सातारा : अंगाला सुटली खाज, घेणाऱ्या हाताला नाही लाज

लाचलुचपतच्या कारवाईने चर्चांना ऊत : “ऍन्टी’च घेत असेल तर भ्रष्टाचार थांबणार कसा?

प्रशांत जाधव

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

लाचलुचपत म्हणजे लाच घेणाऱ्यांचा कर्दनकाळ असा लोकांचा समज आहे. कोणी लाच घेत असेल तर या “ऍन्टी’वाल्यांना कळवावे असा शिरस्ता. पण हा शिरस्ता मोडीत निघतो की काय असे वाटायला लागले आहे. वाई येथील कुख्यात डॉक्‍टर संतोष पोळ याच्या भानगडीमुळे चर्चेत आलेली साताऱ्याची एसीबी पुन्हा म्हसवडमधील कारवाईने भलतीच चर्चेत आली आहे.

म्हसवडमध्ये कारवाई करताना नेमके काय झाले? कुणाला अन्‌ कशी अटक झाली? कुणाला वाचवण्यासाठी अँन्टीच्या एका कारभाऱ्याला पन्नास हजाराची गठडी दिली. या चर्चांनी सध्या माण तालुक्‍यात गावागावातील कठड्यावर जागा घेतली आहे. चर्चा खऱ्या खोट्याच्या कसोटीवर टिकतील की नाही माहित नाही. पण त्यामुळे एसीबीचा कारभार म्हणजे “अंगाला सुटली खाज, घेणाऱ्या हाताला नाही लाज’ असाच असल्याची चर्चा सुरू आहे.

साताऱ्याची एसीबी तशी प्रामाणिक आहे, म्हणायला हरकत नाही. तक्रार आलीच तर ते कारवाई करतात, असा लोकांचा समज बहुतेक खरा आहे. पण याच प्रामाणिक एसीबीची म्हसवडमधील कारवाई जरा शंकेच्या भोवऱ्यात सापडली आहे. पानटपरी वाल्यावर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली होती. त्या प्रकरणात तक्रारदाराला जामीन मिळवून दिला म्हणून दोन हजाराची लाच घेताना म्हसवडचा हवालदार बबन काळु पवार याला एसीबीने ताब्यात घेतले होते.

त्याच कारवाईत अजून एक कर्मचारी होता. त्याला वाचवण्यासाठी म्हसवडच्या कारभाऱ्यांनीच एसीबीच्या कारभाऱ्यांना विनवण्या करून काहीतरी करू असे आश्‍वासन दिले. एसीबीचे हे कारभारी अधिकारी असले तरी शेवटी माणुसच आहेत. त्यांना तरी लोभ कसा सुटेल? मुळात म्हसवडला एसीबीच्या जाळ्यात अडकलेले हवालदार पवार हे गंमतीवारेच अडकल्याचे बोलले जाते.

स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केलेल्या त्या टपरीचालकाची अन्‌ पवारांची दोस्ती. याच दोस्तीने पवारांचा घात केला. मित्राला चेष्टेने काय हाय का नाय असे बोलले अन्‌ पवार निघून गेले. पण त्या टपरीवाल्याने अन्‌ पवारांच्या पोलिस ठाण्यातच नोकरीस असलेल्या त्याच्या पावण्याने पवारांचा काटा काढायचा ठरवले. मग त्या पोलिस पावण्याने त्याच्या एसीबीत असलेल्या पै-पावण्याला याची माहिती दिली.

अन्‌ कारवाईचा फास पवारांच्या भोवती आवळला अशी चर्चा आहे. जर पवार एसीबीच्या जाळ्यात अडकत असतील तर त्यांच्यासोबत असलेला दुसरा कर्मचारी कसा सुटला याचेही उत्तर लोकांना अपेक्षित आहे. तो कसा सुटला याबाबत सध्या माण तालुक्‍यात उलट सुलट चर्चा सुरू आहेत. त्या दुसऱ्या कर्मचाऱ्याला वाचवण्यासाठी म्हसवडच्या कारभाऱ्यांनी लगोलग फोनाफोनी केल्याचे बोलले जाते.

मग कारभाऱ्यांच्या फोनला एकजण कसाबसा पावला आणि सुरू झाला “कितने है चा’ बोलबाला. मग मिळालेल्या मालपाण्यातूनच एसीबीच्या एका कारभाऱ्याला खुश करण्यात आले. एकावर चक्क पन्नास हजाराची कुऱ्हाड कोसळली. तो दुसरा कर्मचारी सुटला याचे दुःख नाही, पण त्याला ज्या पध्दतीने सोडले ती पद्धत चुकीची असल्याचे बोलले जाते. अर्थात माण तालुक्‍यात सुरू असलेली ही चर्चा आहे. त्यामुळे एसीबीने जरा काळजी घेतली तर अशा चर्चा वाढीस लागणार नाहीत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)