लुका मॉड्रिकला “सर्वोत्तम फुटबॉलपटू’ पुरस्कार

फिफा पुरस्कार जाहीर : रोनाल्डो, मेस्सी यांची परंपरा खंडित

लंडन: क्रोएशियाचा अव्वल मध्यरक्षक आणि रेयाल माद्रिद संघाचा आधारस्तंभ लुका मॉड्रिकने जागतिक फुटबॉल महासंघाचा (फिफा) यंदाच्या वर्षातील सर्वोत्तम फुटबॉलपटू हा प्रतिष्ठेचा पुरस्कार पटकावताना भल्याभल्यांना हादरा दिला. लुका मॉड्रिकने हा पुरस्कार मिळविल्यामुळे पोर्तुगालचा अग्रगण्य खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि अर्जेंटिनाचा महान खेळाडू लियोनेल मेस्सी या श्रेष्ठ फुटबॉलपटूंची या पुरस्कारावरील सुमारे दशकभरापेक्षा अधिक काळ चालू असलेली मक्‍तेदारी संपुष्टात आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जागतिक फुटबॉल महासंघाने यंदाच्या वर्षासाठीचे पुरस्कार आज जाहीर केले. त्यातील सर्वोत्तम फुटबॉलपटू या पुरस्कारासाठी ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लियोनेल मेस्सी यांच्यासह इजिप्तचा विश्‍वचषक स्पर्धा गाजविणारा आघाडीवीर मोहम्मद सालाह यांच्यात चुरस असल्याची चर्चा होती. परंतु या तिघांनाही मागे टाकत लुका मॉड्रिकने हा बहुमान पटकावला. ब्राझिलच्या मार्टाने विक्रमी सहाव्यांदा “जगातील सर्वोत्तम महिला फुटबॉलपटू’ हा पुरस्कार जिंकला. तर रेनाल्ड पेड्रोस यांनी महिलांचा सर्वोत्तम प्रशिक्षक हा पुरस्कार मिळविला.

लुका मॉड्रिकने रेयाल माद्रिद व क्रोएशिया या दोन्ही संघांकडून यंदाच्या वर्षी नेत्रदीपक कामगिरी बजावली. त्याने वयाच्या 33 व्या वर्षी जगभरातील अव्वल खेळाडूंशी टक्‍कर देताना रेयाल माद्रिद संघाला सलग तिसऱ्यांदा चॅम्पियन्स करंडक जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला. तसेच त्याने क्रोएशियाला फिफा विश्‍वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारून दिली. क्रोएशियाने ही कामगिरी इतिहासात पहिल्यांदाच केली आहे.

लंडन येथे काल पार पडलेल्या झगमगाटी समारंभात हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्या वेळी रोनाल्डो व मेस्सीसह अनेक प्रमुख खेळाडू अनुपस्थित होते. अधिकृत प्रवक्‍त्याच्या सांगण्यानुसार रोनाल्डो युव्हेन्टस संघाकडून, तसेच मेस्सी बार्सिलोना संघाकडून खेळण्यात व्यस्त असल्याने या सोहळ्याला हजर राहू शकला नाही. परंतु इतक्‍या महत्त्वाच्या समारंभाला रोनाल्डो व मेस्सी यांची गैरहजेरी टीकेचा विषय ठरली.

खुद्द लुका मॉड्रिकने वेगळ्या शब्दांत रोनाल्डो व मेस्सी या समारंभाला हजर नसल्याबद्दल नाराजी व्यक्‍त केली. प्रत्येकाकडे आपली कारणे असतातच, असे सांगून मॉड्रिक म्हणाला की, हे दोन महान खेळाडू पुरस्कार वितरण समारंभाला आले असते तर मला खरोखरीच आनंद झाला असता. परंतु ते आले नाहीत. लुका मॉड्रिकच्या सनसनाटी पुरस्कार विजयामुळे रोनाल्डो आणि मेस्सी यांच्यातील बरोबरी कायम राहिली आहे. रोनाल्डो आणि मेस्सी या दोघांनीही सर्वोत्तम फुटबॉलपटू हा पुरस्कार प्रत्येकी पाच वेळा जिंकला आहे.

इजिप्तच्या महंमद सालाहने पदार्पणाच्याच मोसमात तब्बल 44 गोल करताना सर्वांचे लक्ष वेधून घेतले. “वर्षातील सर्वोत्तम गोल’ हा पुरस्कार सालाहने पटकावला. मर्सीसाईड डर्बी स्पर्धेत इव्हर्टनविरुद्ध त्याने केलेल्या गोलला हा पुरस्कार देण्यात आला. फ्रान्सला विश्‍वचषख जिंकून देणारे प्रशिक्षक दिदियर देस्चॅम्प्स यांना वर्षातील सर्वोत्तम प्रशिक्षक हा पुरस्कार देण्यात आला. खेळाडू आणि प्रशिक्षक या दोन्ही भूमिकांमध्ये विश्‍वचषक जिंकणारे देस्चॅम्प्स हे जगातील केवळ तिसरे खेळाडू ठरले आहेत. बेल्जियमच्या थिबॉट कोर्टाइसने “सर्वोत्तम गोलरक्षक’ हा पुरस्कार पटकावला.

अविश्‍वसनीय गौरव- लुका मॉड्रिक

जागतिक फुटबॉल महासंघाने जाहीर केलेला सर्वोत्तम फुटबॉलपटू पुरस्कार हा अविश्‍वसनीय गौरव असल्याचे सांगून लुका मॉड्रिक म्हणाला की, हे संपूर्ण वर्ष माझ्यासाठी आश्‍चर्यकारकरीत्या चांगल्या कामगिरीचे ठरले. विश्‍वचषक स्पर्धेतील माझी कामगिरी मला स्वत:लाच अनपेक्षित होती. लुका मॉड्रिकने फिफा विश्‍वचषक स्पर्धेत डेन्मार्क व रशियाविरुद्धच्या लढतीत दोन गोल केले. शिवाय पेनल्टी शूट-आऊटमध्येही गोल करीत क्रोएशियाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. परंतु या गोलपेक्षाही सहकाऱ्यांना गोल करण्यासाठी सर्वोत्तम संधी मिळवून देण्याच्या त्याच्या कौशल्यामुळेच मॉड्रिकला “गोल्डन बॉल’ हा मानाचा पुरस्कार देण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)