लहानग्यांची रोग प्रतिकार शक्ती वाढवा

रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे पौष्टिक घटक

आयुष्यातील सुरुवातीच्या टप्प्यापासूनच किंबहुना अगदी जन्मापासून योग्य पोषण हे मुलाची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी व प्रबळ करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे आणि पालकच हा पाया रचण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. संतुलित व पौष्टिक आहार मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, ज्यामुळे मुलांना नाक गळणे, सर्दी व पोटात दुखणे अशा आजारांचा त्रास कमी प्रमाणात होतो.

असे केल्यास संसर्ग होणारच नाही असे नाही. पण, आवश्यक जीवनसत्त्वे व मिनरल्ससह सर्व पौष्टिक घटक असलेल्या संतुलित आहाराच्या सेवनामुळे आजारपणात मुलांची रोगप्रतिकारक शक्ती प्रबळ राहू शकते. चांगल्या पोषणामुळे आजारपणात कमी त्रास होतो व लवकर बरे होण्यास मदत होते.

मुले विषाणू किंवा रोगजंतूंच्या संपर्कात येतात तेव्हा आरोग्यदायी मुलांपेक्षा कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या मुलांना संसर्ग त्वरित होण्याचा धोका असतो. अशा स्थितीमध्ये पालक हताश होऊन जातात. फक्त आजारपणाच्या काळातच रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी फळे, भाज्या आणि इतर अन्नपदार्थांचे सेवन केल्याने आजारापासून त्वरित आराम मिळू शकत नाही. चांगल्या आरोग्यदायी सवयींसोबतच नियमितपणे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणा-या आहाराचे सेवन केले पाहिजे.

आहारामध्ये आवश्यक असणारे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे पौष्टिक घटक पुढीलप्रमाणे :
१) झिंक 
झिंक मुलांमधील रोगप्रतिकार शक्ती वाढवत सामान्य सर्दी, अतिसार व श्वसनविषयक आजार कमी करण्यामध्ये मदत करते. ते जखम लवकर भरून निघण्यामध्येदेखील मदत करते आणि यामध्ये अ‍ॅण्टीऑक्सिडण्ट गुणधर्म आहेत, जे आपल्या शरीरातील पेशी व ऊतींचे मुक्त दूषित कणांमुळे होणारे नुकसान कमी करते. मुलांमध्ये झिंकचा अभाव असेल तर त्यांना संसर्ग होण्याचा अधिक धोका असतो. आहारामधून पुरेशा प्रमाणात झिंकचे सेवन झाले नाही तर पांढ-या रक्तपेशी व प्लेटलेट्सच्या संख्या कमी होऊ शकतात. भोपळ्याच्या बिया, कलिंगडच्या बिया, सूर्यफूलाच्या बिया, खसखस, तीळ, ओवा व काजू हे झिंकचे चांगले स्रेत आहेत. इतर स्रेत आहेत धान्य, शेंगदाणे, डाळी व शेंगा, सोयाबीन, उकडलेल्या अंडय़ातील पिवळे बलक, बदाम, हलीम/अळीव, मोहरी (राई), जीरा, धणे, वेलची व मेथी.

२) जीवनसत्त्व-क 
यामुळे पांढ-या रक्तपेशी एकत्रित राहण्यास मदत होते, ज्यामुळे संसर्गांचा सामना करण्यास शक्ती मिळते. जीवनसत्त्व-क सर्दीचा कालावधी व तीव्रता कमी करण्यामध्ये मदत करते आणि श्वसनमार्गातील संसर्गावर (आरटीआय) नियंत्रण ठेवते. ते हाडे व स्नायूंमध्ये कोलेजन तयार करते आणि जखम लवकर भरून निघण्यामध्ये मदत करते. तसेच ते दात व हिरडय़ा आरोग्यदायी ठेवते. जीवनसत्त्व-क चे लाभ मिळण्यासाठी मुलांनी ओवा, शिमला मिरची (हिरवी, पिवळी, लाल), काळ्या मनुका, पेरू, आवळा, स्ट्रॉबेरी, किवी, लिंबू, मोसंबी, संत्री, चिंच, पपई, कैरी, पपनस, मुळा, राजगि-याची पाने (मठ/चौलाई), बथुआ, अरबीची पाने, शेंगा व त्याची पाने, मेथीची पाने, मोहरीची पाने, गांठगोभी, कोबी, हिरव्या मिरच्या, फुलकोबी, कारले व ब्रोकोली यांचे सेवन केले पाहिजे. मुलांना कच्ची फळे व भाज्या किंवा काहीशा प्रमाणात भाजलेल्या भाज्या खाण्यास सांगा. कारण, शिजवताना यामधील आवश्यक जीवनसत्त्व निघून जातात.

३) जीवनसत्त्व-ड 
जीवनसत्त्व-ड रोगप्रतिकारक शक्ती प्रबळ करते आणि संसर्गाशी प्रभावीपणे लढा देते. जीवनसत्त्व-ड चे पुरेशा प्रमाणात सेवन स्वयंप्रतिरोधक आजार होण्याला प्रतिबंध होतो. जीवनसत्त्व-ड शोषून घेण्यासाठी मुलांचे आतडे आरोग्यदायी असले पाहिजे. दूषित अन्नामुळे आतडे बिघडले असेल तर जीवनसत्त्व-ड शोषणामध्ये अडथळा निर्माण होतो. आहारातील जीवनसत्त्व-ड मिळण्याचे चांगले स्रेत आहेत अंडी आणि बांगडा, तार्ली व रावस यांसारखे मासे.

