लान्सनायक नजीर वाणीला मरणोत्तर अशोक चक्र !

नवी दिल्ली: शहीद लान्स नायक नजीर अहमद वाणीला मरणोत्तर अशोक चक्र देऊन गौरवण्यात आले आहे. देशातील सर्वोच्च शौर्य पुरस्कार देण्यात आलेल्या नजीर अहमद वाणीचा दहशतवादाकडून देशभक्तीकडे प्रवास मोठा चित्तवेधक आहे. दहशतवादासारखा नापाक मार्ग सोडलेल्या एखाद्या जवानाचा देशाच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्याची ही पहिलीच वेळ आहे. अशोकचक्र मिळवणारे ते पहिले काश्‍मिरी जवान आहेत.

लष्करात दाखल होण्यापूर्वी नजीर अहमद वाणी दहशतवादी कारवायात सामील असायचा. पण नंतर त्याचे मन बदलले आणि देशसेवा करण्यासाठी तो सन 2004मध्ये लष्करात भरती झाला. लष्कराच्या 38 राष्ट्रीय रायफल्समध्ये लान्स नायक बनलेल्या नझीर अहमद वाणीने नोव्हेंबर महिन्यात अतुल्य पराक्रम केला. शोपियाच्या बटागुंड येथे झालेल्या कारवाईत त्याने शस्त्रसज्ज हिजबुल आणि लष्करच्या सहा दहशतवाद्यांचा सामना केला आणि आपल्या जखमी साथीदाराला सुरक्षितपणे बाहेर काढले. सहाही दहशतवादी मारले गेले. मात्र तो स्वत:ला वाचवू शकला नाही. या शूर जवानाने अतिरेक्‍यांसोबत लढताना 23 नोव्हेंबर, 2018 रोजी आपले प्राण देशाला अर्पण केले. या पराक्रमासाठी नझीर अहमद वाणीला शांतिकाळातील सर्वोच्च शौर्य पुरस्कार अशोक चक्र देण्यात आला आहे. त्याच्या मागे त्याची पत्नी आणि 18 व 20 वर्षे वयाची दोन मुले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

देशातील ज्या भागात सर्वाधिक दहशतवादी कारवाया होतात, त्या काश्‍मीरमधील कुलगाम जिल्ह्यातून आलेल्या नझीर अहमद वाणीची कहाणी पुढील पिढ्यांना दहशतवादाऐवजी लष्करात जाण्यासाठी प्रेरणा देईल. नझीर अहमद वाणीला 2007 आणि 2018 मध्ये, दोन वेळा सेना पदक देऊन गौरवण्यात आले होते. वाणी यांच्यासह यंदा चार अधिकारी आणि जवानांना किर्तीचक्र आणि 12 जणांना शौर्यचक्राने गौरवण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)