लोकशाही टिकविण्यासाठी जनता समर्थ -शरद पवार

हडपसर-भारतीय जनता ही प्रगल्भ आहे. आपल्या शेजारील पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका या देशात लष्कराने देश अनेकवेळा ताब्यात घेतला. मात्र, भारतात अद्याप एकदाही हे घडले नाही. एकवेळ राज्यकर्ते चुकतील; मात्र जनता लोकशाहीचे रक्षण करेल. नरेंद्र मोदी यांना जनतेने सत्ता दिली; मात्र त्यांना ही सत्ता राबविता आली नाही, असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
शिरूर लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, रिपाइं महाआघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ हडपसर याठिकाणी झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.

याप्रसंगी डॉ. अमोल कोल्हे, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार जयदेव गायकवाड, मंगलदास बांदल, शहराध्यक्ष चेतन तुपे, माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, प्रशांत जगताप व वैशाली बनकर, जालिंदर कामठे, सुरेश घुले, महेश शिंदे, विजया वाडकर, नगरसेवक योगेश ससाणे, फारुख इनामदार आदी मान्यवर उपस्थित होते. शिरूर लोकसभा मतदार संघातल्या प्रत्येक विभागाला त्यांच्या हक्काचा विकासनिधी मिळेल. या न्यायाने हडपसर भागातले प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी मी निश्‍चितच विकासनिधी देणार आहे.

आतापर्यंतच्या खासदारांनी मात्र विकासनिधीचे नुसते आश्‍वासन दिले. पण मी काम करुन दाखवेन. हडपसरला जनसंपर्क कार्यालय असेल, रेल्वे पूल आणि इतर विकासकामांच्या संदर्भात दिलेला शब्द मी निश्‍चित पाळेल. अशी ग्वाही डॉ. अमोल कोल्हे यांनी दिली. डॉ. कोल्हे हे तरुण व दूरदृष्टी असलेले उमेदवार आहेत. राष्ट्रवादी, कॉंग्रेस व महाआघाडीतल्या सर्वच पक्षांनी एकदिलाने कोल्हे यांना निवडून आणण्याची जबाबदारी पार पाडायची आहे, असे मत माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांनी यावेळी व्यक्त केले. सध्याचे खासदार हे रेटून खोटं बोलणारे आहेत. संपूर्ण शिरुर लोकसभा मतदार संघात कोणत्याही भागात गेलात तरी सर्वांना आश्‍वासने दिल्याचे दिसेल. मात्र, विकासनिधी त्यांनी दिलाच नाही. त्यामुळे यावेळी परिवर्तन नक्की करायचं आहे आणि डॉ. कोल्हे यांना खासदार बनवायचं आहे, असे मंगलदास बांदल यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.