सातारा,दि.4(प्रतिनिधी)
मारामारी,खंडणी, खुनाचा प्रयत्न यासारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सातारा जिल्ह्यातील दोन टोळ्यांना जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. याप्रकरणी जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी आदेश काढले आहेत. अनिकेत उर्फ बंटी नारायण जाधव, यश उर्फ वरून समरसिंह जाधव (दोघे रा. भुईंज, ता.वाई) अशी वाई तालुक्यातील मारामारी,खंडणी, खुनाचा प्रयत्न करणारी टोळी तर मारामारी,खुनाचा प्रयत्न असे गुन्हे दाखल असलेली वडूज ता.खटाव येथील युवराज उर्फ यशवंत माधवराव पाटील, महेश नारायण गोडसे (दोघे रा. वडूज) यांची टोळी जिल्ह्यातून तडीपार झाली आहे.
याबाबत जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी दिलेल्या प्रेसनोटमधील माहिती अशी की, अनिकेत उर्फ बंटी नारायण जाधव, यश उर्फ वरून समरसिंह जाधव यांच्या टोळीवर भुईंज व वाई पोलीस ठाण्यात मारामारी,खंडणी, खुनाचा प्रयत्न यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच युवराज उर्फ यशवंत माधवराव पाटील, महेश नारायण गोडसे यांच्यावरही वडूज पोलीस ठाण्यात मारामारी, खुनाचा प्रयत्न यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
दोन्ही टोळीतील सदस्यांना वेळोवेळी सुधारण्याची संधी दिली गेली होती. मात्र त्यांच्या वागण्यात बदल होत नव्हता. त्यामुळे आगामी काळात त्यांच्याकडून समाजात कोणतेही उपद्रवमुल्य निर्माण होऊ नये म्हणून भुईंज व वडूज पोलीसांनी या टोळ्यांच्याविरोधात हद्दीपारीचे प्रस्ताव तयार केले होते. त्या प्रस्तावावर जिल्हा पोलीस प्रमुख तथा हद्दपार प्राधिकरण तेजस्वी सातपुते यांनी दोन्ही टोळ्यांच्या सदस्यांना सातारा जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार केले आहे.
जिल्ह्यात यापुढे गुंडगिरी करून दहशत माजवणाऱ्या टोळ्यांच्या व व्यक्तींच्या विरोधात कडक कारवाई केली जाईल असा इशारा जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी दिला आहे.