#वंदन: आचरणातूनच संदेश देणारा महात्मा

– डॉ. दिलीप गरूड 
काळाच्या लांबरूंद वाटेवर माणसं आपल्या कर्तृत्वाची पावलं उमटवतात. कुणाची पावलं ठसठशीतपणे उमटतात, कुणाची उमटल्यासारखी वाटतात, कुणाची पुसटशी उमटतात तर कुणाची अजिबातच उमटत नाहीत. महात्मा गांधी हे असं एक व्यक्‍तिमत्त्व होऊन गेलं की, त्यांनी काळाच्या पाऊलवाटेवर आपली दमदार पावलं ठळकपणे उमटवली. म्हणूनच जगातल्या 179 देशांनी त्यांचा जन्मदिवस “अहिंसा दिन’ म्हणून साजरा करण्याचे ठरविले. महात्मा गांधी म्हणजे मातीतून मोठा झालेला माणूस!  सत्य, अहिंसेचे ते पुजारी होते. त्यांनी आपणाला सत्य, अहिंसेचा विधायक आणि शांततावादी मार्ग दाखविला. पण आपण खरंच त्यांचा मार्ग स्वीकारला आहे काय?
काही महिन्यांपूर्वी पाकिस्तानातील पेशावर येथे तालिबानी अतिरेक्‍यांनी मुलांच्या शाळेवर हल्ला केला. 133 मुले व नऊ कर्मचारी मिळून 142 लोक मारले गेले. त्यानंतर दोनच दिवसांनी आसाममध्ये बोडो अतिरेक्‍यांनी 68 आदिवासींना मारून टाकले. या दोन्ही घटनांनी जग हादरलं. ज्या हिंदुस्थानात गांधीजींनी सत्य, अहिंसेचा जप केला, त्या देशात केवढे हे क्रौर्य! खरंच आपणाला गांधी समजले आहेत काय? खरंच आपण त्यांचं जीवनविषयक तत्त्वज्ञान अंगिकारलं आहे काय? की फक्‍त दोन ऑक्‍टोबरला गांधीजी की जय म्हणण्यापुरते गांधीजी आपणाला हवे आहेत? की नोटेवरच्या छबीपुरते ते आपणाला हवे आहेत?
आपणाला जर खरोखरच देशात आणि जगात शांतता हवी असेल तर गांधी विचारांशिवाय पर्याय नाही. भगवान महावीर, येशू ख्रिस्त, गौतम बुद्ध, महात्मा गांधी यांनी आपणाला हे विचार पाथेय पुरवले आहे; पण आपण बधीर झालो आहोत. आपला माणसांपेक्षा, विचारांपेक्षा शस्त्रास्त्रांवर जास्त विश्‍वास आहे. साऱ्या जगात गांधी विचारांचा उदोउदो होत असताना भारतात मात्र हिंसेचे थैमान सुरूच आहे. जगात इतरत्रही अशीच अनुभूती येत आहे. म्हणून जगातल्या पुढाऱ्यांनी आणि विचारवंतांनी गांधी विचारांची ठामपणे कास धरली पाहिजे. फक्‍त पुतळे उभे करून रस्त्यांचे नामकरण करून, दोन ऑक्‍टोबरची जयंती साजरी करून पोकळ जयजयकार करून हिंसाचार थांबणार नाही, तर त्यासाठी ठोस कृतीची आवश्‍यकता आहे. चित्रपट निर्माता ऍटनबरो यांना गांधी विचारांचे महत्त्व पटल्यामुळेच त्यांनी गांधी चित्रपट काढला.
