त्यांच्या नैसर्गिक अन्नसाखळीवर अवलंबून राहावे लागते. मात्र, मानवाकडून होत असलेला अधिवासातील हस्तक्षेप, प्राण्यांची शिकार, याचा अन्नसाखळीवर परिणाम झाला आहे. त्यामुळेच वन्य प्राण्यांचा मानवी वस्तीतील वावर वाढला आहे. घटत्या वनक्षेत्रामुळे अनेक प्राणी शेताकडे आणि नागरी वस्तीकडे धाव घेत आहेत. यामुळे वाहनांच्या धडकेत त्यांचा मृत्यू होण्याच्या घटना घडल्या आहेत. मोर, लांडोर यासारख्या पक्ष्यांनी शेती आणि मानवी वस्तीजवळ आपला अधिवास निर्माण केला आहे. मूळच्या अधिवासातील निर्माण झालेल्या अन्नाच्या तुटवड्यामुळे रस्त्यालगत टाकण्यात आलेल्या कचर्‍यात हे पक्षी अन्न शोधतात. सैदापूर (ता. कराड) येथे रस्त्यालगतच्या कचर्‍यात लांडोर पक्षी बर्‍याचदा अन्न शोधताना निदर्शनास येतात. पानबदकही पाण्यातील नैसर्गिक खाद्य कमी झाल्यामुळे पात्राबाहेर येऊन सांडपाण्यात खाद्य शोधत आहेत.
रस्त्याकडेला, हॉटेल, ढाब्यांच्या आजुबाजूला टाकण्यात येणार्‍या शिल्लक अन्नावर पक्षी आणि प्राणी भूक भागवित आहेत. अन्नाच्या शोधार्थ मानवी वस्तीतील वावरामुळे त्यांची शिकार होण्याच्या घटना वाढत आहेत. कचर्‍यातील प्लास्टिकमुळे अनेक प्राणी-पक्ष्यांना जीव गमवावा लागत आहे. मानवी हस्तक्षेप, शिकार, मृत्यूमुळे प्राणी-पक्ष्यांच्या दुर्मिळ प्रजाती धोक्यात आल्या आहेत. काही प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. मानवाकडून आत्मसंरक्षणार्थ आणि जाणीवपूर्वक होणारे हल्ले न थांबल्यास प्राणी-पक्ष्यांची नैसर्गिक अन्नसाखळी दुरूस्त होणार नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)