लाखो रूपयांच्या निलगिरी झाडांची चोरी

बारामती, इंदापुरातून वाहणाऱ्या नीरा डाव्या कालव्यालगतच्या वनसंपदेवर डल्ला

गोकुळ टांकसाळे

भवानीनगर- बारामती, इंदापुरातून वाहणाऱ्या नीरा डाव्या कालव्यालगत असलेल्या निलगिरी झाडांची चोरी केली जात असून गेल्या काही महिन्यांपासून हा प्रकार सुरू असल्याने चोरट्यांनी लाखो रूपयांची झाडे तोडून त्याची विक्री केली असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे याबाबत पाटबंधारे विभाग पूर्णत: अनभिज्ञ असल्याने चोरीचा हा प्रकार अद्यापही सुरू आहे. याबाबत स्थानिक नागरिकांनी मात्र पाटबंधारे विभागाच्या या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

बारामती व इंदापूर तालुक्‍यातून नीरा डावा कालवा जातो; या कालव्याच्या दोन्ही बाजुने निलगिरीच्या झाडांचा ताटवा आहे. निलगिरी बहुगुणी, बहुउपयोगी आणि जलद वाढणारे झाड असल्याने एकात्मिक कृषी विकास कार्यक्रमात या झाडांचा समावेश करण्यात आला आहे. शिवाय सर्व प्रकारच्या जमीनीत हे झाड वाढत असल्याने सामाजिक वनीकरणाच्या मोहिमेतही निलगिरीला महत्त्वपूर्ण स्थान आहे. याच माध्यमातून गेल्या 15 वर्षांपेक्षा अधिक कलावधी पूर्वी या झाडांची लागवड कालव्यालगत करण्यात आली असल्याने या झाडांची वाढ पूर्ण झाली आहे. निलगीरीच्या या झाडांची उंचीही किमान 20 ते 25 फुटांपर्यंत झाली असून लाकुडफाटाही एकसलग वाढला आहे. अशा झाडांना ाजारपेठेत किंमत अधिक मिळते. शिवाय, निलगिरीचे झाड उन्हाळ्यात पूर्णत: वाळते. म्हणजे नवी पाने फुटण्यापूर्वी त्याच्या वजनात एक तृतीयांश घट येते व ते एक चांगले इंधन म्हणूनही वापरता येते. शिवाय, यातील औषधी गुण असलेले कॅलरीफिक मूल्य कमीत कमी 4700 ते 4800 कॅलरीज प्रती किलोग्रॅम असल्याने औषध तयार कंपन्या तसेच आयुर्वेदीय कंपन्यांकडूनही अशा झाडांना याच कालावधीत मोठी मागणी असते. पाने तसेच कोवळ्या फांद्यांपासून निलगिरीचे तेल काढले जाते. याचा वापर औषधी, औद्योगिक व सुगंधी तेल निर्मितीसाठीही केला जातो. तसेच निलगिरीचे लाकूड औद्योगिक उपयोगासाठी व 70 प्रकारच्या तेल औषधांसाठी वापरले जाते. तसेच, निलगिरीच्या तेलात सिनीओल जास्त असल्याने यापासून साबण, स्प्रे व औषधी गोळ्याही तयार केल्या जातात.

निलगिरीच्या झाडांपासून कागद निर्मितीही केली जाते. या झाड्याच्या सालीपासून किंवा बुंध्यातून पाझरणाऱ्या स्त्रावामुळे कातडी कमविण्यास लागणारे टेनिनसारखे द्रव्यही मिळते. या बाबी लक्षात घेतल्या तर निलगिरीच्या पूर्ण वाढ झालेल्या एका झाडाची किंमत कमीत कमी 10 ते 15 हजाराच्या आसपासही जावू शकते. यामुळेच सध्या शासकीय जागेवर लावलेल्या आणि पूर्णवाढ झालेल्या निलगिरीच्या झाडांची चोरी करण्याचे प्रमाण वाढले आहे.
बारामती आणि इंदापूर तालुक्‍यात नीरा डाव्या कालव्यालगत शासकीय जागेत असलेल्या अशा झाडांची चोरी करण्याचे प्रमाण मोठे आहे.

याकरिता संबंधीत चोरट्यांकडून निलगिरीच्या झाडांच्या बुंध्यालगत असलेल्या वाळलेल्या गवतास आग लावली जाते. बंधा जळाल्यानंतर ते झाड तसेच सोडून दिले जाते. काही अंतराच्या फरकाने अशी पूर्णवाढ झालेली निलगीरीची झाडे जाळून ठेवली जातात, अशा प्रकारे बुंधा जळाल्याने ही झाडे एक-दोन दिवस उन्मळून पडतात. त्यानंतर चोरटे पाहणी करून रातोरात अशी झाडे एकदम गोळा करून पळवून नेत असल्याचा प्रकार सर्रास सुरू असल्याचे प्रत्यक्षदर्शी नागरिकांचे म्हणणे आहे. निलगीरी झाडांच्या चोरीच्या प्रयत्नात अन्य झाडाझुडपांचेही नुकसान हात असून या प्रकाराकडे पाटंबधारे विभागाचे मात्र दुर्लक्ष आहे.

  • पाटबंधारे विभागाने जागे व्हावे…
    नीरा डावा कालव्यालगत असलेली निलगीरीची झाडे पूर्णवाढ झालेली आहेत, अशा झाडांची मुळे जमीनीत कमीत कमी 10 ते 15 फुट आतपर्यंत खोलवर जातात त्यामुळे ही झाडे मुळासकट काढणे कठीण आहेत. याकरिताच अशा झाडांचे बुंधे जाळून ती पाडली जात आहेत. तसेच, कोणतीही मशीनरी न वापरता ही झाडे पाडली जात असल्याने येणाऱ्या जाणाऱ्यांना अशा चोरीच्या प्रकाराचा साधा संशयही येत नाही. मात्र, अशा पद्धतीने अनेक झाडे गायब होवू लागल्याने चोरीचा हा फंडा अनेकांच्या लक्षात येवू लागला आहे. परंतु, याकामी पाटबंधारे विभागाने जागे होणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
  • बारामती आणि इंदापुरात असे प्रकार घडत असल्याची ठिकाणांची पाहणी करून संबंधीतांवर कायदेशीर करवाई केली जाईल. याकरिता कर्मचाऱ्यांना तातडीने सूचना करण्यात येतील. नागरिकांनीही अशा कामी सहकार्याची भूमिका ठेवून असे काम ज्या ठिकाणी होत असेल त्याबाबत तातडीने कळवावे.
    – प्रकाश जगताप, उपविभागीय अधिकारी, पाटबंधारे विभाग, बारामती

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.