साऱ्या जगाने तो पाहिला. गांधीजींचे जीवनदर्शन उमगल्यावर साऱ्या जगाने तोंडात बोटे घातली. अल्बर्ट आईन्स्टाइनसारखा शास्त्रज्ञ गांधींबद्दल प्रतिक्रिया व्यक्‍त करताना म्हणतो, “”अशा प्रकारचा हाडामांसाचा मनुष्य या पृथ्वीतलावर वावरून गेला यावर पुढील पिढ्या क्‍वचितच विश्‍वास ठेवतील.” तर डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन म्हणाले, “”जगाच्या उत्पत्तीपासून आजपर्यंत जे सांगितले आणि आचरून दाखविले असे एकमेव म्हणजे महात्मा गांधी.” फ्रान्सचे विचारवंत रोमॉं रोलॉं म्हणाले, “”भारतात दुसरा येशू ख्रिस्त जन्माला आला आहे.”
अशा कितीतरी प्रतिक्रिया गांधीजींसंबंधी उमटल्या आहेत. बरे या प्रतिक्रिया सामान्यांच्या नसून ख्यातकीर्त माणसांच्या आहेत. या प्रतिक्रियांवरून गांधीजींचे मोठेपण अधोरेखित होते.
प्रश्‍न असा आहे की, आपण गांधी चरित्रातून काही शिकणार आहोत काय? गांधीजींनी त्यांच्या जीवनात अकरा व्रतांचं पालन केलं. ती व्रतं अशी, “अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, असंग्रह, शरीरश्रम, अस्वाद, सर्वत्र भयवर्जन, सर्वधर्मी समानत्व, स्वदेशी, स्पर्शभावना.’
मला वाटतं या व्रतांचा राष्ट्रीय व्रते म्हणून स्वीकार केला आणि राष्ट्राच्या जीवनात ही व्रतं रुळली तर हिंसेला आळा बसेल. एखाद्या व्यक्‍तीने व्रत पाळणं आणि राष्ट्राने जीवनधर्म म्हणून स्वीकारणं यात फरक आहे. म्हणून या व्रतांचा सामुदायिक स्वीकार झाला पाहिजे. गांधीजी हे एका माणसाचं सैन्य होतं. HE WAS A ONE MAN ARMY. ते नेहमी म्हणायचे, “”मी वेगळा संदेश देणार नाही. माझं जीवन हाच माझा संदेश.”MY LIFE IS MY MASSAGE. अशा पारदर्शी जीवन जगलेल्या माणसाचं जीवन नीतळ आहे. त्यात जसा चुकांचा कबुलीजबाब आहे तसा केलेल्या प्रयोगांचा हिशेबही आहे.
1930 साली केलेल्या मिठाच्या सत्याग्रहाचं स्वरुप सुरुवातीला सौम्य होतं. पण जेव्हा त्याने उग्र क्षपप धारण केलं तेव्हा दिल्लीत व्हाईसरॉयलाही हुडहुडी भरली. वर्तमानपत्रात बातम्या छापून यायला लागल्या. कवींच्या प्रतिभेलाही बहर आला आणि त्यांनी काव्य रचलं-
“उचललेस तू मीठ मूठभर
साम्राज्याचा खचला पाया.”
अशा दिसायला साध्या पण आंतरिक ऊर्जा प्रचंड असलेल्या गांधीजींचे आपण वारसदार आहोत. त्यांनी प्रत्यक्ष कृतीने आपणाला सत्य, अहिंसेचा मार्ग दाखविला आहे. खादीचा स्वीकार, ग्रामस्वराज्य, सार्वजनिक स्वच्छता, अस्पृश्‍यता निवारण, ग्रामोद्योग, दारूबंदी, नई तालीम, श्रमाचं महात्म्य, हिंदू-मुस्लिम ऐक्‍य, कुष्ठरोग निर्मूलन, निसर्गोपचार हे सारं त्यांनी आपणाला प्रत्यक्ष कृतीतून शिकवलं.
गांधीजींच्या या मार्गाने गेल्यास देशाचे आणि जगाचे कल्याण होईल. न गेल्यास अण्वस्त्रांनी सज्ज असलेल्या देशात कधी भडका उडेल, आणि मानवजात संपून जाईल, हे सांगता येत नाही. म्हणून शस्त्रांपेक्षा गांधींनी सांगितलेल्या शास्त्रावर विश्‍वास ठेवायला हवा. एकविसाव्या शतकाची तीच मागणी आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)