४) जीवनसत्त्व-ई 
जीवनसत्त्व-ई त्याच्यामधील अ‍ॅण्टीऑक्सिडण्ट गुणधर्मांमुळे आपल्या शरीरामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. ते पर्यावरणीय व मुक्त दूषित कणांपासून पेशी व ऊतींचे संरक्षण करते. जीवनसत्त्व-ई च्या अभावामुळे नैसर्गिक किलर पेशींच्या संख्येमध्ये घट होते. परिणामत: मुलांच्या रोगप्रतिकारक शक्तीवर प्रतिकूल परिणाम होतो. जीवनसत्त्व-ई मिळण्याचे चांगले स्रेत आहेत सूर्यफूल बिया, बदाम, अक्रोड, पिस्ता, व्हीट जर्म व वनस्पती तेल.

५) जीवनसत्त्व-अ आणि बीटाकेरोटीन 
हे संसर्गाशी लढा देणा-या पेशींच्या संख्येमध्ये वाढ करतात. आपले शरीर बीटाकेरोटीनला जीवनसत्त्व-अ मध्ये बदलतात. जीवनसत्त्व-अ मध्ये अ‍ॅण्टीऑक्सिडण्ट गुणधर्म असून ते रोगप्रतिकार शक्ती वाढवतात. कॅरोटेनॉड्स असलेली विविध फळे व भाज्यांचे सेवन करा, जसे आंबा, पपई, खरबूज, कलिंगड, गाजर, टोमॅटो, खजूर, ड्राईड अ‍ॅप्रीकोट्स, रताळे, राजगिरा पाने, बथुआ पाने, बीट पाने, खाण्याचे पान, अरबीची पाने, शेंगांची पाने, मेथीची पाने, सलाड, मोहरीची पाने, ओवा, मुळ्याची पाने व पालक.

६) जीवनसत्त्व-ब 
जीवनसत्त्व-ब आपण सेवन करणा-या खाद्यपदार्थामधून ऊर्जा देते आणि आरोग्यदायी त्वचा, डोळे, यकृत व मेंदूच्या कार्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. ते हिमोग्लोबिन निर्मितीसाठी अत्यंत आवश्यक आहे. जीवनसत्त्व-ब च्या अभावामुळे अ‍ॅनेमिया होण्यासोबतच थकव्यासारखी लक्षणे जाणवू लागतात. मुलांमध्ये ऊर्जा व अवधानाची कमतरता असेल तर त्याच्यामध्ये या जीवनसत्त्वाचा अभाव असू शकतो. माशांमध्ये जीवनसत्त्व-बचे सर्वाधिक प्रमाण असल्यामुळे त्यांना माशांच्या सेवनामधून पुरेशा प्रमाणात जीवनसत्त्व-ब द्या. तसेच केळी, सूर्यफूल बिया, शेंगदाणे, पिस्ता, मांस व अंडी यामध्ये देखील जीवनसत्त्व-ब पुरेशा प्रमाणात असते. कमकुवत रोगप्रतिकारक शक्तीमुळे सतत आजारी पडणे, कमी प्रमाणातील ऊर्जा पातळी, अपचन, निस्तेज त्वचा, चिडचिड ही फोलेटचा अभाव असल्याची काही लक्षणे आहेत. फोलेटचे संश्लेषक रूप फोलिक आम्ल (जीवनसत्त्व-ब९) म्हणून ओळखले जाते. माशांमध्ये फोलेट उच्च प्रमाणात असते आणि इतर उत्तम स्रेत आहेत मोहरीची पाने, पालक, कढीपत्त्याची पाने, ओवा, पुदीन्याची पाने, शतावरी, ब्रोकोली, बीट, आंबा, लिमा बीन्स (सेम्फली), डाळी व शेंगा, सोयाबीन, तिळ, मोहरी बिया, शेंगदाणे व अंडय़ातील पिवळा बलक.

७) मॅग्नेशिअम 
मॅग्नेशिअम शरीरातील विविध रासायनिक क्रियांवर नियंत्रण ठेवते. ते मुलांचे पोट व पचनसंस्थेच्या कार्यासाठी महत्त्वाचे असून रोगप्रतिकार प्रणालीचे संरक्षण करते. या मिनरलकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते, पण त्याकडे देखील लक्ष देणे गरजेचे आहे. मुलांच्या आहारामध्ये बाजरी, नाचणी, ज्वारी, गव्हाचे पीठ, मक्याचे पीठ, सूर्यफूल बिया, भोपळ्याच्या बिया, तीळ, गार्डन क्रेस सीड्स, काळीमिरी, मोहरी बिया, शेंगदाणे, जिरे, कोंथिबीर बिया, वेलची, लवंग, ओवा, बदाम, काजू, अक्रोड, राजमा, छोले, चवळी, सोयाबीन, मटकी, उडीद डाळ, मूगडाळ, राजगिरा/रामदाना, राजगिरा पाने, कढीपत्ता पाने यांचा समावेश करा.

८) सेलेनिअम :
सेलेनिअम काही निश्चित विषाणूंमुळे होणा-या संसर्गापासून संरक्षण करते. आहारामध्ये मासे, अंडी, तीळ, गार्डन क्रेस सीड्स, मोहरी बिया, काजू, मशरुम्स, सब्जा, खायचे पान, बीट पाने, मुळ्याची पाने, कढीपत्ता पाने, पपई, ओवा, डाळी व शेंगा, राजगिरा/रामदानासारख्या डाळी व बाजरी, बार्ली, ज्वारी, नाचणी, गहू यांचा समावेश करा.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.