लोकपाल नियुक्तीसाठी हजारे आंदोलनावर ठाम

दोन ऑक्‍टोबरपासून राळेगणसिद्धीत उपोषण; सरकार आश्‍वासन पाळत नसल्याचा आरोप

नगर –“भ्रष्टाचारमुक्त भारत’ करण्याच्या वल्गना करणारे सरकार लोकपाल नियुक्तीसाठी मात्र टाळाटाळ करीत आहे, असा आरोप करीत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दोन ऑक्‍टोबरपासून राळेगणसिद्धी गावात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
सरकार सत्तेत्त आले, तर लोकपालाची नियुक्ती करू, असे आश्‍वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपच्या अन्य नेत्यांनी दिले होते; परंतु सरकार सत्तेत आल्यानंतर भ्रष्टाचारमुक्त भारताच्या निर्मितीचा या सरकारला विसर पडला आहे. लोकपाल कायदा हा भ्रष्टाचार रोखण्याचा एक महत्वाचा पर्याय आहे, तरीही सरकार लोकपालची नियुक्ती करीत नाही, असे हजारे यांनी निदर्शनास आणले आहे. हे सरकार सत्तेवर येऊन चार वर्षांपेक्षा जास्त कालावधी झालेला आहे; परंतु सत्तेवर आल्यास लोकपाल, लोकायुक्तांची नियुक्ती करण्याचे आश्वासन जनतेला देणारे सरकार या आश्वासनांचे पालन करीत नाही. जनता लोकपाल, लोकायुक्तांचा कायदा बनविण्यासाठी संघर्ष करीत होती, त्या वेळी सध्याच्या सरकारमध्ये सहभागी असलेल्या मंत्री सुषमा स्वराज आणि अरुण जेटली यांनी लोकपाल कायदा व्हावा, यासाठी कॉंग्रेसच्या सरकारच्या विरोधात आवाज उठविला होता. तत्कालीन सरकारच्या विरोधात लोकपाल व लोकायुक्तांच्या नियुक्तीबाबत ते काय काय बोलले, याचे संपूर्ण रेकॉर्डींग उपलब्ध आहे; परंतु आज ते लोकपाल, लोकायुक्तांविषयी काहीच बोलत नाही.
लोकपाल, लोकायुक्त कायदा संसदेच्या दोन्ही सभागृहांनी तयार केला. राष्ट्रपतींनी त्यावर एक जानेवारी 2014 रोजी कायद्यावर स्वाक्षरी केली. असे असताना कधी विरोधी पक्ष नेत्यांचा अभाव असल्यामुळे लोकपालची नियुक्ती करू शकत नाही, तर कधी कायदेतज्ज्ञाचे पद रिक्त असल्याचे कारण सांगून लोकपालांची नियुक्ती करण्याचे टाळून हेतुपुरस्सर जनतेची दिशाभूल करीत आहे, असा आरोप हजारे यांनी केला आहे. आता सरकार शोध समितीचे कारण देऊन लोकपालाची नियुक्ती करण्याचे टाळत आहे. या सरकारची लोकपाल नियुक्तीची इच्छा असती, तर या चार वर्षांत लोकपालची नियुक्ती करणे अशक्‍य नव्हते. लोकपाल नियुक्तीच्या मुद्यावर सर्वोच्च न्यायालयानेही सरकारला वेळोवेळी फटकारले आहे. संसदेने केलेले कायदे सरकार पाळत नसेल, तर देशातील सामान्य नागरिक त्याचे कसे पालन करतील, असा सवाल हजारे यांनी केला आहे. ज्या संविधानावर आधारित कायदे बनले, त्याच कायद्याचे सरकार पालन करीत नाही, हा संविधानाचा आणि ती बनविणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचाही अवमान आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.
या सरकारमध्ये जे मंत्री प्रमुख पदावर विराजमान आहेत, ते कायदा बनताना संसदेत कायद्याच्या बाजूने होते, तरीही ते आज या कायद्यास कसे विसरले? सत्तेची नशा उच्चस्तरीय, बुद्धिमान आणि सुशिक्षित लोकांना बेधुंद करते, हे याचे ज्वलंत उदाहरण असल्याची टीका करून ते म्हणाले, की पंतप्रधान लोकपालच्या कक्षेत येत असल्यामुळे सरकार लोकपालाची नियुक्ती करत नसावी असे आम्हाला वाटते. जनतेने पंतप्रधानाच्या भ्रष्टाचाराचे पुरावे लोकपालांकडे पाठविल्यानंतर लोकपाल पंतप्रधानाची चौकशी करू शकतो. अशी लोकपाल कायद्यात स्पष्ट तरतूद आहे. या धोक्‍यामुळे सरकारला लोकपालाची नियुक्ती नको आहे. मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे जनतेने लोकपालांकडे सादर केले, तर त्या मंत्र्यांची चौकशी लोकपाल करू शकतो. त्यामुळे सरकारला लोकपाल नको आहे. आमदार, खासदार, सभापतींचीही चौकशी टाळण्यासाठी सर्वांचा या नियुक्तीला विरोध असावा. ज्या तरतुदी लोकपाल कायद्यात आहेत, त्याच तरतुदी लोकायुक्त कायद्यात आहेत. त्यामुळे लोकायुक्तांच्या नियुक्तीलाही त्याच कारणातून विरोध होत असावा. भ्रष्टाचाराला अंकुश लावणाऱ्या कायद्यांची अंमलबजावणी व्हावी, यासाठी दोन ऑक्‍टोबरपासून लोकपाल, लोकायुक्तांची नियुक्ती व शेतकऱ्यांच्या समस्या हे विषय घेऊन पुन्हा एकदा राळेगणसिद्धी येथे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे, असे हजारे यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)