लोकांचा कल पाहूनच राष्ट्रवादीचा कप्तान पॅव्हेलियनमध्ये

मुख्यमंत्र्याची खा. पवारांवर टिका : देशाला मोदींच्या कणखर नेतृत्वाची गरज

फलटण, दि. 11 (प्रतिनिधी) – नरेंद्र मोदी हे भाजपचे कप्तान आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली देशभरात भाजप मैदानात आहे. परंतु राष्ट्रवादीचे कप्तान ओपनिंग बॅंटसमन म्हणून मैदानात उतरले खरे परंतु, माढ्यातील जनतेने दिलेले इशारे ऐकुन परत पॅव्हेलीयनमध्ये परतलेत. देशाच्या पंतप्रधानपदाचे स्वप्न पाहणारांनाच निवडणूक मात्र लढवायची तयारी नाही, अशी अवस्था विरोधकांची झाली आहे, अशी टिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खा. शरद पवार यांच्यावर केली.
माढा लोकसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ फलटण येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. केंद्रीय मंत्री रामदास आठवले, ना. चंद्रकांतदादा पाटील, ना. सुभाष देशमुख, ना. सदाभाऊ खोत, रणजीतसिंह नाईक-निंबाळकर, आमदार नारायण पाटील, माजी खासदार हिंदूराव नाईक-निंबाळकर, माजी खासदार रणजीतसिंह मोहिते-पाटील, दिगंबर आगवणे, धनगर समाजाचे नेते उत्तमराव जानकर, दिलीप येळगावकर, बाबूराव माने, रंजनकाका तावरे, अनिल देसाई, विश्वासराव भोसले, सह्याद्री कदम, शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, गणेश रसाळ, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, रासपचे जिल्हाध्यक्ष मामूशेठ विरकर, ऍड. नरसिंह निकम, समशेरसिंह नाईक-निंबाळकर, भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते डॉ. विष्णूपंत त्रिपूटे आदींची उपस्थिती होती.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, माढा मतदार संघात पाणी प्रश्नासह इतरही प्रश्न महत्वपुर्ण आहेत. हे सर्व सोडवण्याची भूमिका दोन्ही रणजितसिंहांची असून आम्ही त्यांच्या पाठीशी राहू. ही निवडणूक राष्ट्रीय अस्मितेची आहे. या देशाची सुरक्षितता अबाधित ठेवू शकेल व विकासाकडे नेऊ शकेल, अशा कणखर नेतृत्वाची गरज आहे आणि ती नरेंद्र मोदी यांच्याच रुपात आहे. जनतेच्या हितासाठी अनेक योजना मोदीजींनी राबविल्या. ना खाऊंगा और खाने दुंगा हे त्यांचे तत्व त्यांनी अंमलात आणल्याने तळागाळातल्या घटकांपर्यंत विकास पोहचला. माढा लोकसभा मतदारसंघात आजवर 8 हजार कोटींच्या रस्त्यांची कामे ना. नितीन गडकरी यांच्या माध्यमातून झाली आहेत. चार वर्षात भाजपने एवढे दिले परंतू 15 वर्षे पदे संभाळणाऱ्यांनी व अजित पवार यांनी या भागासाठी पैसा का दिला नाही असा सवाल आता जनताच विचारत आहे. त्या पैशाच सिंचन कुठ होतं, कुणाच्या तिजोरीत होत होत हे जनतेला सांगण्याची आवश्‍यता राहिलेली नाही. या भागाच्या विकासासाठी सक्षम लोकप्रतिनिधी निवडून द्यायची फलटणकरांना संधी मिळाली आहे.
रणजितसिंह निंबाळकर म्हणाले, मला पाडण्यासाठी राष्ट्रवादीची ताकद एकत्रित आलीय. परंतु, जनतेची मला दिल्लीला पाठवण्याची इच्छा आहे. फलटण तालुक्‍यातील महत्वपुर्ण पाणी, रोजगार व रेल्वे प्रश्नांची सोडवणुकीत कुणी आडव आल तर त्याला आडव केल्याशिवाय राहणार नाही. विकासकामे करु शकलो नाही तर खासदारकीचा राजिनामा दिल्याशिवाय राहणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
मुख्यमंत्री यांचे नेतृत्व आश्वासक आहे. सोलापूची काळजी करु नका. सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्‍यातून रणजीतसिंह निंबाळकर यांना मताधिक्‍य देणार असल्याची ग्वाही रणजीतसिंह मोहिते-पाटील यांनी दिली. सोलापुर जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती संजय पाटील, विश्वासराव भोसले, डॉ. मधूकर माळवे, उद्योगपती हनुमंतराव मोहिते आदींनी जाहिरपणे भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास भाजप व मित्रपक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

आठवले विसरले, कार्यकर्ते ओरडले
आवेगात भाषण करणाऱ्या आठवले यांनी जोरदार भाषण केले. परंतू शेवटी रामराजेंना विजयी करण्याचे आवाहन केले आणि कार्यकर्त्यांनी खालून जोरदार आरोळ्या ठोकल्या रामराजे नाही रणजीतसिंह म्हणा. नंतर झालेली चुक लक्षात आल्याने आठवले यांनी रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना विजयी करण्याचे आवाहन केले.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.