वडगाव बाजारपेठेच्या मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडी

वडगाव मावळ – मावळ तालुक्‍याचे मुख्यालय असलेल्या वडगाव नगरपंचायतीच्या बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडी नित्याची झाली असून, वाहनचालक व पादचारी त्रस्त असून शहरातील वाहतूक कोंडी रोखण्याची मागणी नागरिकांनी केली.

मावळ तालुक्‍याचे मुख्यालय असलेल्या वडगाव नगरपंचायत हद्दीत तहसील, पंचायत, न्यायालय, पोलीस ठाणे, भूमी अभिलेख, उप कोषागार, सार्वजनिक बांधकाम, कृषी, रेल्वे स्टेशन, दवाखाने, शाळा, महाविद्यालय, बॅंक, बाजारपेठ, आठवडे बाजार तसेच खासगी कार्यालय असल्याने दैनंदिन वर्दळ असते. वाढत्या रहदारीच्या दृष्टीने रस्ता अपूर्ण पडत आहे. त्या रस्त्यावर लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांची वाहने उभी असतात. त्यातच अनेक दुकानदारांनी त्यांचे साहित्य रस्त्यालगतच ठेवले आहे. दैनंदिन दुचाकी व चारचाकी वाहने बेशिस्तपणे उभी केलेली असतात.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्यातच पीएमपीएमएलची बस वडगाव शहरातून जात असताना वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होते. या वाहतूक कोंडीतून विद्यार्थी, कामगार, महिला, ज्येष्ठ नागरिक व नागरीक जीव मुठीत घेवून ये-जा करतात. त्यातच निवडणुका, मोर्चे व आंदोलने सुरू असल्याने वर्दळीत वाढ होते. आठवडे बाजाराच्या दिवशी दुकाने रस्त्याच्या लगतच थाटल्याने वाहतूक कोंडी होते. वाहतूक पोलीस नसल्याने वाहनचालक व पादचारी त्रस्त झाले आहेत. खरच वाहतूक कोंडीतून मुक्तता होईल का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

वाहतूक कोंडी झाल्यावरही पोलिसांचा पत्ता नसतो, वैद्यकीय उपचारासाठी रुग्णवाहिकेतून येणाऱ्या रुग्णांना वाहतूक कोंडीचा फटका बसतो. त्यांना वेळेत उपचार मिळत नाहीत. रात्रीच्या वेळी ग्रामदैवत पोटोबा महाराज मंदिरासमोर रस्त्यावरच पाणीपुरीच्या व अन्य वाहने उभी केल्याने वाहतूक कोंडीला निमंत्रण मिळते. वडगाव नगरपंचायतीवर प्रशासक असून, तहसीलदार रणजीत देसाई नियुक्त आहेत.

वडगाव शहराच्या रस्त्यावर दुभाजक तयार करून एकेरी मार्ग करा. रस्त्यावर अतिक्रमण केलेल्यावर त्वरित कारवाई करावी. वडगाव शहराच्या मुख्य रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी कायमस्वरूपी वाहतूक पोलीस नियुक्त करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते मयूर ढोरे, अतुल वायकर, विशाल वहिले, हरीश दानवे, दिलीप पगडे, यशवंत शिंदे, सिद्धेश ढोरे आदींनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)