पुणे- पुणे-लोणावळा लोकलमध्ये प्रवाशाला लुटल्याप्रकरणी एकाला 3 वर्षे सक्तमजुरी आणि 2 हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन.के.मणेर यांनी हा आदेश दिला आहे. दंड न भरल्यास अतिरिक्त 20 दिवस कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने आदेशात नमुद केले आहे.
सलीम गुलाब शेख ऊर्फ राजेश बाबुराव वाकोडे (वय 40, रा. देहुरोड) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. याबाबत शानकुमार शशिधरण आचारी (वय 34, रा. कान्हेफाटा, ता. मावळ) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना 8 डिसेंबर 2014 रोजी रात्री 9.30 ते 10 या कालावधीत लोणावळा-पुणे लोकलमध्ये घडली. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी काम पाहिले. त्यांनी 10 साक्षीदार तपासले. त्यामध्ये फिर्यादींची साक्ष महत्त्वाची ठरली. न्यायालयीन कामकाजासाठी लोहमार्ग पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल व्ही.बी.साळेकर आणि पोलीस नाईक डी.व्ही.मोरे यांनी मदत केली. फिर्यादी यांचा वेल्डिंगचे काम करतात. कान्हेफाटा ते पुणे स्टेशन लोकलने नियमित प्रवास करत असत. प्रवासाचा त्यांचा पास होता. घटनेच्या दिवशी ते तळेगाव स्टेशनवरून लोकलमध्ये बसले. लोकल वडगाव स्टेशनवर आल्यावर आणखी तिघे रेल्वेत बसले. रेल्वे तेथून सुटल्यानंतर तिघांनी फिर्यादींवर चाकुवर वार करून गळ्यातील सोन्याची चेन, रोख रक्कम मिळून 33 हजार 50 रुपयांच्या ऐवजाची जबरी चोरी केली. कान्हेफाटा रेल्वे स्टेशन जवळ येताच त्यातील दोघे उड्या मारून पळून गेले. त्यातील एकाला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यचे सलीम गुलाब शेख असल्याचे कळले. या प्रकरणात लोहमार्ग पोलिसांनी तपास करून जबरी चोरीच्या कलमानुसार दोषारोपपत्र दाखल केले. यावर सुनावणी करत न्यायालयाने सलीम शेख याला भादवी कलम 393 (जबरी चोरीचा प्रयत्न) नुसार शिक्षा सुनावली. तर दोघांची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुकतता करण्यात आली.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा