#लक्षवेधी : कारगिल युद्ध आणि अजूनही न सुटलेले प्रश्‍न 

कर्नल अभय पटवर्धन (नि.) 

कारगिल विजय दिनाचा 19 वा वर्धापन दिन नुकताच साजरा केला गेला. या युद्धादरम्यान निर्माण झालेले काही प्रश्‍न आजही अनुत्तरितच राहिले आहेत. भारतीय स्थलसेना पीओकेमध्ये स्कार्डूच्या दिशेने प्रवेश करत पळ काढणारे मुजाहिदीन व पाकिस्तानी सेनेचा पाठलाग करण्याच्या अवस्थेत असतांनाही भारताने पाक सैनिकांना सुखरूप माघारी का जाऊ दिले? काश्‍मीर प्रश्‍नाचे आपल्याला हवे असलेले उत्तर शोधण्याची हाती आलेली संधी भारताने का दवडली? 

तब्बल 19 वर्षांपूर्वी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी भारत व पाकिस्तानमध्ये शांततेच्या स्थापनेसाठी नवाझ शरीफ यांच्याबरोबर वार्तालापासाठी उचललेल्या अभूतपूर्व पावलामुळे बावचळलेल्या पाकिस्तान आर्मीने अतिशय गुप्त कारवाई करत, झोझीला खिंडीपासून लडाखकडे जाणाऱ्या मार्गाला आर्टिलरी आणि मॉर्टर फायरद्वारे डॉमिनेट करण्यासाठी, कारगिल क्षेत्रातील उंच पर्वतराजीवर ठाण मांडले. भारतीय सेनेनी अतिशय बहादुरीने इंच-इंच जमीनीसाठी लढा देत जवळपास अडीच महिने चाललेल्या या युद्धात पाकिस्तानी घुसखोरांना सीमापार घालवले. या युद्धातील संकुचित रणभूमीमुळे भारतावर सीमापार करून युद्ध करण्याबाबत स्वघोषित एकतर्फी बंधने घालण्यात आलीत. पाकिस्तानवर ती नव्हती. सन 1999 च्या कारगिल युद्धाबद्दल आजपर्यंत बरेच काही लिहिले गेले आहे. आणि यापुढेही जाईल.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आपल्या परीने एकमेवाद्वितीय असलेल्या जगातील सर्वात ऊंच रणभूमीवर लढल्या गेलेल्या कारगिल युद्धाला भारताने ‘ऑपरेशन विजय’ आणि पाकिस्तानने “ऑपरेशन कोह पाईमा’ ही नावे दिली होती. या युद्धाबद्दल पाकिस्तानी लोकांचा दृष्टिकोन काय आहे याबद्दल बहुतांश वाचक अनभिज्ञ आहेत. सामरिक विश्‍लेषक के. सुब्रमणियनच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या समितीने तत्कालीन भारत सरकारला कारगिल युद्धावर हजारो पानांचा अहवाल सादर केला असला तरी त्याला “युद्ध इतिहास’ म्हणून अधिकृत मान्यता नाही. त्या अहवालानुसार तत्कालीन वायुसेनाध्यक्ष एयर चीफ मार्शल ए. वाय. टिपणीस यांनी पाकिस्तानी हद्दीत जाऊन बॉम्बिंग करू देण्याची मागणी केली होती. पण असे केल्यास परिस्थिती हाताबाहेर जाईल असे वाटल्याने पंतप्रधानांनी अशी परवानगी देण्यास नकार दिला.

जागतिक महाशक्तींनी पाकिस्तानला युद्धबंदीसाठी बाध्य करून त्याचे सैनिक माघारी घेण्यास उद्युक्त केल्यामुळे हा निर्णय किती संतुलित होता हे युद्धानंतरच्या सिंहावलोकनात स्पष्ट होते. नवाझ शरीफशी युद्धबंदी अथवा शांती वार्तालाप करण्यासाठी अमेरिकन राष्ट्रपती बिल क्‍लिंटन यांनी वाजपेयींना वॉशिंग्टनला येऊन अमेरिकेची मध्यस्थी स्विकारण्यासाठी केलेले आवाहन वाजपेयींनी धुडकावले. भारतीय स्थलसेना पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये स्कार्डूच्या दिशेने प्रवेश करत पळ काढणारे मुजाहिदीन व पाकिस्तानी सेनेचा पाठलाग करण्याच्या अवस्थेत असतांनाही भारताने पाक सैनिकांना सुखरूप माघारी का जाऊ दिले, हा एक न सुटलेला प्रश्‍न आहे.

वाजपेयींनी त्यांची राजकीय परिपक्‍वता व चातुर्याचा वापर करत संरक्षण दलांना “लाइन ऑफ कंट्रोल’ पार करण्यास मज्जाव केला. पाकिस्तानवर दयामाया न दाखवता त्याला कठोर शासन करावे अशी देशाचीही इच्छा होती. या युद्धात भारताचे 474 सैनिक धारातीर्थी पडले आणि 1109 गंभीर जखमी झाले. पाकिस्तानची हानी यापेक्षा कितीतरी जास्त होती. त्याचप्रमाणे पाकिस्तानने त्याचा आण्विक पत्ता केंव्हा, कसा व कुठल्या पद्धतीने वापरला आणि भारताने तो खुला का केला नाही हा सामरिक इतिहासाच्या अभ्यासकांना पडलेला दुसरा प्रश्‍नही वाजवी आहे. आण्विक युद्धाच्या भीतीमुळे भारत सर्वंकष युद्धास तयार होणार नाही, याची जवळपास खात्री असल्यामुळे पाकिस्तानचे धाडस वृद्धिंगत झाले, असे मत नरेशचंद्रांच्या “कारगिल रिव्हयु कमिटी’ने नोंदवले आहे.

