दोन दिवस कार्यक्रमांची रेलचेल : योगी आदित्यनाथ यांची मुख्य उपस्थिती
उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांची माहिती
मुंबई – उत्तरप्रदेशची राजधानी लखनौ येथील राजभवनात 1 आणि 2 मे रोजी महाराष्ट्रदिनाचा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने दोन दिवस विविध कार्यक्रमांची रेलचेल होणार असल्याची माहिती उत्तरप्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी दिली. त्याचबरोबर महाराष्ट्रातही उत्तरप्रदेशदिन साजरा व्हावा, अशी इच्छाही
त्यांनी व्यक्त केली.
सहयाद्री अतिथिगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्राचे शिक्षण तथा सांस्कृतिक मंत्री विनोद तावडेही यावेळी उपस्थित होते. लखनौमध्ये होणारा महाराष्ट्रदिनाचा सोहळा उत्तरप्रदेश सरकार, महाराष्ट्र सरकार, महाराष्ट्र समाज लखनौ, मराठी समाज उत्तरप्रदेश आणि भातखंडे संगीत विश्वविद्यालयाच्या वतीने 1 आणि 2 मे रोजी राजभवनात आयोजित करण्यात आला आहे.
पहिल्या दिवशीच्या कार्यक्रमाला उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे मुख्य अतिथी असतील. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्या. दिलीप भोसले व विनोद तावडे हे विशेष अतिथी असणार असल्याची माहिती राम नाईक यांनी दिली.
उत्तरप्रदेश, बिहारमधून जे लोंढे येतात त्याबददलच प्रामुख्याने आक्षेप असतो यावर पत्रकारांनी विचारले असता राज्यपाल राम नाईक म्हणाले, आता उत्तरप्रदेश बदलतो आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली नुकताच इन्व्हेस्टर फोरम कार्यक्रम झाला. त्यात 4 लाख 45 हजार कोटींच्या गुंतवणुकीचे प्रस्ताव आले.1650 सामंजस्य करारांवर स्वाक्ष-या झाल्या. यामुळे रोजगाराचा प्रश्न सुटण्यास मोठया प्रमाणात मदत होणार आहे.शिक्षणात विशेषतः स्त्रीशिक्षणात उत्तरप्रदेशने मोठी मजल मारली आहे. यावर्षीच्या 15 लाख 67 हजार पदवीधारकांमध्ये 51 टक्के मुली असल्याचेही राम नाईक म्हणाले.
महाराष्ट्र-उत्तरप्रदेशचे अतूट नाते
महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेशचे एक अतूट असे नाते आहे.प्रभू रामचंद्राच्या वनवासातील नाशिक पंचवटीतील वास्तव्यापासून, शिवछत्रपतींचा राज्याभिषेक करणारे गागाभट्टांपासून ते 1857 च्या स्वातंत्र्यसमरातील नानासाहेब पेशवे, राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे असे अनेक संदर्भ आहेत. हिंदीतील आद्य पत्रकार म्हणून बाबूराव पराडकर यांनी मोठा आदर्श निर्माण केला. उत्तरप्रदेशातील लखनौ, कानपूर, आग्रा, वाराणसी, बरेली आदी महत्त्वाच्या शहरात मराठी भाषिकांच्या संघटना आहेत. त्यांच्यामार्फत साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवात मी जातो, तेव्हा मुंबईतच असल्याचा भास होतो, असेही राम नाईक म्हणाले.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा