लबाड बोलणाऱ्या पापी सरकारला बाजूला सारा

अजित पवार : फलटण येथील परिवर्तन यात्रेत सरकारवर टीकास्त्र

फलटण, दि. 30 (प्रतिनिधी) – देशात व राज्यात सत्तेवर असलेल्या भाजप-शिवसेना सरकारने नुसत्या घोषणाबाजी करून जनतेला फसवले आहे.यांच्या काळात संपूर्ण बहुजन समाज आणि शेतकरी, कामगार वर्ग अडचणीत आला आहे. शेतकऱ्यांना मातीत घालण्याचे काम या सरकारने केले असून नुसते लबाड बोलणाऱ्या या पापी सरकारला बाजूला सारा असे आवाहन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या परिवर्तन यात्रेचे फलटण तालुक्‍यात आगमन झाल्यानंतर शहरातील माळजाई मंदिरासमोरील मैदानावर आयोजित जाहीर सभेत आ. अजित पवार बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील,विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे,जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, खा. विजयसिंह मोहिते पाटील,आमदार दीपक चव्हाण,आ. बाळासाहेब पाटील,आ. मकरंद पाटील,आ. शशिकांत शिंदे, माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील,फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रघुनाथराजे नाईक निंबाळकर, महानंद डेअरीचे उपाध्यक्ष डी. के. पवार, ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे, विजयराव बोरावके, माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख,नगराध्यक्षा निता नेवसे आदी उपस्थित होते.

2014 साली नुसत्या आश्वासनांची खैरात करत व पोकळ घोषणा देत भाजपा व त्यांच्या मित्र पक्षाने सत्ता मिळवली.दोन वर्षे आम्ही त्यांचा कारभार बघितला.त्यांना काहीच करता आले नाही.त्यांच्या काळात शेतकरी आत्महत्या वाढल्या. दुष्काळी परिस्थिती वाढली.जातीजातीमध्ये भांडण लागली, राज्यात भ्रष्ट कारभार करण्याचे काम भाजपा सरकारने केले, त्यांच्या मंत्रिमंडळात एकही शेतकरी नसल्याने शेतकऱ्यांच्या व सामान्य जनतेचे प्रश्न या सरकारला कळत नाही. जनतेच्या सहनशक्तीचा अंत आता या सरकारने पाहू नये असा इशारा आ. अजित पवार यांनी दिला.
देशात सर्वात मोठी कर्जमाफी तत्कालीन कृषिमंत्री खासदार शरद पवार यांनी दिली.ही कर्जमाफी प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचली.मात्र भाजपा शिवसेना सरकारने केलेली कर्जमाफी फसवी व राजकारण डोळ्यासमोर ठेवून केलेली आहे. सर्व शेतकरी वर्ग कामगार वर्ग लहान मोठे उद्योजक या सरकारमुळे अडचणीत आलेले आहे.यांची कर्जमाफी एकाही शेतकऱ्याला भेटलेली नाही.नुसती घोषणाबाजी आणि जुमल्याचे राजकारण त्यांनी केले असल्याचा आरोप आ. जयंत पाटील यांनी केला.

भाजपा सरकारमधील मंत्री आणि पंतप्रधान हे सपशेल खोटे बोलतात. याची जाणीव जनतेला झालेली आहे. निवडणुकीपूर्वी त्यांनी केलेल्या घोषणा आणि सत्तेत आल्यावर केलेल्या घोषणा याचा फरक जनतेने लक्षात घ्यावा. देशाची व राज्याची अवस्था बिकट झालेली आहे. कोट्यावधी रुपयांच्या कामाच्या प्रत्यक्ष अमलात न येणा-या घोषणा मध्यंतरी करण्यात आल्या.मात्र प्रत्यक्ष कुठेच काम सुरू नाही, साखर कारखानदारी शेतकरी यांना देशोधडीला लावण्याचे काम या सरकारने केले आहे. स्वार्थासाठी भाजपा शिवसेना भांडायचे नुसती नाटके करीत आहेत.दोन्हींची प्रवृत्ती सत्ता भोगण्याची आणि भ्रष्ट कारभार करण्याची असल्याने या दोन्हींना तडीपार करण्याची गरज आ. जयंत पाटील यांनी व्यक्त केली.
राज्यातील अनेक मंत्र्यांनी हजारो कोटींचे घोटाळे केलेले आहेत. याबाबतचे पुरावे आपल्याकडे आहे. असे मुख्यमंत्र्यांना सांगितले मात्र तरीसुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस या मंत्र्यांना मंत्रिमंडळातून हाकलून न देता त्यांना क्‍लीनचिट देण्यात मग्न आहेत. देशाला व राज्याला रसातळाला नेण्याचे काम भाजपाने केलेले आहे. देशाचे चौकीदार म्हणून घेणारेच चोर निघालेले आहेत. यांच्या सरकारमधील एकाही मंत्र्याला शेतीबद्दल माहिती नसल्याने शेतकऱ्यांना आत्महत्या वाढलेले आहेत. शेतीमालाला दर मिळेनासा झाला आहे, शेतकरी कांदा टोमॅटो फेकून देत आहे. पूर्णपणे शेतकऱ्यांना उध्वस्त करण्याचे काम या सरकारने केलेले आहे. असा आरोप धनंजय मुंडे यांनी केला.

भाजपा जातीच्या भिंती घालत आहेत. आपण 21 व्या शतकात आहोत आणि तुम्ही हनुमानाची जात काढता? निवडणुका आल्या की राम मंदिरचा मुद्दा पुढ करायचा आणि दुसरीकडे गोत्र काढून आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचे काम भाजप सरकार करत आहेत, असा आरोपही आ. अजित पवार यांनी भाजप नेत्यांवर केला.

निर्धार परिवर्तन याञेत फलटण येथे माढा लोकसभेचे इच्छुक उमेदवार प्रभाकर देशमुख यांना सुरवातीस भाषणाची संधी मिळाली व विद्यमान खासदार विजयसिंह मोहीते पाटील यांना मात्र भाषणासाठी रोखुन आभार मानण्यास सांगितले .त्यामुळे राष्ट्रवादी आता त्यांची उमेदवारीही रोखणार का अशी जोरदार चर्चा सभास्थळी सुरु होती. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)