लोणावळा सहकारी बॅंकेला 12 लाखांचा गंडा

राजगुरूनगर- वाहन घेण्यासाठी कर्जप्रकरण करून, बॅंकेकडून वेगळ्याच खात्यावर पैसे जमा करून घेऊन व ते काढून घेऊन, लोणावळा सहकारी बॅंकेच्या राजगुरूनगर शाखेला 12 लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना येथे घडली. याबाबत लोणावळा सहकारी बॅंकेच्या राजगुरूनगर शाखेचे व्यवस्थापक संदेश करमाळकर यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानुसार एकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अक्षय लोहोट (रा. राजगुरूनगर) याने स्कॉर्पिओ गाडी घेण्यासाठी लोणावळा सहकारी बॅंकेच्या राजगुरूनगर शाखेत ऑगस्ट 17 मध्ये कर्जप्रकरण केले. त्यामध्ये त्याने मायक्रोपार्क लॉजिस्टिक, नगररोड, विमानगर, पुणे या शोरुमचे कोटेशन दिले होते. त्यानुसार लोणावळा सहकारी बॅंकेने 12 लाख रुपयाचे कर्ज प्रकरण मंजूर केले. मायक्रोपार्क लॉजिस्टिक शोरुमचे सुवर्णयुग बॅंकेत (आनंदनगर, पुणे ) खाते आहे. कर्जप्रकरण मंजूर झाल्यावर कर्जाचे 12 लाख मायक्रोपार्क लॉजिस्टिक या शोरूमला त्यांच्या खात्यात ट्रान्सफर करण्यसाठी बॅंकेचे व्यवस्थापक संदेश करमाळकर हे 19 सप्टेंबर 2017 फोन करीत होते. पण फोन लागत नव्हता.
अक्षय याचा नातेवाईक आकाश अनिल लोहोट (रा. नऱ्हे आंबेगाव, कात्रज, पुणे) हा बॅंकेत गेला आणि करमाळकर यांना म्हणाला, शोरुमचा फोन लागत नसेल तर मी तुम्हाला शोरुमचा खाते नंबर देतो, त्यावर रक्कम पाठवून द्या. त्याने बॅंकेचा खातेनंबर दिला. त्याच्यावर विश्‍वास ठेवून बॅंक व्यवस्थापकाने दिलेल्या खाते नंबरवर पैसे ट्रान्सफर केले. दुसऱ्या दिवशी करमाळकर यांनी शोरूमला फोन करून पैसे मिळाले का, असे विचारले असता त्यांना नाही असे सांगण्यात आले. त्यांनी सुवर्णयुग बॅंकेत चौकशी केली असता त्यांनी शोरुमचे आमच्याकडे खाते नाही मात्र, मायक्रोपार्क लॉजिस्टिक, प्रोपायटर आकाश अनिल लोहोट यांचे नावाने खाते असून त्यांच्या खात्यात 12 लाख जमा झाले व त्यांनी लगेच काढून नेले, असे सांगितले. त्यावरून अक्षय व अनिल यांनी बॅंकेला फसवून अपहार केल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने संदेश करमाळकर यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार खेड पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)