संरक्षणतज्ज्ञांच्या मते, भारत संकुचित रणभूमीवर त्याला पाहिजे त्या पद्धतीने युद्ध करून हे युद्ध जिंकेल, याची थोडीही कल्पना पाकिस्तानला नव्हती. असे असले तरी सर्वंकष युद्धासाठी भारत व पाकिस्तानची कितपत तयारी होती आणि त्यासाठी संबंधित सरकारांनी काय उपाययोजना केल्या होत्या याबद्दल आजही दोन्हीकडे अधिकृत माहिती उपलब्ध नाही.

“जगातील कोणताही देश युद्धाची पूर्णत: खरी हकीकत सांगत नाही कारण अधिकृत माहिती दिल्यास सामरिक सज्जतेशी तडजोड होऊ शकते,’ या भीतीमुळे सर्वच संरक्षण दल युद्धातील डावपेचांबद्दल खरी माहिती देण्याची टाळाटाळ करतात. भारतीय संरक्षण दलांच्या याच सर्वमान्य मानसिकतेमुळे स्वतंत्र भारताने केलेल्या अथवा सहभाग असलेल्या युद्धांचा वा सैनिकी कारवायांचा अधिकृत सामरिक इतिहास लिहिला जाऊ शकला नाही, असा 1962, 1965 व 1971 च्या युद्धांचा आणि इतर सामरिक कारवायांचा इतिहास मुद्रीत करणाऱ्यांचा अनुभव आहे. भारत सरकारतर्फे सामरिक इतिहासकार श्रीनाथ राघवन यांना कारगिल युद्धाचा अधिकृत इतिहास लिहायची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यासाठी सेना,नौसेना व वायुसेना मुख्यालय आणि वरिष्ठ सैनिकी अधिकाऱ्यांनी आपल्या सामरिक डावपेचांची प्रांजळ माहिती देणे अपेक्षित असले तरी ते कितपत प्रत्यक्षात येईल याचा अंदाज बांधणे/करणे कठीण आहे. कारगिल युद्धाचे काही संवेदनशील अंश नेहमीच गोपनीय राहातील हे सत्य स्विकारले तर या युद्धाचा श्रीनाथ राघवन लिखीत इतिहास, एक महत्वाचा,अधिकृत, ऐतिहासिक – सामरिक दस्तावेज असेल यात शंकाच नाही.
कारगिलमध्ये मार खाऊनही, “आम्हीच कारगिल युद्ध जिंकले’ या पाकिस्तानी ढिंढोऱ्याच्या पार्श्‍वभूमीवर तेथील सरकारी प्रतिपादनाव्यतिरीक्त आम जनता, विचारवंत, निवृत्त लष्करी अधिकारी व संरक्षणतज्ञ या युद्धाची कशी मीमांसा करतात, हे पाहिले पाहिजे. नसीम जेहराच्या पुस्तकातील संदर्भांनुसार अनेक प्रश्‍न उपस्थित करण्यात आले आहेत.

“ऑपरेशन केपी’ सुरू करण्याआधी “हाईंड साईट’मध्ये वर्तवलेल्या मूलभूत बाबी काश्‍मीरमधल्या कोणाच्याच लक्षात का व कशा आल्या नाहीत? लक्षात आल्या असतील तर त्यावर चर्चा झाली होती का? त्या बाबींकडे जाणुनबुजून दुर्लक्ष करण्यात आले का आणि ते का? अशी चर्चाच झाली नसल्यास, पाक सेनेत प्रस्थापित मतांविरोधात आपले मत मांडायची परवानगी नाही का? पाकिस्तानच्या संरक्षणदलांमध्ये समन्वयाचा अभाव आहे का? जर असे काहीच नसेल तर “ऑपरेशन कोह पाईमा’ हे फक्त मुशर्रफचेच “ब्रेन चाईल्ड’ आणि “इगो अल्टार’ होते का? आणि सरतेशेवटी फासा उलटा पडला अथवा पराजय झाला तरी पाक सेना त्या संबंधातील आपले मत आणि आपलीच बाजू खरी आहे हे मिथ्य, नेहमी जनतेच्या गळी कसे उतरवू शकते? यापैकी कोणत्याही प्रश्‍नाचे उत्तर पाकिस्तानमध्ये कोणीच देत नाही. मात्र एका बाबतीत सर्वांचे एकमत आहे ते म्हणजे “पाकिस्तान कॅन नॉट अफोर्ड अनदर कारगिल ऑर अनदर मुशर्रफ’. मुशर्रफना कारगिल पराजयासाठी जबाबदार मानले जात असले तरी भारत सरकारवर दडपण आणून त्याला द्विपक्षीय वार्तालाप तसेच नव्या “कॉन्फिडन्स बिल्डिंग मेझर्स’ सुरू करवण्यास त्यांनीच बाध्य केले. रेस्ट इज हिस्ट्री!!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)