लाइट बिल वाचवायचयं….

जर आपण वाढत्या लाइट बिलाने त्रस्त असाल तर काही इको-फ्रेंडली उपायांच्या माध्यमातून वाढत्या बिलावर काही अंशी मात करू शकता. स्मार्ट आयडिया, उपकरणे किंवा मटेरियल्सचा वापर करून आपण घरात वाया जाणारी ऊर्जा वाचवू शकतो. यातून दरवर्षी वीज बिलातून मोठ्या प्रमाणात बचत होऊ शकते.

अलीकडच्या काळात वीजदरात सतत वाढ होत आहे. परिणामी प्रत्येक घराचे लाईट बिल अव्वाच्या सव्वा येत आहे. जर आपण वाढत्या बिलामुळे हैराण असाल तर ग्रीन बिल्डिंग आपली अडचण बऱ्यापैकी दूर करू शकते. ग्रीन बिल्डिंग कोणाला म्हणतात, असा प्रश्‍न तुम्हाला पडला असेल. ज्याठिकाणी पाण्याचा वापर कमी होतो आणि नैसर्गिक ऊर्जेची क्षमता वाढवली जाते, कचऱ्याचे प्रमाण कमी राहते आणि राहणाऱ्या नागरिकांना पारंपरिक इमारतीच्या तुलनेने अधिक आरोग्यदायी वातावरण प्रदान होते, अशा इमारतीला ग्रीन बिल्डिंग असे म्हटले जाते. तसे पाहिले तर सौरऊर्जा हे वीजबिल वाचवण्यासाठी रामबाण उपाय मानला जातो. परंतु सौरऊर्जेची उपकरणे खरेदी करणे, त्याची रचना ही प्रत्येकाच्याच आवाक्‍यात असतेच असे नाही. तसेच तेवढी जागाही असणे गरजेचे आहे. अशावेळी घरात नैसर्गिक प्रकाश आणणारी, आल्हाददायक वातावरण निर्माण करणारी आणखी काही स्मार्ट उपकरणे असून ती आपल्याला वीज बिलात कपात करण्यात मदत करतात.

हैदराबादच्या पर्वतरांगात असलेल्या गोवळकोंडा किल्ल्यातील दरबार हा स्वच्छ आणि थंड हवेचा उत्तम नमुना मानला जातो. उन्हाळ्यात सभोवतालचे वातावरण कितीही उष्ण आणि गरम होत असले तरी दरबारातील हवा मात्र थंड राहते. यामागचे कारण म्हणजे तेथे अनेक भिंतीचे उभे असलेले एक जाळे दक्षिण-पश्‍चिमेकडून येणाऱ्या गरम हवेला दरबारापर्यंत पोचेपर्यंत थंड करतात. तत्कालिन काळात अशा प्रकारची युक्ती लढवणे ही खरोखरच आश्‍चर्याची बाब म्हणायला हरकत नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

स्मार्ट विंडोंज: नव्या तंत्रांमुळे खिडक्‍या देखील स्मार्ट झाल्या आहेत. स्मार्ट विंडोजच्या रूपातून लोकप्रिय होणाऱ्या या खिडक्‍या प्रकाश आणि उष्णतेच्या अनुरूप गरजेनुसार स्वत:च्या स्थितीत बदल करण्यात सक्षम असतात. सर्वसाधारणपणे त्यात वापरण्यात येणाऱ्या काचेत किंचित क्रोमोजेनिक मटेरियल्सचा वापर केला जातो. या मटेरियल्समध्ये फोटोक्रोमिक, थर्मोक्रोमिक किंवा इलेक्‍ट्रोक्रोमिक गुण असतात. या खिडक्‍या प्रकाश, उष्णता किंवा इलेक्‍ट्रिसिटीच्या अनुसार काम करतात.

इलेक्‍ट्रोक्रोमिक विंडोज: अशा प्रकारच्या खिडकीतील काचेमध्ये एक पातळ भाग निश्‍चित केलेला असतो. बाहेरील दोन भागात पारदर्शक इलेक्‍ट्रॉनिक कंडक्‍टरचा समावेश असतो. या खिडक्‍या खूपच कमी म्हणजे एक ते 3 व्होल्टेज विजेवर काम करतात आणि त्याचा वापर बदलासाठी देखील केला जातो. यात वापरण्यात येणारी काच एखाद्या विशेष लाइट स्पेक्‍ट्रमला शोषून घेण्यासाठी देखील बसवली जाते. दिवसरात्र काम चालणाऱ्या कार्यालयासाठी अशा प्रकारची काच उपयुक्त ठरते.

थर्मोक्रोमिक विंडोज: या खिडक्‍या गरम होताच स्वत:मध्ये बदल घडवून आणतात. या केवळ अपारदर्शक होतात असे नाही तर खिडक्‍या पांढऱ्या आणि परावर्तनासाठी सक्षम देखील होतात. या बदलामुळे सूर्याचा प्रकाश किंवा वातावरणातील उष्णता थेट खोलीत येत नाही. या गुणांमुळेच एअर कंडिशनची गरज भासत नाही. तसे पाहिले तर पारदर्शकता संपल्याने काचेपलीकडे पाहता येत नाही. त्यामुळे त्याचा उपयोग हा खिडक्‍यांऐवजी प्रकाश येण्याच्या जागेवर करणे उपयुक्त ठरते.

फोटोक्रोमिक विंडोज: ही खिडकी प्रकाशाबरोबरच स्वत:मध्ये बदल घडवून आणते. ही खिडकी साधारणपणे उन्हात वापरण्यात येणाऱ्या गॉगलप्रमाणे काम करते. मात्र, उष्णतेला खोलीत येण्यापासून रोखू शकत नाही. अशा प्रकारच्या खिडक्‍या अजूनही निर्मितीच्या आणि विकासाच्या प्रक्रियेत आहेत. व्यावसायिक दृष्टिकोनातून त्याचा वापर होणे अद्याप बाकी आहे.

– जगदीश काळे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)