वटवाघळांच्या सहवासात शांताबाई

आजकाल कधी कोण चर्चेत येईल ते सांगता येत नाही. वटवाघूळ हा खरे तर अत्यंत दुर्लक्षित प्राणी. प्राणीच! पक्षी नव्हे. आणि आपल्या दृष्टीने असून नसून सारखाच. वटवाघूळ उडत असला तरी पक्षी नाही. सस्तन प्राणी आहे. मात्र हे गोष्टही बऱ्याच जणांना माहीत नाही, सांगितली तरी पटणार नाही. उडणारा तो पक्षी अशी आपली समजूत आहे. त्यामुळे आपल्याला तो पक्षीच वाटतो.

सध्या वटवाघूळ चर्चेत आहे, ते निपाह नावाच्या व्हायरसमुळे. निपाह व्हायरसचा केरळमध्ये प्रादुर्भाव झालेला आहे. आणि त्याने अनेक बळी घेतले आहेत. त्यावर काही औषध नाही, प्रतिबंधक लस नाही. निपाहची लागण झालेले एकाच कुटुंबातील तीन जण मरण पावल्यानंतर निपाहचा वटवाघळांशी संबंध जोडण्यात आला. वटवाघळांनी खाल्लेली फळे खाल्ल्यामुळे या लोकांना निपाह झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आणि प्रतिबंधक उपायही सांगण्यात आले. निपाहमुळेचे वटवाघूळ हा प्राणी अचानक चर्चेत आला. तशी वटवाघळाची आणि आपली फारशी ओळख नाही. इतर पक्ष्यांप्रमाणे वा प्राण्याप्रमाणे वटवाघळाच्या गोष्टी आपल्याला लहानपणी ऐकायला मिळाल्या नाहीत. वटवाघळाबद्दल काही गाणीही ऐकण्यात आली नाहीत. म्हणजे एकंदरीत वटवाघूळ दुर्लक्षितच राहिलेले आहे.

वटवाघळे आपल्याला फारशी पाहायलाही मिळत नाहीत. कारण ती आहेत निशाचर. वटवाघळांच्या अनेक जाती आहेत. मात्र बहुतेक जातीची वटवाघळे ही निरुपद्रवी या प्रकारात मोडतात. वटवाघळांबद्दलची सर्वांना माहीत असलेली गोष्ट म्हणजे ती खाली डोके वर पाय अशा अवस्थेत स्वतःला टांगून घेतात. त्यांना चालता येत नाही वा पायावर उभे राहता येत नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नाही म्हणायला वटवाघळांसंबंधी लहानपणी एक गोष्ट ऐकली होती, माझ्या आजीकडून. गोष्ट अशी होती. एकदा पशू आणि पक्षी यांच्यात काही कारणावरून मोठे भांडण झाले आणि भांडणाचे रूपांतर झाले लढाईत. लहानशा चिमणीपासून ते अगदी बलशाली गरुडापर्यंत सर्व लहानमोठे पक्षी एकत्र येऊन पशूंच्या विरोधात लढायला सज्ज झाले. मोठे युद्ध सुरू झाले. कधी पक्ष्यांचा विजय होतो असे वाटे, तर कधी प्राण्यांचा. तेव्हा वटवाघळाने लबाडी केली. ज्या पक्षाची सरशी असेल तिकडे तो जाई. पक्ष्यांचा विजय होत असेल तर तो सांगे, पहा, मी पक्षीच आहे. मला चांगले उडता येते. म्हणजे मी पक्षीच आहे. मला तुमच्या पक्षात घ्या. आणि पशूंचा विजय होत असला तर तो पशूंच्या बाजूला जाई. म्हणे मी तर पशूच आहे. मी उडत असलो तरी मला पंख कोठे आहेत? पिसे कोठे आहेत, चोच कोठे आहेत. मला चार पाय आहेत म्हणजे मी पशूच आहे.

पण काही काळाने वटवाघळाची ही लबाडी सगळ्यांच्या लक्षात आली आणि सर्वांनी त्याला आपल्यातून काढून टाकले. ना तो पक्ष्यात राहिला, ना प्राण्यांत राहिला. त्यामुळे तो दिवसाही वावरत नाही आणि रात्रीही वावरत नाही. फक्त संध्याकाळच्या वेळीच उडतो आणि आपले पोट भरतो. शास्त्रज्ञांच्या दृष्टीने मात्र वटवाघूळ महत्त्वाचे आहे, ते त्याच्या अंधारात उडण्याच्या कौशल्यामुळे. त्याच्यावरूनच रडारचा शोध लागला. एकीकडे वटवाघळासंबधी निपाहची बातमी वाचत असतानाच दुसरी एक बातमी वाचनात आली. गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यातील राजपूर गावात शांताबाई प्रजापती नावाची 74 वर्षे वयाची एक वृद्ध महिला आहे. तिच्या घरात सुमारे 400 वटवाघळे राहतात आणि त्यांच्यासोबत ती गेल्या दहा वर्षांपेक्षा अधिक काळ राहात आहे. तिला वटवाघुळांची भीती वाटत नाही. गाववाले तिला चमचिडियावाला बा म्हणजे वटवाघळांवाली आजी म्हणतात.

शांताबाईच्या दोन खोल्यांच्या घराच्या भिंतींवर ही वटवाघळे दिवसभर लटकत असतात. संध्याकाळी बाहेर पडून ती उदरभरण करतात आणि पुन्हा आपली जागा पकडतात येऊन. शांताबाईंच्या तीनही मुलींची लग्ने झालेली आहेत. मुलगा मुंबईत असतो. त्या 30 वर्षांच्या असताना त्यांच्या पतींचे निधन झाले. घरात वटवाघळे राहात असल्याने त्यांनी आपला मुक्काम बाहेर मोकळ्या जागी हलवला आहे. जेवणखाण, निजणे सारे बाहेर चालते, घर जणू वटवाघळांना देऊन टाकले आहे. मात्र रोज त्या घराची साफसफाई करतात. घरात राहणारा वटवाघळे पोट भरायला बाहेर जात असली, तरी ते रिकामे करण्याचे काम घरातच करतात. तेव्हा रोज सकाळी घर झाडणे, त्यांची विष्ठा काढून टाकणे ही कामे शांताबाई शांतपंणे करत असतात. आणि वास येऊ नये म्हणून रोज कडूलिंबाची पाने आणि कापूर जाळत असतात. हे सारे वाचल्यानंतर वटवाघूळप्रेमी शांताबाईंचे कौतुक वाटल्याचाचून राहत नाही.

अनुराधा पवार 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)