“लाभाविन प्रेम करायला’ शिकवणारे रक्षाबंधन… (प्रभात ब्लॉग)

एक माहेरवाशीण असते. सासरच्या घरी नांदत असते. सासू- सासरे, मुलं-बाळं, पती सगळ्यांसाठी “झिजत’ असते. दिवसभर, वर्षभर…. आणि आयुष्यभरही…. माहेरच्यांना सोडून, सासरचं माप ओलांडून जेव्हा ती नवीन घरी प्रवेश करती होते ना; तेव्हा तिनेच तर ठरवलेलं असतं आता हेच घर माझं.

पण कुठे तरी आत मनाच्या तळाशी असतो एक तिचा खास कप्पा…. त्यात असतात तिच्या बालपणीच्या हिरव्या आठवणी. आई-वडिलांच्या लाडात गेलेलं लहानपण, पुरवले गेलेले हट्ट, हसणं-खिदळणं, धमाल मस्ती….. किती काय काय…..
आणि या साऱ्यात सोबत असतो तिचा भाऊ. कधी कुणाचा पाठचा तर कुणाचा थोरला. वडिलांनंतर बहिणीवर प्रेम करणारा, तिची काळजी घेणारा, तिला जपणारा भाऊरायाच तर असतो. त्याच्याशी मग कधी भांडण झालेलं असलं ना; तरी नाहीच करमत तिला.  मात्र असं भावाचं प्रेम तिला दुर्मिळच होऊन जातं. पण मग रक्षाबंधन आणि भाऊबीज जवळ आली ना, की तिचं मन रमून जातं भावाच्या आठवणीत….

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

विद्यार्थी मित्रांनो, काही वर्षांनी जेव्हा तुम्ही मोठे व्हाल, तुमच्या बहिणीचे लग्न होईल, तेव्हा तुम्हाला माझे म्हणणे नक्की आठवेल. जेव्हा आपण सोबत रोजच असतो ना, तेव्हा नाही जाणवत आपल्याला एखाद्या माणसाची किंमत. पण ताई-दादा एकमेकांना काही दिवस भेटले नाहीत की मात्र त्यांचे महत्त्व पटू लागते.
भरजरी गं पितांबर दिला फाडून 
द्रौपदिसी बंधू शोभे नारायण ।।धृ।। 
 सुभद्रा कृष्णाच्या पाठीची बहिण 
विचाराया गेले नारद म्हणून 
बोट श्रीहरीचे कापले गं बाई 
बांधायाला चिंधी लवकर देई 
सुभद्रा बोलली, “”शालू नि पैठणी 
फाडून का देऊ चिंधी तुम्हासी मी?” 
पाठची बहीण झाली वैरीण…..द्रौपदीसी बंधू….. 
 द्रौपदी बोलणी हरिची मी कोण? 
परि, मला त्याने मानिली बहीण 
काळजाची चिंधी काढून देईन 
एवढे तयाचे माझ्यावरी रीण 
वसने देऊन प्रभु राखी माझी लाज 
चिंधीसाठी आला माझ्या दारी हरी आज 
त्रैलोक्‍य मोलाचे वसन दिले फाडून द्रौपदीची 
प्रेमाचे लक्षण भारी विलक्षण 
जैसी ज्याची भक्ती तैसा नारायण 
रक्ताच्या नात्याने उपजे ना प्रेम 
पटली पाहिजे अंतरीची खुण 
धन्य तोचि भाऊ धन्य ती बहीण 
प्रीती जी करिती जगी लाभाविन 
चिंधी पाहून हरी झाले प्रसन्न…. भरा द्रौपदिसी बंधू 

‘श्‍यामची आई’ चित्रपटातील आचार्य अत्रेंनी लिहिलेलं हे गाणं…
खरंच लाभावीना प्रीती बहीण- भावाचीच असते शकते, बहीण- भावाच्या या प्रेमाची ही पुराणकाळापासून चालत आलेली परंपरा, इतिहास काळातही अशी काही उदाहरणं आपल्याला देता येतील.
काळ बदलला आणि त्यानं बदलले आहेत मानवी नात्यांचे संदर्भ. राखी बांधून बहिणीने भावासाठी प्रार्थना करायची आणि भावाने तिचे रक्षण करायचे एवढ्या पुरता सीमित हा सण आता उरलेला नाही.
सामाजिक जाण ठेवून आपल्यातले काही जण आता सामाजिक रक्षाबंधन साजरे करतात. काही विद्यार्थ्यांनी सीमेवरील जवानांना राख्या, पत्रं पाठवली आहेत. झाडांना, रिक्षावाल्या काकांना, सफाई करणाऱ्या मावशी-काकांना, पोलिसांना… अशा कित्येकांना आपण राखीच्या निमित्ताने भेटतो. आपले रक्षण करणाऱ्या या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो.
केवळ एक धागा बांधणे, मिठाई, ओवाळणीतील गिफ्ट, रिटर्न गिफ्ट इतकाच हा सण सीमित न राहता  “लाभाविन प्रेम करायला’ शिकवणारा हा नात्यांमधील जिव्हाळा अक्षय्य राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

– दीप्ती डोळे, पुणे 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)