लैंगिक शिक्षणाचे धडे देणाऱ्याला वरिष्ठांचा आशीर्वाद

गटशिक्षणाधिकाऱ्यांपासून सर्वंच संशयाच्या भोवऱ्यात; कारवाईकडे लक्ष

प्रभात वृत्तसेवा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कोपरगाव – जिल्हा परिषदेच्या मुर्शतपूर येथील शाळेतील एका शिक्षकाने पाचवीतील विद्यार्थ्यांना परिसर अभ्यासक्रमाच्या नावाखाली लैंगिक शिक्षणाचे धडे देऊन अकलेचे तारे तोडले.
एवढी गंभीर घटना होऊनही गटशिक्षणाधिकाऱ्यांनी साधी नोटीस बजावून कारवाई केली नाही. त्यामुळे शिक्षण विभागाचे अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात सापडले असून ते संबंधित शिक्षकाला पाठिशी तर घालत नाहीत ना, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.
या शिक्षकाचा प्रताप (!) मुलांनी पालकांना सांगितला. शिक्षकाने दिलेल्या धड्याची उजळणी झाल्याने ते चांगलेच संतप्त झाले. संतापलेल्या पालकांनी शिक्षकाला शोधण्याचा प्रयत्न केला; पण शिक्षक घटना घडल्यापासून शाळेत आला नाही. अखेर आठ दिवसांनी शाळेत आल्याचे समजताच पालकांनी त्या लंपट शिक्षकाला चांगलाच धडा शिकविला; पण हे सर्व प्रकरण दडपण्याचा प्रयत्न शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला. “प्रभात’ ने या विषयाला वाचा फोडल्यानंतर शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना जाग आली. घटना घडून आठ दिवस झाले, तरी कोपरगावचे गटविकास अधिकारी कपिलनाथ कलोडे याबाबत अनभिज्ञ होते. बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर गटशिक्षणाधिकारी शबाना शेख यांना त्यांनी चौकशीचे आदेश दिले. शेख यांनी शाळेला भेट दिली. त्यांनी आपला अहवाल वरिष्ठांना पाठविल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीचे सदस्य राजेश परजणे यांनी मुर्शतपूरच्या शाळेला भेट दिली. या घटनेची सखोल चौकशी करून संबंधित शिक्षक व मुख्याध्यापकांवर योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शालिनी विखे यांच्या लोणी गटात अशाच स्वरुपाची एक घटना घडली होती. त्या वेळी संबंधिताला नोटीस बजावून लगेच त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली; परंतु कोपरगावमध्ये या घटनेची माहिती असूनही आठ दिवस शिक्षण विभागाचे अधिकारी गप्प होते. केवळ संबंधित शिक्षक, मुख्याध्यापकावर कारवाई करून उपयोग नाही, तर गटशिक्षणाधिकाऱ्यांनी या प्रकरणात का दुर्लक्ष केले, याची चौकशीही व्हायला हवी, अशी मागणी नागरिक करीत आहेत. या लंपट शिक्षकाला निलंबित करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

किरकोळ प्रकरणात सक्रिय, गंभीरमध्ये मात्र निष्क्रिय

कोपरगाव तालुक्‍यातील जिल्हा परिषदेच्या शाळांची शिस्त जिल्हयाला परिचित आहे. शिक्षकांनी साधे ओळपत्र गळयात घातले नाही, उशिरा शाळेत आले, प्रशिक्षण कालावधीत गैरहजर राहिले किंवा उशिरा आले, शाळेच्या वेळेत इतर ठिकाणी आढळले आदी तक्रारी आल्या, तरी संबंधित शिक्षकांना खडेबोल सुनावले जाते. त्यांना नोटीस काढली जाते. प्रसंगी सेवा पुस्तकात नोंदी केल्या जातात. असे असताना लहान मुलांना लैंगिक शिक्षणाचे धडे देण्याचा किळसवाणा प्रकार करणाऱ्या शिक्षकावर कारवाई करून अहवाल पाठविण्यासाठी इतका उशिर का केला, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)