लाचखोर तलाठ्याला सक्तमजूरीची शिक्षा

सातारा, दि.31 (प्रतिनिधी)

बॅंक बोजा कमी करून न्यायालयीन कामासाठी सात बारा उतारा व फेरफार काढून देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच स्वीकारणारा पळशी (ता. खंडाळा) येथील तत्कालीन तलाठी विजय व्यंकटराव भोसले याला विषेश न्यायाधीश एन. एल. मोरे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार तीन वर्ष सक्तमजूरी व पाच हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास सहा महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली.

याबाबत अधिक माहिती अशी की, पळशी (ता.खंडाळा) गावच्या हद्दीतील गट क्रं 2050 मधील शेतजमीनीवरील बॅंक बोजा कमी करून त्याचा सातबारा उतारा देण्यासाठी तसेच फेरफार क्रं.2376 देण्यासाठी 16 एप्रिल 2014 रोजी आरोपी तलाठी याने तक्रारदराला दोन हजाराची लाच मागितली होती.

त्यानंतर तक्रारदराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सातारा यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. मिळालेल्या तक्रारीनुसार तत्कालीन पोलीस उपाधीक्षक (एसीबी) श्रीहरी पाटील यांनी दि. 19 एप्रिल 2014 मध्ये सापळा लावला होता. त्यावेळी भोसले हा दोन हजाराची लाच घेताना रंगेहात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाला सापडला होता.

त्यानंतर भोसले याच्याविरोधात खंडाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याचा तपास श्रीहरी पाटील यांनी केला होता. पाटील यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर हा खटाला जलदगती न्यायालयात चालवण्यास सुरूवात झाली.

यात चार साक्षीदार तपासल्यानंतर सरकारी वकील लक्ष्मणराव खाडे यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून विषेश न्यायाधीश एन. एल. मोरे यांनी आरोपीला लाच लुचपत प्रतिबंधक अधिनियम कलम 7 अन्वये 3 वर्षे सक्त मजुरी व 5 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने साधी कैद अशी शिक्षा ठोठावली.

या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून पोलीस अधीक्षक (एसीबी) राजेश बनसोडे, अप्पर अधीक्षक सुषमा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अशोक शिर्के पोलीस उपाधीक्षक (एसीबी) हवालदार विजय काटवटे, निलेश येवले यांनी काम पाहिले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.