लग्नकार्यालयातून अडीच लाखांचा ऐवज लंपास

यवत-मंगल कार्यालयामध्ये वधूच्या लग्नाची तयारी सुरू असतानाच वधूच्या खोलीमधून रोख रक्‍कमेसह 2 लाख 45 हजारांच्या ऐवजांची चोरी झाल्याची घटना (केडगाव – चौफुला, ता. दौंड) येथील श्रीकृष्ण मंगल कार्यालयात शनिवारी (दि. 28) दुपारी 3 च्या सुमारास घडली आहे. अशा प्रकारे लग्न कार्यालयामधून चोऱ्या होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून कार्यालयातील सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.
या चोरीप्रकरणी उद्धव दत्तात्रय दिवेकर (वय 59, रा. निगडे, ता. भोर, मूळ रा. वरवंड कवठीचा मळा ता. दौंड) यांनी यवत पोलीस ठाण्यात आज (सोमवारी) फिर्याद दाखल केली आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, फिर्यादी दिवेकर यांच्या पुतणीचे लग्न केडगाव- चौफुला येथील श्रीकृष्ण मंगल कार्यालयात शनिवारी होते. यावेळी वधूच्या रूममध्ये ठेवलेल्या बॅगमध्ये रोख रक्‍कम 2 लाख 4 हजार रुपये, सोन्याची साखळी व मोत्याची कर्णफुले यांची किंमत 31 हजार रुपये आहे. तसेच 10 हजार रुपये किंमतीची गणपती व श्रीकृष्णाची मूर्ती असा एकूण 2 लाख 45 हजारांच्या ऐवजांची चोरी अज्ञात चोरट्याने केली आहे.
ही रोख रक्‍कम कार्यालयाचे भाडे, वाजंत्री, आचारी व इतर किरकोळ खर्चासाठी आणली होती. तर गणपती व श्रीकृष्णाच्या मूर्ती वधूला भेट देण्यासाठी आणल्या होत्या. या सर्व ऐवजांवर अज्ञात चोरट्याने डल्ला मारीत चोरून नेला आहे. काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारे एका कार्यालयातून लाखो रुपयांच्या दागिन्यांची चोरी झाली होती. लग्न कार्यालयामधून अशा प्रकारच्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने कार्यालयातील सुरक्षिततेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. या चोरीबाबत यवत पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस हवालदार बापूराव बंडगर करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)