लहान मुलाच्या भवितव्याचा विचार करत ते दोघे दीड वर्षानंतर आले एकत्र

समुपदेशनातून गैरसमज, मतभेद झाले दुर


घटस्फोटाचा अर्ज मागे घेत दोघांनी नव्याने सुरू केला संसार

पुणे – लहान मुलाच्या भवितव्याचा विचार करून दीड वर्षाहून अधिक कालावधीपासून विभक्त राहणारे दोघे पुन्हा एकत्र आले. मुलाला आई-वडिलांचे प्रेम, एकत्र सहवास मिळणे आवश्‍यक असल्याचे समुपदेशनातून दोघांना पटवून देण्यात आले. आणि तुटता तुटता त्यांचा संसार वाचला.
माधव आणि माधवी (नावे बदलली आहेत) अशी त्या दोघांची नावे आहेत. 27 मे 2013 रोजी दोघांचा विवाह झाला. तो खासगी नोकरी करतो. तर ती शासकीय सेवेत आहे. तिची वेगवेगळ्या जिल्ह्यात बदली होत असते. दोघांना गोंडस बाळ आहे. घरगुती कारणावरून दोघांत वाद निर्माण झाले. वाद इतके विकोपाला गेले की, दोघे जानेवारी 2017 पासून विभक्त राहु लागले. मुल तिच्याकडे होते. मे 2017 मध्ये तिने घटस्फोट मिळावा, यासाठी येथील कौटुंबिक न्यायालयात अर्ज दाखल केला. त्यानंतर तिने त्याला बाळास भेटू देण्यास विरोध केला. त्यानंतर तिचे समुपदेशन करण्यात आले. त्यावेळी तिने त्याला बाळास भेटण्यास परवानगी दिली. दरम्यान कौटुंबिक न्यायालयात दाखल दाव्याच्या तारखा पडू लागल्या. मात्र, नोकरी करत असल्याने हजर राहण्यास दोघांना जमत नव्हते. त्यामुळे त्यांनी एकत्र येत परस्पर संमतीने घटस्फोटासाठी अर्ज केला. दोघे 21 ऑगस्ट 2018 रोजी कौटुंबिक न्यायालयातील न्यायाधीश सुभाष काफरे यांच्या न्यायालयात हजर राहिले. त्यावेळी या केसमध्ये समुपदेशन केल्यास दोघे पुन्हा एकत्रित राहु शकता, असे अभ्यास केल्यानंतर काफरे यांच्या लक्षात आले. त्यांनी स्वत: आणि विवाह समुपदेशक विद्या चव्हाण यांनी दोघांचे समुपदेशन केले. त्यामध्ये त्यांच्यातील गैरसमज आणि मतभेद दुर झाले. एकत्र येत गुण्यागोविंदाने संसार करण्याचे दोघांनी मान्य केले. याविषयी दि फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष ऍड. गणेश कवडे म्हणाले, कौटुंबिक न्यायालय केवळ घटस्फोट देणारे नाही. तर कित्येक वेळेला मोडकळीस आलेली नाती इथे पुन्हा जोडली जातात. याचेच हे उदाहरण आहे. या घटनेतील यशस्वी समुपदेशनामुळे बाळाला आई-वडिलांचा एकत्र सहवास मिळणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)