लोणी काळभोरची विकास संस्था बरखास्त करा

लोणी काळभोर – येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था शेतकऱ्यांची अडवणूक करत असून त्यांना कर्जवाटप करत नाही. त्यामुळे संस्थेचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात यावे, आगामी पंधरा दिवसांत शेतकऱ्यांना कर्ज वाटप न झाल्यास जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष कमलेश काळभोर यांनी दिला आहे.

यासंदर्भात कमलेश काळभोर व त्यांच्या वीस सहकाऱ्यांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयात एक तक्रार अर्ज दाखल केला आहे. या अर्जात लोणी काळभोर विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या कारभाराबाबत तक्रारी केल्या आहेत. संस्थेचे संचालक मंडळ सातबाराधारक पात्र शेतकऱ्यांना सभासद करून घेत नाही. पात्र शेतकऱ्यांना कर्जवाटप करत नाही. संस्थेच्या 35 सभासदांना कर्जवाटप करण्याचा ठराव मंजूर झाला असतानाही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत क. म. पुरवणी मंजूर करू नये, असा अर्ज संचालक मंडळाने केला आहे. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन संस्थेचे संचालक मंडळ बरखास्त करावे, अशी मागणी केली आहे. पात्र सभासदांना आगामी पंधरा दिवसांत कर्ज मिळाले नाही तर उपनिबंधक कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.

अर्जाच्या अनुषंगाने जिल्हा उपनिबंधक डॉ. आर. एस. धोंडकर यांनी लोणी काळभोर संस्थेला एक आदेश दिला आहे. ज्या पात्र सभासदांनी संस्थेकडे कर्ज मागणी केली आहे, आवश्‍यक त्या बाबींची पूर्तता करून महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960, 1961 व संस्थेच्या उपविधीनुसार तत्काळ कार्यवाही करावी. या संदर्भात उपनिबंधक कार्यालय व संबंधित अर्जदारास माहिती द्यावी. संस्थेच्या कार्यक्षेत्रातील पात्र शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संस्थेची आहे. कोणताही पात्र शेतकरी कर्जवाटपापासून वंचित राहणार नाही, याची संस्थेने दक्षता घ्यावी. याबाबत कसूर झाल्यास संस्थेवर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असे आदेशात म्हटले आहे.

संचालक मंडळाने कुठल्याही सभासदांचे कर्ज प्रकरण अडवले नसून सचिव बदलण्याबाबत उपनिबंधक व देखरेख संघ यांच्याकडे विनंती अर्ज दाखल केला आहे. सचिव बदलल्यानंतर नवीन सभासदांना कर्जवाटप सुरळीतपणे होईल. संस्थेच्या निवडणुकीतील अपयशामुळे संस्थेला बदनाम करण्यासाठी कमलेश काळभोर प्रयत्न करीत आहेत. गावात असलेल्या इतर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांपेक्षा आमची संस्था मोठ्या प्रमाणात कर्जवाटप करते.
अध्यक्ष, विविध कार्यकारी सेवा
– श्रीरंग काळभोर, सहकारी संस्था, लोणी काळभोर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)