लॅन्ड टायटल विम्यामुळे घरांच्या किंमती वाढण्याची शक्‍यता

संग्रहित छायाचित्र...

“क्रेडाई’कडून उपक्रमाचे स्वागत

पुणे – जमिनीच्या मालकीला संरक्षण देण्यासाठी लॅन्ड टायटल विमा योजना सुरू करण्याचा महाराष्ट्र सरकारचा मानस आहे. बांधकाम व्यावसायिक समुदायाने त्याचे स्वागत केले आहे. “क्रेडाई’नेही या उपक्रमाचे स्वागत केले आहे. यासंबंधीची पावले उचलण्यापूर्वी सरकारने जमिनी संबंधीच्या व्यवहार आणि नोंदी यांचा सविस्तर विचार करणे गरजेचे आहे. कारण देशात जमिनीच्या मालकीला संरक्षण देण्यासाठीच्या विम्याची चौकट अद्याप बाल्यावस्थेत आहे. सरकारही भूमी अभिलेखाची रक्षक असून अनेक संस्थांमार्फत या अभिलेखांची हाताळणी होत असते. या सर्व संस्था आपापल्या कोशात काम करतात. त्यांच्यामध्ये योग्य समन्वय नसल्याने आपल्या देशात जमिनीचे वाद उपस्थित होतात, असे “क्रेडाई’चे म्हणणे आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

रेरा कायद्याच्या कलम 16 मध्ये विकासकांना लॅंड विमा घेणे अनिवार्य केले आहे. मात्र, प्रत्येक राज्याच्या नियामकाने या संबंधात अधिसूचना प्रसिद्ध केल्यावरच ही सक्ती लागू होईल. रेरा हा एक प्रगतीशील कायदा असून, त्यात लॅन्ड टायटल विम्याची तरतूद असली तरी यामुळे घरांच्या किंमती निश्‍चितच वाढतील याकडे लक्ष वेधले आहे.

“लॅन्ड टायटल’ ही संकल्पना नवीन असल्यामुळे विमा कंपनीकडून अयोग्य विमा धोरण आणि तशाच सेवा देणाऱ्या कंपन्या या क्षेत्रात एकाधिकार निर्माण करणार नाहीत. याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. असे मत “क्रेडाई’ महाराष्ट्रचे अध्यक्ष शांतीलाल कटारिया यांनी व्यक्‍त केले.

सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या “लॅन्ड टायटल विमा योजना’ या परदेशातील उपलब्ध विमा योजनांच्या नकला असल्याचे प्रामुख्याने जाणवते. भारतात जमीन ही केवळ वादग्रस्त आणि खटल्यांची बाब नसून, हा विषय अनेक वैयक्‍तिक कायद्यांशी आणि प्रचलित परंपरांशी निगडीत आहे. याच कारणास्तव जमिनीच्या मालकीसंबंधी शाश्वती देणारी विमा योजना गरजेची आहे. परंतु बाजारात सध्या उपलब्ध असलेल्या विमा योजना ही मुलभूत गरज पूर्ण करण्यास सक्षम नाही. त्यामुळे विमा घेतल्यानंतरही क्‍लेमच्या योग्य रक्‍कम संबंधितांना मिळणार नाहीत. मात्र, या अतिरिक्‍त खर्चामुळे घरांच्या किंमती वाढतील आणि परवडणारी घरे तयार करणाऱ्या विकसकांवर जास्तीचे ओझे पडेल. उपलब्ध असलेल्या विमा योजनांनुसार 15 लाखांखाली विकल्या जाणाऱ्या घरांसाठी लॅन्ड टायटल विम्याची रक्‍कम साधारण चाळीस हजार रुपये ते दीड लाख रुपयांपर्यंत होते. या रकमेने घरांच्या किंमती वाढतील, असा अंदाज कटारिया यांनी व्यक्‍त केला.

जोपर्यंत योग्य विमा योजना आणि दाव्याची प्रक्रिया सुस्पष्ट, मजबूत होत नाही. तोपर्यंत अशा विम्याद्वारे ग्राहकांच्या जमीन मालकीस योग्य संरक्षण देण्याचा प्राथमिक उद्देश साध्य होणार नाही. परंतु विनाकारण विमा प्रीमियरवर खर्च वाढेल, अशी शक्‍यताही त्यांनी व्यक्‍त केली आहे.

जमिनीच्या मूळ मालकापासून मालकीची हस्तांतरणाची नोंद जमीन आणि जमीन मालकाच्या फोटोसह नोंदवल्यास एखाद्या व्यक्तीने धारण केलेल्या जमिनीची माहिती आणि एकूण क्षेत्रफळाची माहिती काढणे सहज सोपे होईल. त्यामुळे लॅन्ड टायटल विम्याचे स्वरूप ही सर्वांना सुसह्य होईल, असेही मत कटारिया यांनी मांडले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)