रोहितच्या शांत स्वभावाचा प्रभाव कामगिरीत दिसला 

प्रशिक्षक रवी शास्त्री यांचे प्रशस्तीपत्र 
दुबई- अखेरच्या क्षणापर्यंत श्वास रोखून धरायला लावणाऱ्या अत्यंत चुरशीच्या लढतीत भारताने बांगलादेशवर 3 गडी राखून विजय मिळवला आणि आशिया चषकावर आपले नाव कोरले. भारताने सातव्यांदा हा चषक जिंकत आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले असताना संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाचे सगळीकडे कौतुक होत आहे.

त्याच वेळी भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्रीदेखील रोहितच्या कामगिरीवर खूष असून त्यांनी त्याचे कौतुक करताना सांगितले की, रोहितच्या शांत स्वभावाचा प्रभाव त्याच्या कर्णधार म्हणून कामगिरीसाठी फायद्याचा ठरत असून त्याचा फायदा संघालाही झाला आहे. तसेच रोहितचा स्वभाव पूर्वीच्या तुलनेत खूपच शांत बनला असून फलंदाजीतही त्याचे प्रतिबिंब दिसून येते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अंतिम सामन्यातील पहिल्या सत्रात बांगलादेशचे सलामीवीर सामन्यावर संपूर्ण वर्चस्व गाजवत असताना रोहितने आपले संतुलन न बिघडू देता आपल्या शांत स्वभावाचा वापर करत सामन्यावर पुन्हा वर्चस्व मिळवले, असे सांगून शास्त्री म्हणाले की, त्याच्या या कामगिरीमुळे विराटच्या अनुपस्थितीत दुसऱ्या फळीतील कर्णधार आपल्याकडे तयार झाला आहे. पहिल्या 20 षटकांमध्ये बिनबाद 116 धावा करताना बांगलादेशने भारतासमोर अवघड लक्ष्य उभारण्याकडे वाटचाल सुरू केली होती, मात्र, पुढच्या 30 षटकांमध्ये रोहितने आपल्या गोलंदाजांचा केलेला सुरेख वापर त्याच्यातील प्रतिभा दाखवून देतो. रोहितने यावेळी केलेल्या बदलांमुळे बांगला देशला पुढच्या 30 षटकांत केवळ 106 धावा जोडता आल्या.

आशिया चषक स्पर्धेतून सर्वात महत्त्वाची गोष्ट सगळ्यांसमोर आली आहे, ती म्हणजे भारताचे उत्कृष्ट दर्जाचे क्षेत्ररक्षण. आमच्या खेळाडूंनी उच्च दर्जाचे क्षेत्ररक्षण करताना प्रतिस्पर्धी संघाच्या 30 ते 35 धावा रोखताना बहुमोल कामगिरी केली, असे सांगून शास्त्री म्हणाले की, आमच्या गोलंदाजांनी परिस्थिती प्रतिकूल असतानाही जिद्दीने टिच्चून मारा करताना आपल्या संघाला पिछाडीवरून सामन्यात पुनरागमन करून दिले.

किंबहुना भारताने बांगला देशला बिनबाद 120 वरून सर्वबाद 222 धावांवर रोखल्यामुळेच त्यांना अखेर विजेतेपदापर्यंत मजल मारता आली. परंतु त्याचे खरे श्रेय गोलंदाजांच्या कामगिरीला द्यावे लागेल, असे सांगून शास्त्री म्हणाले की, रोहितने ज्या प्रकारे गोलंदाजांना हाताळले, तो युवा खेळाडूंसाठी एक धडाच होता. अशा स्पर्धांमधून खेळाडूंना अशा प्रकारचा बहुमोल अनुभव मिळत असल्यानेच या स्पर्धा महत्त्वाच्या ठरतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)